लयनकथा । अमोघ वैद्य
डोंगराच्या पूर्व भागात ५३ लेण्या, पश्चिम भागात सहा आणि दक्षिण भागात २३ लेण्या आहेत. काही लेण्या आडवाटेवर असल्यामुळे पर्यटकांची इथं रेलचेल नाही, कोणी इथं जास्त फिरकतसुद्धा नाही! इथल्या प्रत्येक शिलालेखातून, स्तूपातून आणि कुंडातून तत्कालीन समाजाची श्रद्धा, त्याग आणि सामूहिकतेचा प्रतिध्वनी उमटतो.
जुन्नरच्या कुशीत विसावलेला नाणेघाट म्हणजे काळाच्या कितीतरी कथा सांगणारं प्रवेशद्वारच! किनारपट्टीच्या गजबजाटाला अंतर्देशाच्या शांततेशी जोडणारा हा सातवाहन काळातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग.
आजूबाजूला पसरलेल्या निसर्गसौंदर्याला पाहताना मी कधीमधी विचारात गुंततो आणि अभ्यासक म्हणून डोळ्यांसमोर एखादा प्रसंग उभा करण्याचा प्रयत्न करतो. मला जे दृश्य दिसतं, ते काहीसं असं असतं... सूर्य मावळतीला आलाय... या घाटाच्या वळणदार पायवाटांवर इसवी सन पूर्व पहिल्या शतकात एक बौद्ध भिक्खू आपल्या खांद्यावर थकव्याचा बोजा आणि हृदयात धम्माचा दीप घेऊन कातळातून चढत आहे...