Diamonds
Esakal
उमेश शेळके
हिरा नैसर्गिक असो किंवा लॅबोरेटरी ग्रोन, त्याला आकर्षक तेज आणि आकार दिला जातो तो भारतातच! गुजरातमधील सूरत हे शहर त्याचे मुख्य केंद्र ठरले आहे. तेथील कुशल कारागीर, अद्ययावत तंत्रज्ञानातून हिऱ्याला पैलू पाडलेले जातात. या प्रक्रियेनंतर हिरे जगभर निर्यात होतात.
लग्न सोहळ्याच्या अंगठीत बसलेला हिरा पाहताना बहुतेक लोकांच्या मनात एकच प्रश्न येतो, की हा कुठून आला असेल? पृथ्वीच्या गर्भातून येणारा नैसर्गिक हिरा आहे की प्रयोगशाळेत निर्माण झालेला? कारण, आज हिऱ्यांच्या बाजारात दोन प्रवाह निर्माण झाले आहेत. पहिला म्हणजे नैसर्गिक हिरे आणि दुसरा, लॅबोरेटरी ग्रोन हिरे (एलजीडी). दोन्हींच्या मागे कार्बनचीच कहाणी आहे, पण त्यांचा प्रवास पूर्ण वेगळा.
हिरा म्हणजे निसर्गाचा चमत्कार मानला जातो. पृथ्वीच्या गर्भात कोट्यवधी वर्षे प्रचंड उष्णता आणि दाबाखाली कार्बनचे रूपांतर हिऱ्यात झाले. त्यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकातून हे हिरककण जमिनीच्या जवळ आले. आज जगभरातील खाणीतून हे हिरे मिळतात. रशिया, बोट्सवाना, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया हे नैसर्गिक हिऱ्यांच्या खाणी असणारे प्रमुख देश आहेत. या खाणींमधून टनावारी खडक बाहेर काढले जातात, लाखो टन माती हलवली जाते, तेव्हा कुठे त्यात थोडेसेच हिरे मिळतात.