डॉ. अविनाश भोंडवे
आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी समतोल आहाराला अपरंपार महत्त्व असते. काय खावे? किती खावे? कोणत्या वेळी खावे? याबाबतची शिस्तही पाळावी लागते. दैनंदिन आहारात काही पदार्थ आवश्यक असतात, तर काही पदार्थ टाळणेही गरजेचे असते. तेल, तूप, मीठ, साखर अशा पदार्थांच्या अतिरेकी सेवनाचे परिणाम सर्वांना माहिती असतात. पण युरिक अॅसिडच्या वाढीला चालना देणाऱ्या पदार्थांच्या अतिसेवनामुळेही काही दुर्धर आरोग्यसमस्या निर्माण होतात. त्यामुळे ते पदार्थही टाळणे आवश्यक असते, सर्वसामान्यांना याची जाणीव नसते.
युरिक अॅसिड शरीरात निर्माण होणारा एक नैसर्गिक टाकाऊ पदार्थ असतो. आपल्या आहारातील विविध अन्नपदार्थ आणि पेयांमध्ये आढळणाऱ्या प्युरिन नावाच्या रासायनिक पदार्थाच्या विघटनातून युरिक अॅसिड तयार होत असते. सर्वसाधारणपणे प्रत्येकाच्या शरीरात विशिष्ट प्रमाणात युरिक अॅसिड असतेच, परंतु त्याची पातळी योग्य मर्यादेत राखणे आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. ही पातळी वाढल्यास किंवा कमी झाल्यास गाऊट, मुतखडे आणि इतर गुंतागुंतीच्या आरोग्य समस्या उद््भवू शकतात. साहजिकच युरिक अॅसिडची शरीरातील भूमिका आणि त्याची पातळी कशी राखावी, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
प्युरिन आणि युरिक अॅसिड
प्युरिन हे कार्बन आणि नायट्रोजन अणूंनी तयार झालेले रेणू असतात. शरीरातील प्रत्येक पेशीच्या डीएनए आणि आरएनएमध्ये ते आढळतात. मानवी शरीरात प्युरिन दोन प्रकारांत आढळते.
शरीरांतर्गत प्युरिन : सुमारे ६७ टक्के प्युरिन शरीरामध्येच निर्माण होते. आपल्या प्रत्येक पेशीमध्ये त्याचे अस्तित्व असते. शरीराच्या प्रत्येक पेशीला एक जीवनमर्यादा असते. त्याकाळात त्या त्यांचे कार्य करून नष्ट होतात आणि त्यांची जागा नव्याने निर्माण होणाऱ्या पेशी घेतात. निकामी झालेल्या, नष्ट होण्याच्या स्थितीत असलेल्या किंवा मृत झालेल्या पेशींमधील प्युरिन रक्तात मिसळते. त्याच्यावर शरीरात प्रक्रिया होते.
बाह्य प्युरिन : आहारातून शरीराला प्राप्त होणाऱ्या प्युरिन्सना एक्झोजीनस किंवा बाह्य प्युरिन म्हणतात.
शरीरातील चयापचय क्रियेमध्ये या दोन्ही प्रकारच्या प्युरिन्सवर प्रक्रिया होते आणि त्यातून युरिक अॅसिड नावाचे उपउत्पादन तयार होते. या युरिक अॅसिडपैकी बहुतांश भाग रक्तात विरघळतो आणि मूत्रपिंडात जातो. तेथून सुमारे ९० टक्के युरिक अॅसिड शरीरात पुन्हा शोषले जाते. उर्वरित भाग मुख्यत्वे मूत्रामधून आणि काही भाग विष्ठेमधून बाहेर पडतो. पण काही कारणांमुळे शरीरात युरिक अॅसिड जास्त प्रमाणात निर्माण होऊ लागले किंवा मूत्रपिंडाकडून ते पुरेशा प्रमाणात बाहेर पडले नाही, तर युरिक अॅसिडची रक्तातील पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. याला हायपरयुरिसीमिया म्हणतात.
पुरुषांसाठी दर १०० मिलीलिटरमध्ये ३.५ ते ७.२ मिलीग्रॅम
महिलांसाठी दर १०० मिलीलिटरमध्ये २.६ ते ६.० मिलीग्रॅमपर्यंत असावी लागते. ही पातळी वाढल्यास गाऊट किंवा मूतखड्यांचा त्रास होऊ शकतो.
गाऊट : गाऊट हा एक संधिवाताचा प्रकार आहे. यामध्ये बहुतेक वेळेस पायाच्या अंगठ्यामध्ये किंवा इतर काही सांध्यांमध्ये युरिक अॅसिडचे स्फटिक निर्माण होऊन सांध्यांना सूज येते आणि ते लालसर तसेच वेदनादायक होतात.
मूत्रपिंडातील खडे : युरिक अॅसिडची वाढलेली पातळी मूत्रपिंडात खडे निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकते. मूतखडा म्हणजे मूत्रपिंडात तयार होणारी खनिजे आणि क्षार यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेले, दगडासारखे घट्ट आणि कडक असे घनपदार्थ असतात.
चयापचय स्थिती : युरिक अॅसिडची वाढलेली पातळी उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि टाइप-२ मधुमेहासारख्या चयापचय विकारांशी संबंधित असते.
युरिक अॅसिडच्या पातळीत वाढ होण्यास अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात.
आहार : खालील प्रकारच्या अन्नपदार्थांमध्ये प्युरिनचे प्रमाण अवास्तव असल्यामुळे त्यांच्या सेवनातून शरीरात युरिक अॅसिड जास्त प्रमाणात जमा होते.
पाळीव प्राण्यांचे मांस : मेंढी, बकरी आणि डुकराचे मांस
प्राण्यांचे अवयव : प्राण्यांच्या मांसामधील यकृत आणि मूत्रपिंडे
समुद्री खाद्यपदार्थ : खेकडे, लॉबस्टर, कोळंबी, सार्डिन, अँचोव्ही, ट्यूनासारखे मासे; ऑइस्टर, क्लॅम, शिंपले, स्कॅलॉप्स असे कडक कवच किंवा बाह्य सांगाडा असलेले जलचर
वन्य प्राण्यांचे मांस : हरणाचे आणि इतर वन्य प्राण्यांचे मांस
साखरयुक्त पेये : शीतपेये आणि फळांचे रस, फ्रुक्टोज, कॉर्न सिरप असलेली पेये
प्रक्रिया केलेले साखरेचे पदार्थ : केक, कँडी, स्वीटब्रेड आणि इतर मिठाया
यीस्ट आणि यीस्ट अर्क : ब्रेड आणि बिअरसारखे यीस्ट असलेले पदार्थ
मद्यपान : बिअर, वाइन आणि इतर मद्यार्कयुक्त पेयांमुळे शरीराच्या युरिक अॅसिड उत्सर्जित करण्याच्या क्षमतेमध्ये अडथळे निर्माण होतात.
औषधे : अॅनसिट्रेटिन, अॅलिस्कीरेन, सिप्रोफ्लोक्सासिन, डी-टेलाप्रेव्हिर, पीसीआय-३२७६५, रिबाव्हिरिन अशा काही औषधांमुळे युरिक अॅसिडची पातळी वाढू शकते.
मूत्रपिंडाच्या कार्यामध्ये बिघाड : मूत्रपिंडाचे कार्य बिघडल्याने युरिक अॅसिड बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते.
निर्जलीकरण : पुरेसे पाणी न प्यायल्यास रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढू शकते.
युरिक अॅसिडच्या पातळीत वाढ झाल्यास बहुसंख्यवेळा खालील लक्षणे दिसून येतात.
सांधेदुखी : सांध्यामध्ये विशेषतः पायाच्या अंगठ्यामध्ये अचानक, तीव्र वेदना.
सूज आणि लालसरपणा : प्रभावित सांध्यामध्ये दाह निर्माण होऊन ते लालसर होतात.
मूत्रपिंडामध्ये वेदना : पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना, लघवीमध्ये रक्त येणे आणि तातडीने मूत्रविसर्जन करण्याची भावना सतत होणे.
रुग्णाची लक्षणे किंवा तो घेत असलेल्या औषधांमुळे युरिक अॅसिडची पातळी जास्त किंवा कमी असण्याची शक्यता वाटली, तर सीरमयुरिक अॅसिड चाचणी ही रक्ततपासणी केली जाते. युरिक अॅसिडसाठी मूत्र चाचणीदेखील केली जाते.
युरिक अॅसिड पातळी योग्य राखण्यासाठी
युरिक अॅसिडच्या पातळीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी खालील गोष्टी पाळाव्या लागतात.
आहारात बदल : प्राण्यांचे मांस, कवच असलेले मासे आणि जलचर, शर्करायुक्त पेये आणि मद्य अशांसारख्या उच्च प्युरिनयुक्त पदार्थांचे सेवन आणि प्राशन मर्यादित केल्याने युरिक अॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते.
हायड्रेशन : भरपूर पाणी प्यायल्याने युरिक अॅसिड पातळ होऊन ते लघवीद्वारे बाहेर पडण्यास मदत होते.
औषधे : काही रुग्णांमध्ये युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी औषधे द्यावी लागतात.
जीवनशैलीतील बदल : वजन आदर्श पातळीत राखणे, नियमित व्यायाम करणे आणि धूम्रपान टाळणे यांमुळे युरिक अॅसिडची पातळी नियंत्रित राहण्यात मदत होते.
रक्तातील युरिक अॅसिडच्या उच्च पातळीमुळे होणारे हायपर युरिसीमियाचे उपचार करण्यासाठी जीवनशैलीतील बदल आणि औषधे यांचे संयोजन आवश्यक असते. यासाठी केल्या जाणाऱ्या विशेष उपचारांत खालील गोष्टींकडे लक्ष पुरवावे लागते.
अॅपलोप्युरिनॉल : हे औषध शरीरातील युरिक अॅसिडचे उत्पादन कमी करण्यासाठी तसेच सर्वसाधारणपणे गाऊटवर उपचारासाठी आणि मूत्रपिंडातील खड्यांची निर्मिती रोखण्यासाठी वापरले जाते.
फेबुक्सोस्टॅट : फेबुक्सोस्टॅट युरिक अॅसिडची निर्मिती कमी करते आणि गाऊटच्या दीर्घकालीन व्यवस्थापनासाठी वापरले जाते.
प्रोबेनेसिड : हे औषध मूत्रपिंडांना अधिक प्रभावीपणे युरिक अॅसिड बाहेर टाकण्यात मदत करते.
कोल्चिसिन: गाऊटच्या तीव्र त्रासामध्ये वेदना आणि दाह कमी करण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते.
नॉनस्टेरॉयडल अँटी-इन्फ्लेमेटरी ड्रग्स : गाऊटच्या तीव्र विकारात वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी इंडोमिथॅसिन आणि आयब्रुफेनसारखी औषधे वापरली जातात .
कॉर्टिकोस्टेरॉईड्स : तीव्र स्वरूपाच्या गाऊटमध्ये दाहविरोधी औषधांचा किंवा कोल्चिसिनचा वापर करूनही वेदना आणि सूज लवकर कमी न झाल्यास दाह आणि वेदना कमी करण्यासाठी ही औषधे मर्यादित काळासाठी वापरली जातात.
आहाराचे समायोजन : प्राणिजन्य मांसाहार, कवचयुक्त मासे, काही विशिष्ट जलचरांचे सेवन आणि शीतपेये, कोला पेये आणि शर्करायुक्त पेयांसारख्या उच्च प्युरिनयुक्त पेयांचे प्राशन कमी करणे.
दररोज दोन ते तीन लिटर पाणी आणि इतर आरोग्यदायी द्रवपदार्थ घेणे.
आपल्या वयानुसार आणि उंचीनुसार आपले वजन योग्य पातळीत ठेवणे.
नियमित शारीरिक व्यायाम आणि शारीरिक हालचाली करणे, बैठी जीवनशैली टाळणे.
आरोग्य निरामय राखण्यासाठी, गाऊट, किडनी स्टोन अशांसारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी युरिक अॅसिडची पातळी समजून घेणे आणि व्यवस्थापित करणे अत्यंत महत्त्वाचे असते. सजगतापूर्वक आहार निवड, भरपूर पाणी, नियमित व्यायाम आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करून युरिक अॅसिडची पातळी प्रभावीपणे व्यवस्थापित करता येते आणि संभाव्य आरोग्यसमस्यांचा प्रतिबंध करता येतो.
(डॉ. अविनाश भोंडवे इंडियन मेडिकल असोसिएशन कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स राष्ट्रीय शाखेचे पुणेस्थित माजी डीन आहेत.)
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.