जागतिक भान आणि साहित्य विश्वात वैचारिकतेची भर घालणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लेखिका प्रतिभा रानडे

pratibha ranade book
pratibha ranade bookesakal

डॉ. वर्षा तोडमल

लेखिका प्रतिभा रानडे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या लेखणीला असलेले अनेकविध पैलू यामुळे पुस्तक वाचनात जीव गुंततो, एक भरावलेपण अनुभवता येते.

प्रतिभाताईंच्या वैचारिक लेखनाला, त्यांच्या ललित साहित्याला, त्यांच्या अप्रकाशित साहित्याला आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला जाणून घेण्यास वाचक उत्सुक आहेत, त्यामुळे पैस प्रतिभेचा हे पुस्तक महत्त्वाचे वाटते.

वाचकाला जागतिक भान देणाऱ्या आणि साहित्य विश्वात वैचारिकतेची भर घालणाऱ्या; भारतात माणिपूर, शिलाँग, दिल्ली, भारताबाहेर अफगाणिस्तान, पाकिस्तान, जेरूसलेम, लंडन अशा ठिकाणी वास्तव्य झालेल्या;

अमृता प्रीतम, खान अब्दुल गफारखान, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, विदुषी दुर्गाबाई भागवत, गोपाळ गणेश आगरकरांचे नातू श्रीराम आगरकर, शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर अशा अनेक दिग्गज लोकांचा सहवास लाभलेल्या प्रतिभावान लेखिका म्हणून प्रतिभा रानडे यांना आपण गेली अनेक वर्षे ओळखतो.

प्रतिभाताईंचा समृद्ध जीवनानुभव आणि त्यांच्या पुस्तकातून आलेले विविध विषय, यावर त्यांची सविस्तर मुलाखत दीपाली दातार यांनी घेतली आहे. छत्तीस तासांच्या गप्पांच्या रेकॉर्डिंगचे संपादन करून सिद्ध झालेले पैस प्रतिभेचा हे पुस्तक मनात घर करते.

प्रतिभा रानडे या ज्येष्ठ संशोधक लेखिका असून त्यांच्या लेखनाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांची तीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. पैकी सतरा पुस्तकांना राज्य शासन आणि इतर संस्थाचे पुरस्कार मिळाले आहेत. चार वेळा विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

केवळ राजकीय, सामाजिक लेखनच नाही तर अनुवाद, कथा, कादंबरी, ललित गद्य, चरित्र या साहित्य प्रकारांतून त्यांनी हाताळलेले विविध विषय थक्क करणारे आहेत.

धर्म, संस्कृती, राष्ट्र इतिहास, दहशतवाद, जागतिकीकरण, हिंदू-मुस्लिम स्त्रिया, त्यांच्या समस्या, स्त्री जाणिवा, माणसाच्या मनोवृती, त्यातले संगत-विसंगत, देव-धर्म या संकल्पना, विश्व निर्मिती, मृत्यूचे गूढ अशा अनेक विषयांकडे समग्र दृष्टीने, तर कधी वेगळेपणाने पाहत त्यावर सविस्तर लेखन आपल्या पुस्तकांतून त्यांनी केले आहे.

संशोधकीय कामाच्या निमित्ताने, अभ्यासाच्या निमिताने तर कधी कुतूहलापोटी सामान्य लोकांपासून, प्रतिष्ठित मान्यजनांपर्यंत चारशे-पाचशे मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत.

त्यांचे निसर्गप्रेम, त्यांना असलेली भाषा सौंदर्याची, चित्रकलेची जाण; राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, सुधारक आगरकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, न्यायमूर्ती रानडे, रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, लक्ष्मीबाई टिळक, बॅरिस्टर जिना या इतिहासातल्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांवर;

फैज अहमद फैज, अमीर खुसरो, काझी नझरूल इस्लाम यांसारख्या कवींवर त्यांनी टाकलेला प्रकाश; नलपाक दर्पण या पुस्तकाच्या संपादनाच्या निमिताने अन्नसंस्कृतीवर त्यांनी केलेले संशोधन अशा अनेकविध विषयांवर आणि त्यांच्या समृद्ध आयुष्यावर मोकळेपणाने केलेल्या आस्वादक गप्पा असे स्वरूप असलेले पुस्तक म्हणजे पैस प्रतिभेचा.

त्या गप्पांचे तेवढ्याच ताकदीने लेखिका दीपाली दातार यांनी सात भागांत संपादन केले आहे. हा प्रतिभाताई रानडे यांच्याशी मनसंवाद आहे.

संस्कृती आणि धर्म म्हणजे काय, धर्माची गरज का निर्माण झाली, विविध धर्म, त्यांचा संस्कृतीशी, माणसाच्या जगण्याशी आणि जागतिकीकरणाशी असलेला संबंध, विविध धर्मातल्या श्रद्धा, देवता, देवांच्या, स्वर्गाच्या कल्पना, धर्म सहिष्णूता, धर्म निरपेक्षता, राजकारण, धर्मकारण, सत्ताकारण आणि अर्थकारण यांचा गुंता, जात, पंथ आणि राजकारण, वैज्ञानिकांची धर्माकडे बघण्याची दृष्टी यावरच्या गप्पा आपल्याला श्रीमंत करतात.

धर्म, देश, राष्ट्र आणि जागतिकीकरण, राष्ट्र या संकल्पनेचा उदय, राष्ट्र आणि देश यातला फरक, भारत-पाक फाळणीचा इतिहास, अफगाणिस्तान, पाकिस्तानचे वास्तव, त्यांचा इतिहास, प्रतिभाताईंचे त्या ठिकाणच्या वास्तव्यातले अनुभव, हिंदू मुस्लिम संबंध, फाळणी वेदना दिन, जेरुसलेमचा इतिहास, महाराष्ट्रातील महत्त्वाची धर्मांतरे (पंडिता रमाबाई, रे. ना. वा. टिळक, डॉ. आंबेडकर इ.), जागतिकीकरण, जगभरातला दहशतवाद, त्याची कारणे या विषयावरच्या गप्पा पहिल्या दोन प्रकरणांत वाचायला मिळतात.

तत्त्वचिंतन करणाऱ्या, धर्मावर, स्वर्गाच्या कल्पनेवर भाष्य करणाऱ्या स्त्रिया, हिंदू-मुस्लिम स्त्रिया, बुरख्याचा इतिहास, धर्म आणि स्त्रियांचे नाते, शिकलेल्या स्त्रियांची आधुनिकता, स्त्रीमुक्ती, स्त्रीवादी जाणिवा यावर प्रतिभाताईंनी आजवर केलेले लेखन आणि त्यांचे अनुभव वेगळ्या जाणिवा निर्माण करतात.

प्रतिभाताईंचा लेखनप्रवास वाचक-लेखक म्हणून प्रतिभाताईंचे घडणे, अमृता प्रीतम भेट, कथा-कादंबऱ्या व चरित्र लेखन, त्याचे बीज, वैचारिक लेखनाची सुरुवात, लेखनामागच्या प्रेरणा, लेखनाची पूर्वतयारी, विषय सुचल्यापासून कागदावर उतरेपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे.

साहित्यचिंतन आणि कलादृष्टी, कलांचे प्रयोजन, कलानिर्मिती आणि कलावंत, कलावंताची संवेदनशीलता, साहित्य आणि इतर कला, चित्रकला आणि स्त्री जाणिवा, रामायण, महाभारत आणि इतर शोकांतिका, प्रतिभाताईंचे कल्पना आणि विचारविश्व, व्यासंगी, कलाप्रेमी आणि आधुनिक आई-वडिलांचा वारसा, कलंदर साथीदार फिरोज रानडे आणि त्यांच्या बरोबरचे सहजीवन, भेटलेली, शहाणीव देणारी माणसे (खान अब्दुल गफारखान, दुर्गाबाई, डॉक्टर मुकुंद दास, श्रीराम आगरकर), निसर्ग प्रेमासह इतर छंद, आवडीनिवडींवर दीपाली दातार प्रकाश टाकतात.

pratibha ranade book
Special Interview of A.Manimekhalai: ‘सार्वजनिक क्षेत्रातील तिसरी सर्वांत मोठी बँक बनण्याचे उद्दिष्ट’

इंडोनेशियाच्या नोटेवर असलेले गणपतीचे चित्र, तिथला हिंदू धर्म- मंदिरात मूर्ती नसणे... ग्रीकांना मिरी इतकी आवडायची की संस्कृत भाषेत तिचा उल्लेख ‘यवनप्रिया’ असा आढळतो... असे पुस्तकात येणारे अनेक संदर्भ वाचण्यासारखे आहेत.

सुधारक आगरकरांची उपेक्षा, मानवी जीवनातले नाते संबंध; श्रीराम, श्रीकृष्ण, गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त अशा महामानवांचे निर्वाण; कलावंत आणि सामान्य माणसाच्या जगण्यातले एकटेपण; मृत्यू, पुनर्जन्म, देव, संत या विषयीची प्रतिभाताईंची मते, भूमिका पुस्तकातून उलगडतात.

प्रतिभाताई आणि अमृता प्रीतम, दुर्गाबाई, सरहद्द गांधी (खान अब्दुल गफारखान) यांच्या भेटी; अफगाणिस्तानात असताना रशियन क्रांतीच्यावेळी घरावर झालेले बॉम्बिंग किंवा प्रतिभाताई लहान असताना गांधी हत्येनंतर त्यांच्या माहेरच्या घराची, वडिलांच्या ज्ञानकोशाच्या ऑफिसची झालेली जाळपोळ; विषय सुचल्यापासून कागदावर उतरेपर्यंतचा प्रवास; कलावंत आणि त्याची निर्मिती यांच्यामधले नाते; कलावंतांची संवेदनशीलता या संबधीच्या गप्पा तर जिवाला भिडणाऱ्या वाटतात.

प्रतिभाताई स्त्री-पुरुष नाते संबंधांकडे पाहताना म्हणतात, स्त्री-पुरुषांचे नाते तर तळ नसलेल्या आणि भोवरे असलेल्या डोहाइतके गूढ आहे.

तर धर्म आणि स्त्रिया यांचे नाते सांगताना त्या म्हणतात, धर्म आणि स्त्रिया यांचे नाते एखादी मारकुटी आई आणि तिचे अशक्त लहान मूल यांच्यामधल्या नात्यासारखे आहे.

पुस्तकाच्या अलीकडे नि पलीकडे असलेला लेखक अशा गप्पांमधून समजत जातो आणि फार वेगळी आणि समग्र दृष्टी या पुस्तकातील गप्पांमधून मिळते. प्रतिभाताईंचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या लेखणीला असलेले अनेकविध पैलू यामुळे पुस्तक वाचनात जीव गुंततो, एक भरावलेपण अनुभवता येते.

प्रतिभाताईंच्या वैचारिक लेखनाला, त्यांच्या ललित साहित्याला, त्यांच्या अप्रकाशित साहित्याला आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याला जाणून घेण्यास वाचक उत्सुक आहेत, त्यामुळे हे पुस्तक महत्त्वाचे वाटते. हे पुस्तक वाचून सर्व वर्गातल्या वाचकांची जीवनाकडे आणि जगाकडे बघण्याची दृष्टी अधिक व्यापक, समंजस होईल असेही वाटते.

पैस प्रतिभेचा

लेखिका : दीपाली दातार

प्रकाशन ः डिंपल पब्लिकेशन, मुंबई

किंमत ः ₹ ७००

पाने ः ४४२

विवेकाचं दुसरं नाव विचार आहे

वैचारिक

लेखक ः डॉ. विवेक क्षीरसागर

किंमत ः ₹ ६००

पाने ः ५००

------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com