पॅन्डेमिक युग...?

मानवी समाजासमोरील मोठे आव्हान म्हणून या आजारांकडे पाहिले जाते.
डॉ. प्रदीप आवटे
डॉ. प्रदीप आवटेesakal

डॉ. प्रदीप आवटे

प्राण्यांची आणि प्राणिजन्य पदार्थांची आंतरराष्ट्रीय वाहतूक इतक्या मोठ्या प्रमाणावर होते आहे, की एका ठिकाणचा प्राणिजन्य आजार दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळेच प्राणिजन्य आजार हे केवळ एका देशाची समस्या उरली नसून ती आता जागतिक समस्या आहे. प्राणिजन्य आजारांच्या प्रभावी नियंत्रणासाठी वैश्विक सर्वेक्षण धोरणाची गरज त्यामुळेच निर्माण झाली आहे. मानवी समाजासमोरील मोठे आव्हान म्हणून या आजारांकडे पाहिले जाते. ता. ६ जुलै रोजी असणाऱ्या जागतिक प्राणिजन्य आजार दिवसानिमित्त...

माबालो लोकेला हा यांबुकु गावातल्या शाळेचा मुख्याध्यापक. यांबुकु हे त्या वेळच्या झैरेतील आणि आजच्या कांगोमधील छोटेसे गाव, इबोला नदीच्या काठी वसलेले. माबालो गुरुजी एक आठवडाभर मस्त नदीकाठची रपेट मारून आले आणि २६ ऑगस्ट १९७६ रोजी एकदम तापाने फणफणले. दवाखाना, उपचार सारे काही झाले पण ८ सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला. नंतर लक्षात आले त्यांना विषाणुजन्य रक्तस्रावी तापाने घेरले होते. हा विषाणू नवा होता. इबोला नदीवरून या नव्या विषाणूचे बारसे ‘इबोला विषाणू’ असे करण्यात आले. माबालो लोकेला हा या इबोला आजाराचा पहिला ज्ञात रुग्ण. त्या वर्षी झैरेमध्ये (कांगो) जवळपास ३१८ जणांना इबोलाची लागण झाली आणि त्यापैकी २८० जण दगावले. ही इबोलाची पहिली साथ. यानंतर इबोला अधूनमधून सतत भेटत राहिला आणि एखाद्या दुःस्वप्नासारखा मानवी जगताचा पाठलाग करत राहिला.

१९७६ ते आजतागायत इबोलाचे जवळपास ३० उद्रेक आपण पाहिले आहेत. त्याच्याबद्दलची भीती एवढी सर्वव्यापी आहे, की १९९५ साली वोल्फगॅंग पीटरसनने इबोलासदृश मोटाबा या काल्पनिक आजारावर ‘आऊटब्रेक’ नावाचा हॉलिवूड चित्रपट केला. डस्टीन हॉफमन या नामवंत अभिनेत्याने त्यात प्रमुख भूमिका केली आहे. या चित्रपटाने इबोलाची भीती अत्यंत भेदकपणे सर्वदूर पोहोचवली. वटवाघळाच्या काही प्रजाती, चिपांझी, गोरिला, इतर जातींची माकडे आणि इतर प्राण्यांमार्फत हा आजार पसरतो. ज्या व्यक्ती या बाधित प्राण्यांच्या शरीरस्रावांच्या संपर्कात येतात त्यांना हा आजार होण्याची शक्यता असते. या बाधित प्राण्यांचे मांस खाणे हेदेखील अनेकवेळा इबोलाला आमंत्रण देणारे ठरते. म्हणूनच इबोला हा एक ‘प्राणिजन्य आजार’ आहे.

डॉ. प्रदीप आवटे
SAKAL Impact: तोरंगण पाड्यावर चिरांचे बनवले स्मारक! चौदाशेच्या शतकांच्या 20 चिरांचे संवर्धन

पण इबोला एकमेव नाही. असे अनेक प्राणिजन्य आजार आहेत. मानवी समाजासमोरील मोठे आव्हान म्हणून या आजारांकडे पाहिले जाते. दरवर्षी ६ जुलै रोजी जागतिक प्राणिजन्य आजार दिवस (World Zoonoses Day) असतो. प्राणिजन्य आजारांना इंग्रजीमध्ये झूनॉटिक डिसिजेस (Zoonotic Diseases) असे म्हणतात. रुडॉल्फ विरचो याने हा शब्द १८८०मध्ये वैद्यकशास्त्राला दिला. प्राणिजन्य आजार म्हणजे प्राण्यांपासून मानवाला होणारे आजार असा साधा सोपा अर्थ आहे.

६ जुलै हा दिवस निवडण्यापाठीमागेही इतिहास आहे. एकेकाळी पिसाळलेला कुत्रा चावलेल्या व्यक्तीचा मृत्यू अटळ असायचा. तेव्हा लुई पाश्चर या फ्रेंच वैज्ञानिकाने १८८५ साली रेबीज आजाराविरुद्धची पहिली लस शोधली आणि पिसाळलेला कुत्रा चावलेल्या एका मुलाला ती ६ जुलै या दिवशी देण्यात आली, त्या मुलाचे प्राण वाचले. याची आठवण म्हणून हा दिवस जागतिक प्राणिजन्य आजार दिवस म्हणून पाळला जातो. २००७ साली लुई पाश्चरची स्मृती शताब्दी साजरी करताना पहिला जागतिक प्राणिजन्य दिवस साजरा करण्यात आला.

डॉ. प्रदीप आवटे
Sakal Podcast : मोदी पवार एका मंचावर येणार का? ते हिमाचलमध्ये पावसाचा हाहा:कार

मानवाच्या एकूणच उत्क्रांतीमध्ये प्राणिजन्य आजारांची भूमिका मोठी आहे. नुकतीच आपण अनुभवलेली कोविड -१९ या आजाराची जागतिक महासाथ हासुद्धा एक प्राणिजन्य आजाराचाच उद्रेक होता. पाळीव प्राण्यांपासून होणाऱ्या लहान-मोठ्या आजारांपासून ते जगभर पसरू शकणाऱ्या महासाथीपर्यंत प्राणिजन्य आजारांचे ‘विश्वरूप दर्शन’ आपल्याला थक्क करणारे आहे. आता तर प्राण्यांची आणि प्राणिजन्य पदार्थांची आंतरराष्ट्रीय वाहतूक इतक्या मोठ्या प्रमाणावर होते आहे, की एका ठिकाणचा प्राणिजन्य आजार दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळेच प्राणिजन्य आजार हे केवळ एका देशाची समस्या उरली नसून ती आता जागतिक समस्या आहे. प्राणिजन्य आजारांच्या प्रभावी नियंत्रणासाठी वैश्विक सर्वेक्षण धोरणाची गरज त्यामुळेच निर्माण झाली आहे.

यावर्षीच्या प्राणिजन्य आजार दिवसाचे घोषवाक्य आहे ‘सुरक्षित प्राणी, आरोग्यदायी मानव’. वरवर पाहता ही थीम साधी सोपी वाटली तरी तिच्यामध्ये एक अंतर्विरोध आहे आणि एक विनोदही आहे. मुळात मानवदेखील एक प्राणीच आहे, हे आपण विसरलो आहोत आणि तिथेच मोठी गोची आहे. अंगावर कपडे घातले आणि मानवी संस्कृतीचा मोठा डोलारा उभा केला, तरीही मनुष्यही अखेरीस एक प्राणीच आहे आणि या समष्टीचा, पर्यावरणाचा एक भाग आहे, हे सत्य लपत नाही. हे तथ्य विसरल्यामुळेच प्राणिजन्य आजारांचे रूप अक्राळविक्राळ होताना आपल्याला दिसते आहे.

डॉ. प्रदीप आवटे
Sakal Impact : चाळीसगावात खड्डेमय रस्त्यांवर मुरूम टाकण्याचे काम सुरू; ‘सकाळ’च्या वृत्ताची तत्काळ दखल

एकविसाव्या शतकात ज्या दोन मोठ्या महासाथींना आपण तोंड दिले, त्या दोन्हीही महासाथी प्राणिजन्य आजारांमुळे आल्या होत्या. पहिला स्वाईन फ्लू आणि नंतर कोविड. नव्याने आढळणारे किंवा जे जुने आजार पुन्हा डोके वर काढत आहेत त्यापैकी जवळपास ७० टक्के आजार प्राणिजन्य आजार आहेत, हे लक्षात घेतले तर आपल्याला या समस्येची व्याप्ती नेमकी समजू शकेल.

आपल्याकडे मुंबईत, कोकणात आढळणारा लेप्टोस्पायरोसिस, माकड ताप किंवा राज्यभर सर्वत्र आढळणारा स्क्रब टायफस, पिसाळलेले प्राणी चावल्यामुळे होणारा रेबीजसारखा जीवघेणा आजार, गुजरातमध्ये आढळलेला क्रीमियन काँगो रक्तस्रावी ताप, केरळमध्ये आढळलेला निपा हा आजार, दर पावसाळ्यात आपल्याला त्रस्त करून सोडणारे डेंग्यू, चिकनगुनिया किंवा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे आढळणारा जपानी मेंदूज्वरासारखा आजार, इथपासून ते साध्या खरजेपर्यंत ही सारी प्राणिजन्य आजारांची उदाहरणे आहेत. या आजारांचा आपल्या जगण्यावर, आपल्या सामाजिक आणि आर्थिक घडामोडींवर किती मोठा परिणाम होऊ शकतो याचीही कल्पना या उदाहरणांवरून येईल.

स्वाइन फ्ल्यू आणि कोविडमध्ये झालेली जीवित आणि आर्थिक हानी आपण जाणतोच. १८९८ सालापासून आतापर्यंत प्लेगमुळे आपल्या देशातील जवळपास सव्वा कोटी माणसे दगावली आहेत. देशात दरवर्षी सुमारे १७ लाख लोकांना पिसाळलेले प्राणी चावतात आणि रेबीजमुळे वीस हजाराच्या आसपास मृत्यू होत असावेत,असा एक अंदाज आहे. ब्रुसेलॉसिससारखा आजारदेखीलमोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि आर्थिक हानी करतो. पशुपालन हा आपल्याकडील ग्रामीण भागातील बहुसंख्य लोकांचा व्यवसाय असल्याने त्यांना प्राणिजन्य आजारांचा धोका अधिक असतो.

वन हेल्थ संकल्पना

मागील दोन-तीन दशकांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘वनहेल्थ’ ही संकल्पना मांडली जात आहे. वन हेल्थ याचा अर्थमानवाचे आरोग्य हे प्राणी आणि पर्यावरण यांच्याशी अत्यंतघट्टपणे बांधलेले आहे. मानव प्राणी आणि पर्यावरण यांचे नाते परस्परावलंबी असून ते जेवढे निरामय आणि आरोग्यदायी असेल, तेवढेच मानवाचे आरोग्यदेखील चांगले राहील. म्हणूनच प्राणिजन्य आजारांचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी मानवी आरोग्य, प्राण्यांचे आरोग्य आणि पर्यावरण यांमधील आंतरविद्याशाखीय तज्ज्ञांनी एकत्र येऊन एकमेकांशी सुसंवाद ठेवत आपापल्या क्षेत्रात घडणाऱ्या गोष्टींबाबत एकमेकांना माहिती दिल्याने व परस्परांमध्ये समन्वय ठेवून एकत्रित काम केल्याने वन हेल्थ ही संकल्पना खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येऊ शकते आणि प्राणिजन्य आजारांचे उद्रेक नियंत्रणात ठेवणे शक्य होऊ शकते. अन्नसुरक्षा हा त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. विविध प्रतिजैविकांचा न्याय्य वापर आणि या पृथ्वीतलावरील जैवविविधता जपून ठेवणे हा वन हेल्थ संकल्पनेचा गाभा आहे.

प्राणिजन्य आजारांवर परिणाम करणारे घटक

प्राणिजन्य आजाराच्या प्रमाणावर विविध भौगोलिक आणि पर्यावरणविषयक घटक परिणाम करतात. या सगळ्या घटकांबद्दल समजून घेणे प्राणिजन्य आजाराच्या नियंत्रणासाठी अत्यंत आवश्यक आहे.

मानवी परिसंस्थेतील बदल

प्राणिजन्य आजारांवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे, दिवसेंदिवस मानवाच्या परिसंस्थेमध्ये होणारा खूप मोठा बदल. जगाची लोकसंख्या वेगाने वाढते आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच या वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्याकरिता जो भूभाग अजून मनुष्यवस्तीकरिता वापरला गेला नाही अशा प्रदेशात माणूस जातो आहे. रस्त्याचे बांधकाम, शेतीसाठीच्या पाइपलाइन, नवीन जमीन लागवडीखाली आणणे, त्यातून होणारी जंगलतोड या सगळ्या मुद्द्यांमुळे रहिवास नसलेल्या परिसंस्थेमध्ये मनुष्याचा शिरकाव होतो आहे आणि त्यामुळे त्याला नवीन सूक्ष्मजीवांनादेखील तोंड द्यावे लागत आहे.

व्यावसायिक जोखीम

विविध प्रकारच्या व्यवसायामध्ये गुंतलेल्या अनेकजणांना प्राण्यांचे मांस, रक्त, त्यांनी उत्सर्जित केलेले पदार्थ यांच्या संपर्कात यावे लागते. त्यामुळे अशा व्यक्तींमध्ये प्राणिजन्य आजार उद्‍भवण्याचे प्रमाण अधिक आहे. घोंगड्या विणणारे विणकर, पशुपालक, टेक्स्टाईल उद्योगात प्राण्यांचे केस वापरणारे कामगार या सगळ्यांना अँथ्रॅक्स नावाचा आजार होण्याची भीती असते. भातशेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना लेप्टोस्पॉयरोसिससारखा आजार होऊ शकतो. प्राण्यांच्या कत्तलखान्यामध्ये काम करणारे मजूरही प्राण्यांपासून होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांना बळी पडू शकतात. कोविड-१९ची लागण वुहान शहरातल्या अशाच एका मांसविक्री केंद्रातून सुरू झाली, असे म्हटले जाते. अन्नपदार्थांवर प्रक्रिया करणाऱ्या व्यक्तींमध्ये साल्मोनेला जंतूची लागण होऊ शकते. हे सर्व व्यवसाय अधिकाधिक निर्दोष होण्यासाठी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

वाढते दळणवळण

आधुनिक जगात एकूणच माणसाचे दळणवळण वाढले आहे. जमिनीचा विकास, अभियांत्रिकी प्रकल्प, तीर्थयात्रा, पर्यटन या सगळ्यामुळे माणूस असुरक्षित अन्न आणि पाणी यांची जोखीम घेत प्रवास करत राहतो आणि त्यातूनही त्याला अनेक प्राणिजन्य आजारांना तोंड द्यावे लागते. हाडे, मांस अशा अनेक प्राणिजन्य पदार्थांचा व्यापार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असतो. त्यातूनही प्राणिजन्य आजार एका भूभागातून दुसऱ्या भूभागात पसरतात. मानवाच्या अन्न, वस्त्र आणि इतर गरजांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. विमाने, जहाजे, रेल्वे आणि इतर वाहनातूनही काही प्राणिजन्य विषाणू किंवा सूक्ष्मजीव एका भागातून दुसऱ्या भागात जाऊ शकतात. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी सैन्याचे प्रचंड स्थलांतर झाले, त्यातूनच डेंग्यूसारखा आजार आशिया खंडातून युरोप आणि अमेरिकेत पोहोचला होता.

ॲन्टीबायोटिकचा न्याय्य वापर

अन्न निर्माण करणाऱ्या किंवा अन्न म्हणून वापरण्यात येणाऱ्या निरोगी जनावरांमध्ये वाढीला चालना देण्यासाठी कमी डोसमध्ये ॲन्टीबायोटिकचा वापर करण्यात येतो. काही देशांमध्ये ॲन्टीबायोटिकच्या एकूण खपापैकी ८० टक्के खप हा या कारणांसाठी होतो. ॲन्टीबायोटिकच्या अशा अनियंत्रित वापरामुळे प्राण्यांमधील सूक्ष्मजीवांमध्ये ॲन्टीबायोटिक रेझिस्टन्स तयार होतो.

डॉ. प्रदीप आवटे
Sakal Podcast : २०५० पर्यंत ९० कोटी लोकांवर उपासमारीची वेळ ते पवार साहेब आणखी किती जणांची माफी मागणार?

अशा सूक्ष्मजीवांमुळे होणारे आजार नंतर कोणत्याही ॲन्टीबायोटिकला दाद देईनासे होतात. म्हणूनच निरोगी प्राण्यांमध्ये ॲन्टीबायोटिकचा अनाठायी वापर करू नये, अशा सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिल्या आहेत. इंटर गव्हर्नमेंट सायन्स पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी ॲण्ड इकोसिस्टीम सर्व्हिसेस यांनी पॅन्डेमिक संदर्भात २२ तज्ज्ञांच्या सहकार्याने एक अहवाल ऑक्टोबर २०२०मध्ये प्रसिद्ध केला आहे.

या अहवालातील एक इशारा आपल्या सर्वांची झोप उडविणारा आहे. पर्यावरणीय बदलामुळे नष्ट होणारी जैवविविधता एका पॅन्डेमिकच्या युगाला जन्म देते आहे, असे हा अहवाल सांगतो आणि आपण याच प्रकारे हवामान बदल, जागतिक तापमानवाढीला हातभार लावत राहिलो; जैवविविधता नष्ट करत राहिलो, तर पक्षी आणि सस्तन प्राण्यांमधील सुमारे साडेआठ लाख विषाणू मानवी वस्तीत शिरकाव करण्यासाठी दबा धरून बसले आहेत.

‘संसर्गजन्य आजाराविरुद्धचे युद्ध मानवाने जिंकले आहे,’

असे मत अमेरिकेचा सर्जन जनरल असलेल्या विल्यम स्टेवर्टने पन्नास वर्षांपूर्वी व्यक्त केले होते. तेव्हा असे वाटणारा विल्यम एकटा नव्हता. ‘साथीचे आजार आता इतिहासजमा झाले आहेत,’ असे नोबेल विजेत्या मॅक बर्नेटलाही १९६२ साली वाटले होते. संसर्गजन्य आजार इतिहासजमा होणे राहिले बाजूला; त्यांच्यावर प्रभावी नियंत्रण ठेवायचे असेल तर आपल्याला केवळ आपल्यापुरते पाहून चालणार नाही. आपल्याला अवतीभवतीचे प्राणी आणि पर्यावरण दोघांनाही जपावे लागेल. वृक्षवल्ली आणि वनचरांना सोयरे म्हणणारे तुकोबा वेगळे काय सांगत होते?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com