Bartolomeo Cristofori piano
Esakal
दुष्यंत पाटील
पियानोवर उजव्या हातानं मेलडी (चाल) वाजवताना डाव्या हातानं साथ देणं शक्य होतं. हातांच्या अनेक बोटांचा वापर करत संगीतातली हार्मनी (संगीतामध्ये एकाच वेळी स्वर वाजत जाणं) आणणं सहज शक्य होत होतं. पियानोच्या सात सप्तकांमुळे अखंड ऑर्केस्ट्राच एका वाद्यात असल्यासारखं होतं. आवाजाच्या विविध छटा वादनात आणता येणं शक्य असल्यानं अधिक भावनामय संगीत तयार करणं शक्य होतं.
जवळपास साडेतीनशे वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या काळात इटलीमध्ये बार्टोलोमिओ ख्रिस्तोफोरी नावाचा एक बुद्धिमान कारागीर राहायचा. त्याला लहानपणापासूनच लाकूड आणि सुतारकामाच्या हत्यारांची आवड होती. संगीतवाद्यं तयार करणं तसंच वाद्यांची दुरुस्ती करणं यांचं त्याला वेडच होतं. त्याचे कानही तीक्ष्ण होते, त्याला संगीतवाद्यांतून येणाऱ्या आवाजांमधले बारकावे लगेच लक्षात यायचे.