Premium|Ladu Recipe: सातू-मखाणा लाडू, मूग लाडू, गव्हाच्या पिठाचे लाडू; हे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू करून पाहिले का..?

Indian Sweet Recipe: गोडाच्या आवडीनुसार लाडू बनवण्याचे विविध पर्याय
Indian festival recipe

Indian festival recipe

Esakal

Updated on

नेहा काडगांवकर

गहू - नाचणीचे लाडू

वाढप

१० ते १५ मध्यम आकाराचे लाडू

साहित्य

एक वाटी गव्हाचे पीठ, १ वाटी नाचणीचे पीठ, १ वाटी बदाम, १ वाटी सुके खोबरे, अर्धी वाटी वितळलेले साजूक तूप (२ चमचे अधिक आवश्‍यकतेनुसार), अर्धी वाटी गूळ किंवा पिठीसाखर (गोडाच्या आवडीनुसार), पाव वाटी खायचा डिंक, १ वाटी खारीक पूड, २ चमचे वेलची पूड.

कृती

सर्वप्रथम कढईत सुके खोबरे गुलाबीसर रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजावे. भाजून झाल्यावर ते एका ताटात काढून थंड होऊ द्यावेत. त्यानंतर त्याच कढईत बदाम भाजून घ्यावेत आणि तेही थंड करण्यासाठी बाजूला ठेवावेत. मग कढईत तूप गरम करून डिंक तळावा. उरलेल्या तुपात गव्हाचे पीठ घालून छान बदामीसर रंग येईपर्यंत भाजावे. नंतर थोडे तूप घालून नाचणीचे पीठदेखील भाजावे. गॅस बंद करून गरम कढईत खारीक पूड हलकीच परतावी. नंतर सर्व मिश्रण थंड झाल्यावर ते थोडे थोडे घेऊन मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे. नंतर या मिश्रणात गूळ किंवा पिठीसाखर व वेलची पूड घालून मिश्रण नीट एकत्र करावे आणि लाडू वळावेत.

टिप्स

  • सर्व साहित्य शक्यतो स्वतंत्रपणे भाजावे.

  • वेळ असेल तर प्रत्येक पदार्थ मिक्सरमध्येही स्वतंत्रपणे बारीक करू शकता.

  • लाडू नीट वळत नसतील, तर थोडे तूप गरम करून मिश्रणात मिसळावे आणि मग लाडू वळावेत.

  • मिश्रण पूर्ण थंड झाल्यावरच पिठीसाखर किंवा गूळ घालावा.

अळीव लाडू

वाढप

८ ते १० छोट्या आकाराचे लाडू

साहित्य

एक वाटी ओले खोबरे, १ वाटी गूळ, अर्धी वाटी अळीव, २ चमचे वेलची पूड, १ चमचा जायफळ पूड, २ चमचे तूप.

कृती

सर्वप्रथम अळीव स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि ओले खोबरे व गूळ यांच्यासोबत झाकण असलेल्या एका स्टीलच्या डब्यात अर्धा तास ठेवून द्यावेत. नंतर डब्याचे झाकण लावून कुकरमध्ये ३ ते ४ शिट्ट्या कराव्यात. कुकर थंड झाल्यावर मिश्रण बाहेर काढून एकत्र करावे. यानंतर एका कढईत २ चमचे तूप घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर परतावे. मिश्रण सुटू लागल्यावर गॅस बंद करून कढई गॅसवरून खाली घ्यावी. मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड घालून नीट मिसळावे आणि लाडू वळावेत.

टीप

अळिवाचे लाडू झटपट होतात. पारंपरिक पद्धतीमध्ये अळीव नारळाच्या पाण्यात रात्रभर भिजवले जातात आणि मग गूळ व खोबऱ्यासोबत भाजून घेतले जातात. वेलची व जायफळाऐवजी सुंठ पावडरदेखील चांगली लागते. हे लाडू साधारण ८ ते १० दिवस टिकतात.

गव्हाच्या पिठाचे लाडू

वाढप

८ ते १० मध्यम आकाराचे लाडू

साहित्य

एक वाटी गव्हाचे पीठ, पाव वाटी वितळलेले साजूक तूप (२ चमचे अधिक लागले तर), पाऊण वाटी गूळ, अर्धी वाटी जाड पोहे, २ चमचे वेलची पूड, काजू आणि बदाम तुकडे.

कृती

सर्वप्रथम कढईत तूप गरम करून त्यात काजू-बदामाचे तुकडे आणि पोहे घालावेत. पोहे कुरकुरीत आणि तुकडे हलके ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यावेत. भाजून झाल्यावर हे मिश्रण एका भांड्यात काढून थंड होऊ द्यावे. यानंतर त्याच कढईत थोडे तूप घालून गव्हाचे पीठ घालावे आणि छान बदामीसर रंग येईपर्यंत मंद आचेवर परतावे. पीठ थंड झाल्यावर त्यात भाजलेले पोहे व काजू-बदाम मिसळावेत. हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. नंतर त्यात गूळ आणि वेलची पूड घालून नीट एकत्र करावे आणि मिश्रणाचे लाडू वळावेत.

टीप

हे लाडू करताना आवडीनुसार पिस्ते, अक्रोड किंवा इतर सुकामेवादेखील वापरता येतो. डिंक तळून किंवा सुके खोबरे भाजूनही मिश्रणात घालता येते.

मुगाच्या डाळीचे लाडू

वाढप

८ ते १० मध्यम आकाराचे लाडू

साहित्य

एक वाटी मूग डाळ, अर्धी वाटी वितळलेले साजूक तूप (२ चमचे अधिक लागले तर), पाऊण ते १ वाटी पिठीसाखर (गोडाच्या आवडीनुसार), २ चमचे वेलची पूड, काजू आणि बदाम तुकडे.

कृती

सर्वप्रथम मूग डाळ स्वच्छ धुऊन पाणी निथळून घ्यावे. नंतर कढईत मूग डाळ मंद आचेवर भाजावी. डाळ खमंग व लालसर भाजल्यावर गॅस बंद करावा आणि डाळ थंड होऊ द्यावी. थंड झाल्यावर डाळ मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी बारीक पावडर करून घ्यावी. मग कढईत थोडे तूप गरम करून डाळीची पावडर बदामी रंग येईपर्यंत भाजावी. आवश्यकतेनुसार तूप हळूहळू घालावे. मिश्रण भाजून झाल्यावर ते पूर्ण थंड होऊ द्यावे. नंतर त्यात पिठीसाखर, वेलची पूड आणि काजू-बदाम तुकडे घालून नीट मिसळावेत आणि लाडू वळावेत.

Indian festival recipe
Premium|Wieliczka Salt Mine: जमिनीखालीदेखील मिठाच्या खाणी असतात..?

सातू-मखाणा लाडू

वाढप

१२ ते १५ मध्यम आकाराचे लाडू

साहित्य

दोन वाट्या सातू पीठ, २ वाट्या मखाणे, १ वाटी (किंवा आवश्यकतेनुसार) वितळलेले साजूक तूप, १ ते दीड वाटी पिठीसाखर, २ चमचे वेलची पूड, काजू आणि बदाम तुकडे.

कृती

कढईत थोडे तूप गरम करून त्यात मखाणे हलके तांबूस आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत. त्यानंतर त्याच कढईत सातूचे पीठ एक ते दोन मिनिटे परतून घ्यावे. भाजलेले मखाणे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून अगदी बारीक पावडर करून घ्यावी. आता कढईत सातूचे पीठ आणि मखाण्यांची पावडर एकत्र करून त्यात थोडे तूप घालून बदामीसर रंग येईपर्यंत परतावे. हे मिश्रण भाजून झाल्यावर पसरट भांड्यात काढून पूर्ण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, काजू-बदामाची पावडर किंवा बारीक तुकडे घालून नीट मिसळावे. नंतर आवश्यकतेनुसार तूप घालून मिश्रण एकजीव करून लहान लाडू वळावेत.

टीप

सातूचे पीठ भाजताना ते जळणार नाही याची काळजी घ्यावी. पिठीसाखरेऐवजी गूळ, खजूर किंवा खडीसाखरदेखील वापरू शकता. लाडवांमध्ये तुमच्या आवडीनुसार इतर सुकामेवादेखील घालता येतो.

Indian festival recipe
Premium|Flowers: मनातील अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी रंगीबेरंगी फुलांसारखे दुसरे माध्यम नाही..

बेसन लाडू

वाढप

१५ ते २० मध्यम आकाराचे लाडू

साहित्य

चार वाट्या बेसन, पाऊण वाटी वितळलेले साजूक तूप (२ चमचे अधिक लागले तर), २ वाट्या पिठीसाखर, २ ते ३ चमचे दूध, २ चमचे वेलची पूड, काजू किंवा बेदाणे आवडीनुसार.

कृती

सर्वप्रथम कढईत निम्मे तूप गरम करून त्यात बेसन घालावे आणि मंद आचेवर भाजायला सुरुवात करावी. साधारण पाच-दहा मिनिटांनी पुन्हा थोडे तूप घालून मिश्रण नीट परतावे. बेसनात गाठी राहू नयेत म्हणून सतत हलवत राहावे. सर्व तूप एकदम न घालता थोडे थोडे करून मिसळावे. मिश्रण ना खूप घट्ट ना खूप पातळ असे मध्यमसर झाल्यावर ते बदामी रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजत राहावे. साधारण तीस ते पस्तीस मिनिटे लागतात. मिश्रण भाजताना सतत हलवणे गरजेचे आहे, नाहीतर ते खाली लागू शकते.

मिश्रण भाजून झाले की मिश्रणावर थोडे दूध शिंपडावे. दूध घातल्यावर मिश्रण फसफसू लागते, पण नंतर ते छान दाणेदार दिसायला लागते. हे झाल्यावर गॅस बंद करून मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलची पूड घालून सर्व नीट मिसळावे. तयार मिश्रणातून लाडू वळावेत. लाडू वळताना आवडीप्रमाणे काजू किंवा बेदाणे लावून लाडू सजवता येतात. खमंग बेसनाचे लाडू तयार!

टिप्स

  1. बेसनाचे लाडू करताना थोडा निवांत वेळ द्यावा, कारण मिश्रण मंद आचेवर सतत हलवत भाजावे लागते, त्यामुळे थोडा वेळ लागतो.

  2. मिश्रण खूप घट्ट वाटल्यास थोडे अधिक तूप घालावे.

  3. लाडूचे मिश्रण नेहमी बदामी रंग येईपर्यंत भाजावेच; कमी भाजल्यास लाडू खाताना चिकटतात.

  4. भाजलेले मिश्रण पूर्ण थंड झाल्यावरच पिठीसाखर घालावी.

  5. लाडूचे मिश्रण खूप पातळ झाल्यास लाडू आकार घेत नाहीत; अशावेळी ते काही वेळ फ्रिजमध्ये ठेवून नंतर लाडू वळावेत.

    ------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com