

Psychiatry Career
esakal
डॉ. गौरव वडगांवकर
मानसोपचारशास्त्र म्हणजे केवळ एक व्यवसाय नाही, तर ते लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रभावी माध्यम आहे. आजच्या काळात मानसोपचारशास्त्राशी संबंधित करिअर हे फक्त रुग्णांच्याच नव्हे, तर स्वतःच्याही आयुष्यात अर्थपूर्ण बदल घडवणारे क्षेत्र ठरू शकते.
‘निरोगी शरीरात निरोगी मन निवास करते,’ असे आपण म्हणतो. आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक आरोग्य हा महत्त्वाचा विषय झाला आहे. नैराश्य, चिंता, व्यसनाधीनता, आत्महत्या, बालकांमधील वर्तणूक समस्या, वृद्धांमधील स्मृतिभ्रंश अशा विविध मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज दिवसेंदिवस वाढत असून, मानसोपचारशास्त्र हे भविष्यातील आशादायी करिअर क्षेत्र म्हणून उदयास येत आहे.
भारतामध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आढळतात. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार, सुमारे प्रत्येक दहाव्या भारतीयाला आयुष्यात कधीतरी मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु, मानसिक आरोग्याशी संबंधित सेवा देणाऱ्या तज्ज्ञांची संख्या अत्यल्प आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, भारतात सुमारे नऊ ते दहा हजार मानसोपचारतज्ज्ञ कार्यरत आहेत. देशाच्या गरजेनुसार ही संख्या किमान ३६ हजार असणे अपेक्षित आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप एकही मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध नाही. त्यामुळे या क्षेत्रात प्रशिक्षित डॉक्टरांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे.
मानसोपचारतज्ज्ञ होण्यासाठी प्रथम एमबीबीएस पूर्ण करून राष्ट्रीय प्रवेश परीक्षेद्वारे एम.डी. सायकिॲट्री किंवा डीएनबीमध्ये (द डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड) सायकिॲट्री शाखेत प्रवेश घ्यावा लागतो. तीन वर्षांच्या पदव्युत्तर प्रशिक्षणादरम्यान मानसिक आजारांचे निदान, औषधोपचार, समुपदेशन, व्यसनमुक्तीसाठीचे उपचार, बाल व किशोरांसाठी मानसोपचार, वृद्धांसाठी मानसोपचार तसेच आपत्कालीन मानसिक आरोग्यसेवा अशा बऱ्याच विषयांचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. मानसोपचारात एमडी किंवा डीएनबी केल्यानंतर आज देशातील काही प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये व्यसनमुक्ती, बाल मानसोपचार, वृद्धांचे मानसिक विकार या विषयांमध्ये सुपरस्पेशालिटीही उपलब्ध आहे. देशविदेशातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये फेलोशिप, डॉक्टरेट आणि संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एम.डी. सायकिॲट्रीचे प्रशिक्षण पुण्यातील काही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे.
अनेक भारतीय मानसोपचारतज्ज्ञ आज अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा आणि इतर प्रगत देशांमध्ये काम करत आहेत. त्यातील काही डॉक्टरांनी संशोधन आणि रुग्णसेवा या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून त्या देशांतील अनेक उच्च बहुमान मिळवले आहेत.
मानसोपचारतज्ज्ञांसाठी रोजगाराच्या व्यापक संधी आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, मानसिक आरोग्य संस्था, खासगी रुग्णालये, कॉर्पोरेट क्षेत्र, व्यसनमुक्ती केंद्रे, संरक्षण सेवा, शैक्षणिक संस्था आणि संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. मानसोपचारतज्ज्ञ स्वतःचे क्लिनिकही सुरू करू शकतात. दूरसंचार तंत्रज्ञानामुळे ऑनलाइनही मानसोपचार सेवांचे महत्त्व वाढत असून, ग्रामीण व दुर्गम भागातही सेवा पुरविण्याचे नवे मार्ग खुले झाले आहेत.