

Pune Ganeshotsav DJ Rules
esakal
गणेशोत्सव आणि पुणे हे नाते केवळ धार्मिक नाही, तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिकही आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकजुटीचे आणि प्रबोधनाचे स्वरूप दिले. त्यामुळे पुण्यातील गणेशोत्सवाची मिरवणूक, ढोल-ताशे, लेझीम आणि विविध कलाप्रकार यांना एक वेगळे महत्त्व आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या उत्सवाच्या चर्चेचा केंद्रबिंदू संस्कृतीपेक्षा डीजेचा आवाज बनला आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात डीजेच्या वापरावरून समर्थक आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. या वादाकडे केवळ ‘डीजे हवा की नको?’ या प्रश्नातून पाहणे कदाचित योग्य ठरणार नाही. कारण एका बाजूला उत्सव साजरा करण्याचा, आनंद व्यक्त करण्याचा आणि आपल्या सांस्कृतिक परंपरा जपण्याचा नागरिकांचा अधिकार आहे; तर दुसऱ्या बाजूला शांततेत जगण्याचा, अभ्यास करण्याचा, आजारातून बरे होण्याचा आणि वृद्धत्वात त्रासमुक्त राहण्याचा अधिकारही तितकाच महत्त्वाचा आहे. पुणे पोलिसांनी यंदा या विषयावर काहीसा मध्यममार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी उच्च क्षमतेच्या ‘प्रेशर मीड’ आणि ‘प्लाझ्मा साउंड’वर कारवाईचा इशारा दिला आहे. त्याचवेळी चार बास आणि चार टॉपच्या मर्यादित ध्वनिव्यवस्थेबाबत चर्चा झाली आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास यंत्रणा जप्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.