

Ladakh Travel Experience
esakal
पूजा ढेरिंगे
माझ्या बकेटलिस्टमध्ये लडाख कधी नव्हतंच, पण ज्या गोष्टींची स्वप्नंही पाहिलेली नसतात, त्याची स्वप्नं आपल्यासाठी कोणीतरी सहज पाहून ठेवतं. तेच स्वप्न माझ्या नवऱ्यानं पाहिलं आणि गेल्या महिन्यात आम्ही पुणे ते लडाख रोड ट्रिप केली.
लडाख... निर्मनुष्य रस्ते, बर्फाच्छादित हिमालय, रोज हिमालयाआडून निघणारा सूर्य आणि त्याच हिमालयाला नारंगी करून मायेनं कुरवाळणारा सूर्यास्त... या सगळ्यात वेळेचं तसूभरही भान नसणं... ही आझादी जगण्यासाठी एकदा लडाखला जावंच!
मला प्रश्न पडायचा, लडाख या वाळवंटी आणि कोरड्या जागेविषयी लोक भरभरून लिहितात, व्यक्त होतात, या जागेवर अतोनात प्रेम करतात; नेमकं काय कारण असेल? पण या प्रश्नाचं उत्तर मला लडाखच्या प्रवासात मिळालं आणि ट्रिप पूर्ण झाल्यावर मीही लडाखवेडी होऊन लेखणी हातात घेतलीच.
इमारती, रस्ते, ऑफिसेस वा माणसं जेवढी जास्त जवळजवळ, तेवढं आपण त्यांच्यापासून मुक्त व्हायला पाहतो, असं म्हणतात. लडाख खूप मोकळं आहे. मोठा चित्रकलेचा कॅनव्हास असावा तसं तिथं दूरदूरवर आभाळ दिसतं. आपली बुबुळं मोबाईलच्या स्क्रीनमुळे चिंचोळी झालीयत; त्यांना मोकळा श्वास तिथं घेता येतो आणि डोळे हळूहळू मोऽऽठे होतात. डोंगरांच्या शृंखला तर डोळे दिपवून टाकतात. नारंगी, तपकिरी, हिरव्या, निळ्या, काळ्या रंगांची डोंगररांग दिसू लागते तेव्हा आपल्याला कळतं की लोक इथं येऊन लडाखवेडे का होतात!