पुस्तक परिचय । माधव गोखले
चंबळच्या खोऱ्यातल्या ऐंशीच्या दशकातल्या दस्यू-दहशतीपासून ते पोलिसिंग या संकल्पनेतील बदलत जाणारी बहुतेक सारी आव्हाने हाताळणाऱ्या पोलिस सेवेतील फार थोड्या अधिकाऱ्यांमध्ये रमण यांचा निःसंशय समावेश होतो. पोलिस अधिकारी म्हणून रमण यांनी पेललेल्या जबाबदाऱ्या, स्वीकारलेली आव्हाने, अधिकारी म्हणून त्यांची विचार करण्याची पद्धत डिड आय रिअली डू ऑल धिस?मधून वाचकांसमोर येत राहते.
सत्तरीच्या दशकातील चंबळच्या खोऱ्यातल्या डाकूंची दहशत मोडून काढताना पानसिंग तोमरच्या टोळीबरोबर झालेली रात्रभराची चकमक ते मलखान सिंह आणि फूलन देवीचे आत्मसमर्पण, भोपाळ वायुगळतीदरम्यानचे बचावकार्य, २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार गाझी बाबाला कंठस्नान घालणारी काश्मीरमधील चकमक, दंतेवाडामधील नक्षलविरोधी मोहीम, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप - एसपीजीचे उच्चाधिकारी म्हणून चार पंतप्रधानांच्या सुरक्षेची आणि सीमा सुरक्षादलाचे प्रमुख म्हणून काश्मीर सीमेच्या रक्षणाची जबाबदारी, मध्य प्रदेशातल्या व्यापम परीक्षा गैरव्यवहारची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकात सहभाग आणि त्याआधी ३९ दिवसांत पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचा जागतिक विक्रम...आणखीही लांबवता येऊ शकेल अशी ही यादी भारतीय पोलिस सेवेतल्या एकाच अधिकाऱ्याशी जोडलेली आहे. म्हणूनच कदाचित या साऱ्या घटनांचे नायक रमण यांना प्रश्न पडतो - डिड आय रिअली डू ऑल धिस?