आरोग्य। डॉ. शशांक शहा
वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट, सप्लिमेंट्स किंवा इंजेक्शन घेणे ही सध्याच्या काळात पित्ताशयात खडे होण्याची प्रमुख कारणे असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. विशेषतः स्त्रिया, पोट सुटलेले लोक आणि जास्त कोलेस्ट्रॉल असणाऱ्यांमध्ये अशा खड्यांचा धोका जास्त असतो आणि निदान न केल्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
वजन कमी करण्याच्या प्रयत्नांमुळे पित्ताशयातील खडे होण्याचं प्रमाण सध्याच्या काळात सर्वांत जास्त आहे. क्रॅश डाएट करणे, सप्लिमेंट घेणे, वेटलॉस करण्यासाठीची नवीन इंजेक्शन्स घेणे ही पित्ताशयात खडे होण्यामागची महत्त्वाची कारणे ठरली आहेत. ओबेसिटी एक्स्पर्टचा सल्ला न घेता वजन कमी केले तर पित्ताशयात खडे होण्याचा धोका वाढतो. स्त्रियांमध्ये, पोट सुटलेले असलेल्यांमध्ये आणि कोलेस्ट्रॉल जास्त असणाऱ्यांमध्ये हे खडे होण्याची शक्यता जास्त असते. पित्ताशयात खडे असल्याने आपल्याला काहीच त्रास होत नाही, असा सामान्यतः रुग्णांचा गैरसमज असतो.
पण, गॅसेस होणे, अपचन होणे, ढेकर येणे अशा वेगवेगळ्या तक्रारींचे मूळ पित्ताशयातील खड्यांमध्ये असते. रुग्णाला मधुमेह असेल तर पित्ताशयाच्या खड्याचे दुखणे जाणवत नाही. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये पित्ताशयाच्या खड्यांचे निदान झाले असल्यास त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक असते. कारण, तो खडा अडकल्यास तेथे गुंतागुंत होईपर्यंत रुग्णाला ते समजत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे पित्ताशयातील खड्यांचे उपचार सुरू असले, तरीही आजच्या काळातील हे सर्वांत महत्त्वाचे उपचार आहेत. पित्ताशयातील खड्यांची संख्या कितीही असू शकते. वजन कमी करण्याचा प्रयत्न केलेल्या एका रुग्णाच्या पोटातून मी १,४७० पित्ताशयाचे खडे काढले होते.