

What Does Remote Care Really Mean
esakal
विद्या हर्डीकर-सप्रे
सेवा म्हणजे नुसतं ‘रुग्णाच्या शेजारी बसून त्याला पाहिजे ती मदत करणं’ एवढंच नसतं. दूरस्थसेवा शुश्रूषा म्हणजे एकदा रुग्णाकडे जाऊन त्याची सगळी मेडिकल बिलं आणि इन्शुरन्सचे गुंते सोडवणं आणि परिस्थितीची पाहणी करणं असू शकतं. आईची प्रत्यक्ष सेवा करून आई आणि आपले सासू-सासरे यांची जबाबदारी असलेल्या बहिणीवरचा भार दोन दिवस तरी कमी करण्याचा प्रयत्न असू शकतो.
फिलाडेल्फियामध्ये राहणारं जॉनचं कुटुंब. आई घरापासून फक्त अर्ध्या तासावर. जॉन आठवड्यातून एकदा आईकडे जायचा. तिथं दोघं एकत्र जेवण करत, कधी खरेदीला जात. काही दिवसांनी आईनं बाल्टिमोरला जॉनच्या बहिणीच्या घराजवळ राहण्याचा विचार केला. म्हणजे आता जॉनच्या घरापासून अर्ध्या तासाऐवजी दीड तासाचं अंतर झालं. अंतर वाढल्यानं फारसा काही बदल होणार नव्हता. पण दोन वर्षांनी जॉनला हे अंतर लांब वाटू लागलं. आईसोबत वेळ घालवण्यासाठी उसंत काढणं थोडं कठीण वाटायला लागलं. तो आता पंधरा दिवसांनी आईकडे जाऊ लागला. थोड्याच दिवसांत आईची तब्येत खालावताना त्यानं पाहिली. एक दिवस जॉनच्या बहिणीचा फोन आला, ‘आई पडलीये आणि तिचं खुब्याचं हाड मोडलंय.’ जॉनला आईच्या मदतीसाठी धावून जाणं आवश्यक वाटलं. इतकी वर्षं आईनं मुलांची काळजी घेतली. मग आता तिच्यासाठी किमान इतकं करणं जॉनला गरजेचं वाटणं स्वाभाविक होतं. आता आपण एक आठवडा रजा घ्यावी, की आईची काळजी घेण्यासाठी एक नर्स ठेवून तिला पैसे देण्याची व्यवस्था करावी? असा प्रश्न त्याच्यासमोर होता. फिलाडेल्फियाचा जॉन काय आणि पुण्यातला जनार्दन काय! एक-दीड तासाचं अंतर काय आणि काही तासांचं किंवा जगाच्या दोन टोकांमधलं अंतर काय! प्रेम आणि थोड्याफार फरकानं प्रश्नसुद्धा तेच असू शकतात.