या संस्थेचे आदिवासींसंदर्भातील संशोधन कार्य संपूर्ण देशासाठी पथदर्शक; जाणून घ्या, राजीव गांधी यांच्या नावे चालणाऱ्या संस्थेविषयी

जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानव, प्राणी आणि वनस्पतीविषयक मूलभूत संशोधन, तंत्रविषयक विकास, प्रशिक्षण तसेच ज्ञानमाहितीची देवाणघेवाण इत्यादी उद्देश साध्य करण्यासाठी हे केंद्र कार्यरत
Rajiv Gandhi Centre for Biotechnology
Rajiv Gandhi Centre for Biotechnology Esakal

सुधीर फाकटकर

विज्ञान तंत्रज्ञान आणि शिक्षणाच्या विकासासाठी काही वैज्ञानिकांनी एकत्र येत १९९० मध्ये थिरूवनंतपुरममध्ये एक संस्था स्थापन केली होती. वर्षभरात या संस्थेने लक्षणीय कामगिरी केल्यानंतर राज्य सरकारने या संस्थेला निधी उपलब्ध करून दिला.

पुढील तीन वर्षात केरळ राज्य विज्ञान परिषदेने या संस्थेचे रूपांतर राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्रात केले. आरंभी बदलत्या कालखंडानुसार मानव, प्राणी आणि वनस्पतीविषयक आजारांवरील उपयोजित संशोधनाचे ध्येय ठेवण्यात आले होते. सन २००२मध्ये संशोधनाची व्याप्ती वाढवत ही संस्था नवीन आवारात कार्यरत झाली.

जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानव, प्राणी आणि वनस्पतीविषयक मूलभूत संशोधन, तंत्रविषयक विकास, प्रशिक्षण तसेच ज्ञानमाहितीची देवाणघेवाण इत्यादी उद्देश साध्य करण्यासाठी हे केंद्र कार्यरत आहे.

या केंद्रात कर्करोग, हृदरोग, मधुमेह या आजारांवर तसेच रोगविज्ञान, प्रजननविषयक जीवविज्ञान, मज्जासंस्था, वनस्पतीविषयक जैवतंत्रज्ञान व रोगविज्ञान असे संशोधन विभाग आहेत. सामाजिकशास्त्र हा स्वतंत्र विभागही आहे.

या विभागांसाठी विविध वर्णपट विश्‍लेषक, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक, जैव प्रतिमा निर्मिती, चाचणी प्राणी शाळा आणि जनुकीय सुविधांच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणित प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांना आधुनिक अभियांत्रिकी कार्यशाळांची जोड देण्यात आलेली आहे.

प्राणी तसेच मानवी चाचण्या-तपासण्या करताना मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करण्यासाठी खास समितीची रचना करण्यात आली आहे. आजारांसंदर्भातील संशोधनासाठी थेट लोकांमध्ये जाऊन काही लाख व्यक्तींच्या चाचण्या-तपासण्या करून माहिती संकलित करत त्यानुसार संशोधन करणे हे संस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

या संस्थेत मुद्रित आणि डिजिटल माध्यमयुक्त समृद्ध मध्यवर्ती ग्रंथालय असून तेथे ग्रंथांबरोबरच जैवतंत्रज्ञानातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील नियतकालिके, अहवाल या ग्रंथालयात आहेत.

जैवतंत्रज्ञान संशोधनाचे हे महत्त्वपूर्ण केंद्र देशभरातील वैद्यकीय प्रयोगशाळा, रेण्वीय पातळीवरील अन्वेषण, औषधनिर्मिती आणि औषधचाचणी संबंधित संस्थांशी जोडलेले आहे.

स्थापनेपासून अवघ्या दोन दशकांमध्ये वीसपेक्षाही जास्त प्रकारचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्वामित्व हक्कांसाठी पात्र ठरलेले असून, या संशोधनांच्या आधारे प्रगत देशांमधील काही उद्योगसमूहांना तंत्रविज्ञान पुरवण्यात आले आहे.

Rajiv Gandhi Centre for Biotechnology
Rajiv Gandhi: काय योगायोग पाहा! ज्यांना मारलं, त्यांच्याच नावाने बनलेल्या हॉस्पिटलमध्ये आला मृत्यू

दुसरीकडे जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने केरळमधील थिरूवनंतपुरम, इडुक्की आणि वायनाड जिल्ह्यातील आदिवासी समूहांसाठी ‘विज्ञान आणि वारसा संशोधन उपक्रम’ हाती घेण्यात आला आहे.

आदिवासी वारशांचा अभ्यास साध्य करून आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रारूपे विकसित करण्यात येत आहेत. बरोबरीने आदिवासींच्या पशुधनावरही जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधन करण्यात येत आहे. या संस्थेचे आदिवासींसंदर्भातील संशोधन कार्य संपूर्ण देशासाठी पथदर्शक ठरलेले आहे.

जैवतंत्रज्ञानाशी संबंधित उद्योग-व्यवसायांसाठी सल्ला व मार्गदर्शन दालन आहे. येथील वैद्यकीय प्रयोगशाळा, रेण्वीय शोध, जनुकीय चाचणी, औषध तपासणी हे विभाग सरकारी संस्थांसाठीही काम करतात.

या संस्थेत जैवतंत्रज्ञ विषयातील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करता येते. याशिवाय पदव्युत्तर पदवीचे शिक्षण सुरू असताना लघु आणि दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम राबवले जातात. एम.एस्सी.नंतर इथे पुढील संशोधन, पीएच.डी. करण्याची संधी मिळू शकते.

याखेरीज जैवमाहिती, रेण्वीय विश्‍लेषण, रेण्वीय अन्वेषण, पेशीविज्ञान, वैद्यकीय प्रयोगशाळा सेवा, जैवतंत्रज्ञान उपकरण जैव प्रतिमानिर्मिती तसेच जैवतंत्रज्ञान कौशल्य विकास या विषयांचे खास प्रशिक्षण दिले जाते.

राजीव गांधी जैवतंत्रज्ञान केंद्र

थायकाऊड पोस्ट, पुजापपुरा, थिरूवनंतपुरम, 695014. केरळ.

संकेतस्थळः https://www.rgcb.res.in

-------------------------

Rajiv Gandhi Centre for Biotechnology
Migrant Labour Education: वीटभट्टींवरील कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित, २००९चा शिक्षण हक्क कायदा कागदावरच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com