भारताच्या आध्यात्मिक अवकाशात त्यांचे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ असलेले दिसते.

रैदासजींनी सर्वभेद विरहित व समताधिष्ठित जगाची कल्पना आपल्या काव्यात मांडलेली दिसते.
sant raidas
sant raidas esakal

डॉ. राहुल हांडे

रैदासजींनी सर्वभेद विरहित व समताधिष्ठित जगाची कल्पना आपल्या काव्यात मांडलेली दिसते. त्यांच्या या कल्पनेमुळे रैदासजी निश्चितच इतर संतापेक्षा वेगळे ठरतात. मध्ययुगातील रैदासजींचा हा ‘युटोपिया’ समजून घेणे वर्तमान समाजासाठी उद्बोधक व उपयुक्त ठरणारा आहे.

खोजत फिंरु भेद वा घर को, कोई न करत बखानी ।

रैदास सन्त मिले मोहि सतगुरु, दीन्ही सुरत सहदानी ।।

मेरो मन लाग्यो हरिजी सूं, अब न रहूँगी अटकी ।

गुरो मिलिया रैदासजी, म्हाने दीनी ज्ञान की गुटकी ।।

नहिं मैं पीहर सासरें, नहीं पियाजी री के साथ ।

मीरांने गोविंद मिल्या जी, गुरुमिलिया रैदास ।।

रैदासजींमुळे आपल्याला ‘सुरत सहदानी’ म्हणजे भक्तीचे सूर स्मृतीचिन्ह म्हणून लाभले. ज्ञानाची ‘गुटकी’ म्हणजे ज्ञानाचा घोट घेता आला. पती, माहेर, सासर यांची साथ नसतांना रैदासजींमुळे मला गोविंद प्राप्ती झाली.

मध्ययुगीन काळात उत्तर भारतातील एक राजपूत महाराणी मीरा चर्मकार समाजातील संत रैदास अथवा रविदास यांना गुरू मानते आणि आपल्या सद्‌गुरूविषयी असे गौरवोद्‌गार काढते.

त्यांनी दिलेला नामजप, संगीत व तंबोरा यांचाच वापर आपल्या आत्मानुभूतीच्या अभिव्यक्तीसाठी करते. एवढेच काय तर चित्तोडगडावर ‘रविदास छत्तरी’ अथवा रविदास समाधी बांधते.

हे सर्व खूपच विलक्षण वाटल्याशिवाय राहणार नाही. आजही बव्हंशी मध्ययुगीन मानसिकतेत वावरणाऱ्या उत्तर भारतात साक्षात मध्ययुगात शुद्र मानल्या गेलेल्या एकाला संतत्व प्राप्त होणे आणि उच्चवर्णीयांकडून त्याला गुरू मानले जाणे, हे सर्व शक्यतेच्या पलीकडचे वाटल्याशिवाय राहत नाही.

असे असले तरी संत रैदासांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि कर्तृत्वाने हे शक्य करून दाखवले. त्यामुळेच उत्तर भारताच्या भक्ती आंदोलनात आणि भारताच्या आध्यात्मिक अवकाशात त्यांचे स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ असलेले दिसते. त्यांच्या आधी महाराष्ट्राच्या भूमीत संत चोखामेळा यांनी हे शक्य करून दाखवले होते.

मध्ययुगातील अन्य संत कवींप्रमाणे रैदासांच्या जीवनासंबधी प्रमाण ऐतिहासिक माहिती-पुराव्यांचा अभाव असलेला दिसतो. त्यात शुद्र ठरवण्यात आलेल्या जातीत जन्मल्यामुळे त्यांच्या ऐहिक जीवनासंदर्भात खूप कमी माहिती उपलब्ध असलेली दिसते. याचा प्रारंभ त्यांच्या नाम निश्चितीपासूनच होतो.

उत्तर भारतात प्रामुख्यानं रैदास अथवा रविदास म्हणून प्रसिद्ध असलेल्या या संताचा उल्लेख रविदास, रायदास, रुद्रदास, रईदास, रोहिदास इत्यादी नावांनीदेखील पाहायला मिळतो. महाराष्ट्रात त्यापैकी रविदास आणि रोहिदास ही नावे अधिक प्रचलित असलेली दिसतात.

रैदासजी बानीमध्ये ८७ पदे आणि तीन साखियाँ आहेत. ज्यामध्ये ‘रैदास’ अशी नाममुद्रा आढळून येते. गुरु ग्रंथ साहिबमध्ये प्रामुख्याने रविदास अशी नाममुद्रा दिसते. राजस्थानात उपलब्ध बहुतेक हस्तलिखितांमध्ये रैदास असाच त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

द लाइफ अॅण्ड वर्क्स ऑफ संत रैदास या ग्रंथात रैदासांच्या काव्याचे संपादन करणारे डॉ. पीटर जी. फ्राइडलेंडर यांच्या मते, ‘नावांची विभिन्न रूपे म्हणजे विभिन्न प्रादेशिक अथवा बोलीतील उच्चारण भेद असावेत.’

त्यामुळे रैदास हेच मूळ नाव असून रविदास, रोहिदास, रायदास इत्यादी सर्व प्रादेशिक उच्चारण भेद ठरतात. आदिग्रंथ अथवा गुरु ग्रंथ साहिबमध्ये रविदास नाममुद्रेसोबतच ते काशी निवासी चर्मकार असादेखील उल्लेख आलेला आहे.

त्यामुळे रैदास आणि रविदास हे एकच आहेत आणि केवळ उच्चारण भेदामुळे रैदासचे रविदास असे झालेले दिसते. काही अभ्यासकांच्या मते रविदास हेच रैदासांचे मूळ नाव आहे आणि उच्चारणातील भेदामुळे ते रैदास झाले. हा तर्क युक्तिसंगत वाटत नाही.

रैदासांच्या नावाप्रमाणेच त्यांच्या जन्म आणि मृत्यूसंबंधी निश्चित विधान करणे अशक्य होते. त्याचबरोबर त्यांचा जीवनप्रवास नेमकेपणाने रेखाटणे शक्य होत नाही. आदिग्रंथात समाविष्ट करण्यात आलेली त्यांची स्वतःची ४० पदे आणि अन्य संतांच्या रचानांमधून त्यांच्या जीवनासंदर्भात काही उल्लेख उपलब्ध आहेत.

त्याच बरोबर हरिराम व्यास यांची व्यासवाणी (इ.स. १५६०), नाभादास यांची भक्तमाल (इ.स. १५८५) व रैदास परचई (इ.स. १५८८), संत सेन नाईकृत रैदास कबीर गोष्ठी (इ.स. १६००), ध्रुवदासकृत भक्त नामावली (इ.स. १५३८ ते १६२३) ,जग्गा आणि संत सेनकृत भक्तमाल (इ.स. १६०० ते १६५०), प्रियादासकृत भक्तिरसबोधिनी (इ.स. १७१२) आणि पोथीप्रेमअमोध (इ.स. १६९३), राघवदासकृत भक्तमाल (इ.स. १७१३) आदी ग्रंथांमध्ये करण्यात आलेले उल्लेख रैदासांच्या जीवनासंदर्भात महत्त्वाचे ठरतात.

तसेच धन्ना जाट, दादू दयाल, मीरा, रज्जब, सुंदरदास, गरीबदास इत्यादी संतांच्या काव्यात रैदासांसंबंधी उल्लेख आढळतात. ह्या सर्व साधनांवरून संशोधकांनी व अभ्यासकांनी रैदासांचे जीवनचित्र रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे असले तरी रैदासांचा जन्मकाल आणि निर्वाणकाल यासंदर्भात अद्याप अभ्यासकांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही.

रैदासांचा जन्म इ.स. १३७६ ते १४४३ आणि मृत्यू इ.स. १५२० ते १५४० एवढ्या मोठ्या अवकाशात आपापल्या परीने बसविण्याचा प्रयत्न पंथ-संशोधक-अभ्यासक यांनी केलेला दिसतो.

sant raidas
संत धन्ना जाट यांचे जीवन म्हणजे कृषिकर्म आणि भक्तिमार्ग यांचे एकरुपत्व!

रैदास पंथाच्या पारंपरिक मान्यतेनुसार रैदासांचा जन्म इ.स. १३७६मधील माघ पौर्णिमेला झाला तर त्यांचे निधन इ.स. १५०६मध्ये झाले. हे मान्य केल्यास रैदासांचे आयुष्य सुमारे १३० वर्षांचे होते.

आधुनिक काळात रैदासांवर संशोधन करणारे पहिले अभ्यासक रामचरण कुरील यांनी रैदासांचा कालखंड इ.स. १४१४ ते १५४० असा मानला आहे. त्याचप्रमाणे रामानंद शास्त्री यांच्या मते रैदासांचा जन्म इ.स. १३८४ ते १३९८ या दरम्यानचा, तर मृत्यू इ.स. १५२० ते १५३८ दरम्यानचा असावा. ए.पी. सिंह रैदासांचा कालखंड इ.स. १३७६ ते १५३८ असा निश्चित करतात.

डॉ.पीटर जी. फ्राइडलेंडर इ.स. १४५० ते १५२० हा रैदासांचा कालखंड मानतात. अशा सर्व मतमतांतराच्या गोंधळात हे स्पष्ट होते की रैदासांच्या कालखंडाविषयी नेमकी माहिती उपलब्ध नाही.

त्यांच्या समकालीन संतांचे कालखंड आणि त्यांच्या काव्यातील रैदासांचा उल्लेख यावरूनच आपण रैदासांच्या कालखंडासंदर्भात अंदाज करू शकतो.

रैदास आणि कबीर हे रामानंदांच्या बारा शिष्यांपैकी होते असे मानले जाते. ह्या दोघांच्या रचनांमध्ये रामनंदांचा उल्लेख येत नाही.

हा मुद्दा काही काळ बाजूला ठेवला तरी रामनंदांच्या व कबीरांच्या कालखंडावरून रैदासांच्या कालखंडाचा अंदाज करता येतो. रामनंद यांचा जन्म इ.स. १३५६ आणि कबीरांचा इ.स. १३९८च्या दरम्यानचा सांगितला जातो.

इ.स. १४१५ साली जन्मलेले धन्ना जाट रैदासांचा उल्लेख अत्यंत आदरपूर्वक करतात. यावरून, रैदास हे रामानंदांपेक्षा वयाने कनिष्ठ, कबीरांचे समवयस्क आणि धन्ना जाटांपेक्षा वयाने ज्येष्ठ ठरतात. तसेच त्यांचा जन्म इ.स. १४१० आणि निर्वाण इ.स. १५००च्या आसपास झाले असावे, असे मत माधव हाडा यांनी व्यक्त केले आहे.

हाडा यांची रैदासांसंदर्भातील काळनिश्चिती त्यातल्या त्यात सयुक्तिक वाटते. शुद्र समजण्यात येणाऱ्या समाजात जन्म झाल्यामुळे जन्माची नोंद नसणे, तसेच केवळ परमेश्वर आणि पारलौकिकाचा अनुभव आपल्या काव्यातून व्यक्त करण्याची परंपरेमुळे स्वतःच्या जीवनप्रवासाचा काहीच उल्लेख काव्यात येऊ न देणे, यामुळे रैदासांप्रमाणे अनेक संतांच्या बाबतीत हा ऐतिहासिक घोळ निर्माण झालेला दिसतो.

sant raidas
Theme Calendar : पंचवीस कॅलेंडरचा सुरेल प्रवास

रैदासांचा जन्मकाळ निश्चित नसला तरी त्यांचे जन्मस्थान काशीविषयी सर्व अभ्यासकांमध्ये एकवाक्यता आहे. त्याचप्रमाणे चर्मकार समाजात त्यांचा जन्म झाला यालादेखील सर्व अभ्यासक मान्यता देतात. जन्मस्थान आणि जात यासंदर्भात रैदासांच्या रचनांमधूनच दाखले उपलब्ध आहेत.

जाके कुटुंब के ढेढ सब ढोर ढोवंत

फिरहिं अजहूँ बनारसी आस पासा ।

आदिग्रंथ आणि रैदास परचाईमधील काव्यरचनादेखील रैदासांच्या जात व गाव यांच्या संदर्भात निर्वाळा देतात. रैदासजी आपल्या परचाईमध्ये म्हणतात -

नंगर बांराणसी उतिम गांव पाप न नेरों आवै काउं ।

मुवा न कोई नरकहि जावै ।

संकर रामहिं आनि सुंनावै ।

श्रुति सुम्रित का ये अधिकारा ।

तहाँरैदास लीयौ अवतारा ।

वाराणसी नगर अत्यंत पवित्र असून येथे पाप कोणाच्या जवळ येऊ शकत नाही. येथे मृत पावलेला कोणीही नरकात जात नाही. शंकर व रामाची शपथ येथे घेतली जाते. श्रुती व स्मृती यांचे येथे कायम वर्चस्व असलेले दिसते. अशा नगरात रैदासाने जन्म घेतला.

अशाप्रकारे वाराणसीचा गौरव करणाऱ्या रैदासांच्या आदिग्रंथात समाविष्ट पदांमध्ये दोन ठिकाणी जन्मस्थान म्हणून काशीचा उल्लेख आलेला दिसतो. काशी महात्म्य आणि भविष्य पुराण ग्रंथांमध्येदेखील याला दुजोरा देण्यात आलेला आहे.

रैदासांची जन्मभूमी व कर्मभूमी काशी निश्चित झाली असली तरी काशीत त्यांचा जन्म नेमक्या कोणत्या ठिकाणी झाला, यासंदर्भात अभ्यासकांमध्ये दोन पक्ष असलेले दिसतात. काही अभ्यासक रैदासजींचा जन्म काशी नजीकच्या मंडुआडीह येथे झाला, असे सांगतात तर काही अभ्यासक काशीजवळील सीर गोवर्धनपूरला त्यांचं जन्मस्थान मानतात.

यातील मंडुआडीह येथे जन्माची धारणा पारंपरिक असून सीर गोवर्धनपूर येथे जन्माची धारणा आधुनिक काळातील आहे. काही अभ्यासकांनी रैदासजींचे जन्मस्थान राजस्थानमधील मंडोर तर काहींनी पश्चिम उत्तरप्रदेश सांगितले आहे.

अशा अभ्यासकांच्या मांडणीला कोणताही भक्कम पुरावा आढळत नाही. कदाचित रैदासजींनी आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात प्रवास केला असल्याने त्यांच्यासंदर्भातील स्मृती देशाच्या अनेक भागांमध्ये आढळतात.

sant raidas
Sant Janabai: स्त्री संत आपली परमेश्वरभक्ती कशा व्यक्त करीत असतील?

रैदासजींच्या जन्मस्थानाबद्दल असे मतभेद असले तरी त्यांच्या जातीबद्दल कोणताही वाद अभ्यासकांमध्ये असलेला आढळत नाही.

आपल्यासारख्या जातिग्रस्त देशात माणसाच्या जीवनासंदर्भातील सर्व पुरावे नष्ट होऊ शकतात अथवा उपलब्ध होऊ शकत नाही. त्याची इहलोकातील सर्व ओळख पुसली गेली तरी त्याची जात मात्र कदापि पुसली जात नाही.

याला रैदासजी तरी कसे पारखे असणार. संत चोखामेळांप्रमाणे रैदासजींनीदेखील आपल्या काव्यात काही ठिकाणी स्वतः जातिगत शुद्रत्वाचा उल्लेख केलेला आढळतो.

ऐसी मेरी जाति विख्यात चमारं ।

जाति चंमार पिता अरुमांई साकित के घर जनम्यो आई ।

माझी जात चर्मकार म्हणून प्रसिद्ध आहे. शाक्त असलेल्या चांभार माता-पित्यांच्या पोटी आपला जन्म झाला, असे म्हणणाऱ्या रैदासजींनी सर्वभेद विरहित व समताधिष्ठित जगाची म्हणजेच ‘युटोपिया’ची कल्पना आपल्या काव्यात मांडलेली दिसते.

त्यांच्या या कल्पनेमुळे रैदासजी निश्चितच इतर संतापेक्षा वेगळे ठरतात. मध्ययुगातील रैदासजींचा युटोपिया समजून घेणे वर्तमान समाजासाठी उद्‍बोधक व उपयुक्त ठरणारा आहे.

----------------

sant raidas
परमेश्वराची भेट कुठे होईल विचारणारे हे दांपत्य!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com