फाळणीने मनावर झालेले आघात चित्रातून मांडणारे महान कलाकार कोण? जे गेल्यानंतर मोदींनीही व्यक्त केली होती हळहळ

शिल्पकला, म्युरल म्हणजे भित्तिचित्रकला, वास्तूकला, कोलाजचित्रं अशा अनेक कला प्रकारात त्यांनी समर्थपणे आपली नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवली
Satish Gujral  was an Indian painter, sculptor, muralist and writer of the post-independent era.
Satish Gujral was an Indian painter, sculptor, muralist and writer of the post-independent era.Esakal

कोणत्याही गटात किंवा कंपूत सामील न होता प्रसिद्धी पराङ्‌मुख सतीश गुजराल शांतपणे कलानिर्मिती करत राहिले. प्रयोगशील, आधुनिक पण तरीही अस्सल भारतीय शैलीत एखाद्या एकांड्या शिलेदाराप्रमाणे गुजराल विविध माध्यमातून अत्यंत दर्जेदार कलाकृती निर्माण करत राहिले.

डॉ. सुहास भास्कर जोशी

“अचानक पहाटे जाग आली, तेव्हा मला जाणवलं, की मला काहीच ऐकू येत नाहीये... ना कावळ्यांची कावकाव, ना चिमण्यांची चिवचिव, ना अंगणातील हँडपंपचा आवाज, ना नोकरांची धांदल ... मला फक्त प्रकर्षानं खूप काहीतरी मौल्यवान गमावल्याची जाणीव झाली,” भारतीय दृश्यकलेचे अनभिषिक्त सम्राट - महान चित्रकार, शिल्पकार, भित्तिचित्रकार, वास्तुशिल्पकार, आणि लेखक सतीश गुजराल यांनी त्यांच्या बालपणाचा हा अनुभव एका मुलाखतीत सांगितला होता.

अनपेक्षितपणे झालेल्या एका जबरदस्त अपघातानंतर गुजराल यांच्या एका पायावर तर आघात झालाच, पण मुख्य म्हणजे त्यांची ऐकण्याची क्षमता निघून गेली. मुलाखतीत ते पुढं म्हणतात, “जेव्हा मला माझ्या बालपणाविषयी विचारलं जातं, तेव्हा मला आठवतं ते पायावरच्या शस्त्रक्रियेमुळे आणि कानाच्या बधीरपणामुळे अंथरुणावर झोपून घालवलेलं बालपण.

या अपघाताचा आघात केवळ माझ्या ऐकण्या-बोलण्या-चालण्याच्या क्षमतेवरच नाही, तर तो माझ्या आत्मविश्वासावर आणि आत्मसन्मानावर झाला.”

या काळात त्यांनी बिछान्यात पडल्या पडल्या गालिब आणि इक्बाल यांचं साहित्य वाचलं. कवी-लेखक यांनी उभारलेल्या जगात रमणाऱ्या गुजराल यांचा कठोर वास्तवाशी संपर्क तुटला, आणि त्यांच्या प्रतिभेने कल्पनारम्य जादुई विश्वात प्रवेश केला. वडिलांनी त्यांच्या हातात हलकेच रंगांनी भरलेली पॅलेट दिली, आणि त्यांच्या शांत भावविश्वातील अस्वस्थ सूर ब्रशच्या माध्यमातून कॅनव्हासवर आपसूक उमटत राहिले.

सतीश गुजराल यांचं कलाकर्तृत्व हे मात्र केवळ कॅनव्हासवर रंगवलेल्या पेंटिंगपुरतं मर्यादित नाही, तर शिल्पकला, म्युरल म्हणजे भित्तिचित्रकला, वास्तूकला, कोलाजचित्रं अशा अनेक कला प्रकारात त्यांनी समर्थपणे आपली नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवली आहे. या संदर्भात सतीश गुजराल स्वतःच एके ठिकाणी म्हणतात, “मी एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे का वळत राहिलो? ...

जेव्हा तुम्हाला तुमच्यावर लादलेल्या शांततेत जगावं लागतं, तेव्हा तुमच्या अस्तित्वाविषयीच तुम्हाला शंका येऊ लागते. त्यावर हालचाल हाच एक उपाय असतो. जर तुमच्या समोरच्या वस्तूत गतीमानता असेल, तर ती गतीमानताच तुम्हाला तुम्हीही अस्तित्वात आहात, काहीतरी करताय असा विश्वास देते. आणि यातूनच मला माझं उत्तर सापडलं – सतत काहीतरी नवनवीन करत राहायचं. वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःला शोधत राहायचं.”

‘पद्मविभूषण’सह अनेक मानसन्मान प्राप्त करणाऱ्या सतीश गुजराल यांनी आपल्या चौऱ्याण्णव वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात विविध कलामाध्यमं अत्यंत कौशल्याने हाताळली. अशा सतीश गुजराल यांचं आयुष्य वेधक आणि प्रेरणादायी आहे, यात शंका नाही.

सतीश गुजराल यांचा जन्म २५ डिसेंबर, १९२५ रोजी तेव्हाच्या ब्रिटिश भारतातील पंजाबमधील झेलम येथे (हा प्रदेश आता पाकिस्तानात आहे.) पंजाबी खत्री कुटुंबात झाला. (यावर्षी २५ डिसेंबरला सतीश गुजराल यांच्या जन्मशताब्दीस सुरुवात होईल.)

वडील नारायण गुजराल हे राजकीय नेते होते. वयाच्या आठव्या वर्षी सतीश यांना झालेल्या अपघातात एक पाय तर अधू झालाच, पण कानावर जोरदार आघात झाल्यानं नशिबी बहिरेपण आलं.

वडिलांनी मुलाची चित्रकलेतील रुची ओळखून त्याला लाहोरच्या प्रसिद्ध मेयो आर्ट स्कूलमध्ये दाखल केले. इथे सतीश यांनी चित्रकला आणि शिल्पकला या दोन्हींचे शिक्षण घेतले. इंदरजीत ऊर्फ इमरोज या नंतर प्रसिद्ध झालेल्या चित्रकाराशी त्यांची मैत्री झाली.

मोठा भाऊ इंद्रकुमार गुजराल (एप्रिल १९९७ ते मार्च १९९८ या काळातील भारताचे पंतप्रधान) यांच्यामुळे सतीश यांचा परिचय कवी-लेखक फैज अहमद फैज, अली सरदार जाफरी आणि कृष्ण चंदर यांच्याशी झाला.

या तिघांच्या विचांराचा आणि साहित्याचा प्रभाव सतीश यांच्यावर पडला. हिंदी आणि उर्दू भाषेचं ज्ञान त्यांना आधीच होतं, पण या तिघांमुळे सतीशना उर्दू शायरीत रस निर्माण झाला. इंग्रजी भाषेचं अज्ञान हा मात्र त्यांच्यापुढं मोठा प्रश्न होता. ऐकू येत नसल्यानं भाषा शिकणं अत्यंत अवघड होतं. विशेषतः मुंबईला जे.जे.स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकताना त्यांना हा प्रश्न भेडसावत होता. नंतर अत्यंत कष्टाने आणि प्रयत्नपूर्वक ते इंग्रजी भाषा शिकले.

गायतोंडे, रझा, सूझा, जहांगीर सबावाला हे त्यांचे तेथील सहाध्यायी-मित्र. जे.जे.मध्ये म्युरल म्हणजे भित्तिचित्रं शिकण्याकडे त्यांचा विशेष कल होता. १९४६मध्ये लाहोरला परत येऊन त्यांनी आपला स्टुडिओ थाटला.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर गुजराल पाकिस्तानातून भारतात आले, पण फाळणीच्या जखमांनी त्यांचं मन विदीर्ण झालं. स्थलांतरितांच्या वेदनांचा गुजराल यांच्या भावविश्वावर खोलवर परिणाम झाला. आणि यातूनच त्यांनी पार्टिशन १९४९-५४ ही चित्रमालिका सादर केली. त्यांनी म्हटलं होतं, “I didn’t paint partition; I painted my sufferings.”

फाळणीचे त्यांच्या मनावर झालेले आघात या चित्रांमधून स्पष्ट दिसतात. काळ्या-करड्या, यलो ऑकर, तपकिरी रंगातील स्त्री-पुरुषांचे भकास-उद्ध्वस्त चेहरे दर्शविणाऱ्या या चित्रमालिकेनं कलाविश्वाचं लक्ष वेधून घेतलं. या चित्रमालिकेतील सर्वात चर्चिलं गेलेलं पेंटिंग म्हणजे डिस्पेअर (Despair) होय.

फाळणीनंतर सात वर्षांनी म्हणजे १९५४ साली तैलरंगात रंगवलेलं हे चित्र ८६ X ८६ सेंटीमीटर या आकाराचं आहे. पिवळ्या, तपकिरी, काळ्या आणि करड्या रंगात रंगवलेल्या या पेंटिंगमध्ये फाळणीच्या असह्य दुःस्वप्नाचा अनुभव घेतलेल्या भारतीयांचे वेदनेनं पिळवटलेले व्याकूळ चेहरे प्रतीक रूपानं समोर दिसतात.

चित्रामध्ये तीन व्यक्ती असून त्यातील मध्यभागी असणारी पांढऱ्या पोषाखातील व्यक्ती दु:खातिरेकानं मागं-पुढं झुलतेय, आणि इतर दोन व्यक्ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१६ साली न्यू यॉर्क येथे ख्रिसटीज या संस्थेने आयोजित केलेल्या लिलावात या पेंटिंगला सव्वा लाख अमेरिकी डॉलर इतकी प्रचंड किंमत मिळाली होती.

या मालिकेशिवाय गुजराल यांनी काही उत्कृष्ट पोर्ट्रेट केली. यामध्ये लाला लजपतराय, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, बंधू इंद्रकुमार गुजराल यांची पोर्ट्रेट विशेष उल्लेखनीय आहेत.

किरण यांच्याशी विवाह झाल्यानंतर गुजराल यांच्या पॅलेटवर प्रसन्न, उजळ रंग अवतरले.

म्युरल करण्यात गुजराल यांना रस होताच. मेक्सिकोतील एका संस्थेची शिष्यवृत्ती मिळताच गुजराल हे म्युरल निर्मितीचं पद्धतशीर शिक्षण घेण्याकरिता मेक्सिकोला गेले.

तिथे त्यांनी दिएगो रिव्हिएरा आणि डेव्हिड सिक्वेरोज अशा प्रख्यात म्युरल कलावंतांच्या हाताखाली शिक्षण घेतले. परत आल्यावर गुजराल यांनी चंडीगड विद्यापीठ, दिल्लीचं ओबेरॉय हॉटेल, गांधी भवन येथील म्युरल करून कलाविश्वाचं लक्ष वेधून घेतलं. जोडीला गुजराल शिल्पकृती करण्यातही रमले होते.

यामध्ये गणेश हे १९ X १८ इंच आकाराचं काष्ठशिल्प विशेष उल्लेखनीय आहे. उठावदार, लयबद्ध, अमूर्त आकाराचं असं हे शिल्प आहे. १९५२ ते १९७४ या काळात गुजराल यांच्या चित्र-शिल्पांची प्रदर्शनं दिल्ली, न्यू यॉर्क, टोकियो, मॉन्ट्रियल, बर्लिन अशी जगातील अनेक शहरांत भरली. १९७५मध्ये देशात आणीबाणी जाहीर झाली होती. जनतेवर बंधनं घातली गेली होती. गुजराल यांनी दोरांनी जखडलेली काष्ठशिल्पं सादर करून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.

१९८०च्या दशकात गुजराल यांचं लक्ष वास्तुकलेकडं वळलं. चित्रकला, शिल्पकला आणि भित्तिचित्रं या सगळ्यांचा अनोखा संबंध गुजराल यांना वास्तुकलेत जाणवला. उद्योगपती बी.के.मोदी यांचं दिल्लीतील निवासस्थान आणि फार्म हाऊस डिझाईन करून गुजराल यांनी वास्तुकलेच्या क्षेत्रात प्रवेश केला.

त्यांनी केलेली दिल्लीतील युनेस्कोची इमारत, गोवा विद्यापीठातील इमारती, तसेच ओबेरॉय व ताज ग्रुपच्या हॉटेलांच्या अनेक इमारतींची डिझाईन कलाविश्वात कौतुकाची विषय ठरली. मात्र गुजराल यांना खऱ्या अर्थानं वास्तुकलेच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त झाला, तो १९८४ साली त्यांनी डिझाईन केलेल्या दिल्लीतील बेल्जियन वकिलातीमुळे.

स्वातंत्र्योत्तर काळात रूढ झालेल्या वास्तुकलेशी सुसंगत ही वास्तुरचना असून, अमूर्त आधुनिकतेपेक्षा भौगोलिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाशी नातं सांगणारी ही रचना आहे. या वकिलातीचं काम चालू होतं, तेव्हा झालेल्या अपघातामुळे गुजराल यांच्या पायावर शस्त्रक्रियांची मालिकाच चालू होती. स्ट्रेचर-चेअरवर साइटवर येऊन गुजराल पाहणी करत असत.

आकर्षक रंगसंगती, वैशिष्ट्यपूर्ण माध्यमांचा वापर आणि खुला अवकाश यांमुळे वकिलातीची ही वास्तू म्हणजे विसाव्या शतकातील विलक्षण वास्तुशिल्प बनली आहे. सतीश गुजराल यांचा मुलगा मोहित हादेखील उत्कृष्ट आर्किटेक्ट असून, त्याला आपल्या वडिलांच्या वास्तुकौशल्याबद्दल कौतुक आहे.

त्यानं म्हटलं आहे, “ही बेल्जियन वकिलात म्हणजे आधुनिक भारतातील वास्तुकलेच्या क्षेत्रातील मैलाचा दगड आहे.” इंटरनॅशनल फोरम ऑफ आर्किटेक्ट्‌स या संस्थेने या वकिलातीचा गौरव ‘विसाव्या शतकातील उत्कृष्ट इमारतींपैकी एक’ अशा शब्दात केला होता. बेल्जियन सरकारनेही गुजराल यांचा ‘क्राऊन इन आर्किटेक्चर’ हा किताब देऊन सत्कार केला होता.

१९९८मध्ये यशस्वी शस्त्रक्रियेनंतर गुजराल यांना त्यांची श्रवणशक्ती परत मिळाली. याचा आनंद गुजराल यांनी ‘संगीताचे आविष्कार’ ही चित्रमालिका रंगवून व्यक्त केला. गुजराल यांना क्रिकेटचेही वेड होते. एकविसाव्या शतकात टी-ट्वेंटी क्रिकेटची वाढती लोकप्रियता जाणून घेऊन त्यांनी त्यावरही चित्रमालिका केली.

ए ब्रश विथ लाइफ या आत्मचरित्राशिवाय गुजराल यांनी ड्रॉईंग्ज, पेंटिंग्ज विषयांवर चार पुस्तकं लिहिली आहेत.

कलेच्या विविध क्षेत्रात इतकी जबरदस्त कामगिरी करणाऱ्या प्रतिभावान कलावंतावर पुरस्कार आणि मानसन्मान यांचा वर्षाव होणं अगदी स्वाभाविकच होतं. १९५६ आणि १९५७ साली गुजराल यांना ‘नॅशनल अवॉर्ड फॉर पेंटिंग’, तर १९७२ साली ‘नॅशनल अवॉर्ड फॉर स्कल्प्चर’ हे पुरस्कार प्राप्त झाले. बेल्जियन सरकारने त्यांचा गौरव केला होताच, पण त्याशिवाय मेक्सिकन सरकारने त्यांना लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देऊन सत्कार केला.

वर्ल्ड कल्चरल कौन्सिलने त्यांना ‘लिओनार्दो दा विंची अवॉर्ड’ देऊन त्यांचा उचित सन्मान केला. २०१४ साली ‘एनडीटीव्ही इंडियन ऑफ द इयर’ हा बहुमान त्यांना प्रदान केला गेला. भारत सरकारनेदेखील ‘पद्मविभूषण’ हा द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान त्यांना देऊन त्यांचा यथोचित गौरव केला.

कोरोनाने साऱ्या जगावर आक्रमण केलेले असताना २६ मार्च, २०२० रोजी भारतीय दृश्य कलेच्या या अनभिषिक्त सम्राटाने आपला अखेरचा श्वास घेतला.

कोणत्याही गटात किंवा कंपूत सामील न होता, प्रसिद्धी पराङ्‌मुख गुजराल शांतपणे कलानिर्मिती करत राहिले. प्रयोगशील, आधुनिक पण तरीही अस्सल भारतीय शैलीत एखाद्या एकांड्या शिलेदाराप्रमाणे गुजराल विविध माध्यमातून अत्यंत दर्जेदार कलाकृती निर्माण करत राहिले.

त्यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना अत्यंत सार्थ गौरवोद्‍गार काढले होते- “सतीश गुजराल हे एक महान प्रज्ञावान आणि बहुआयामी कलावंत होते. त्यांच्या असामान्य प्रतिभेने त्यांनी जगभर आपले चाहते निर्माण केले होते, पण त्यांच्या कलेची आणि व्यक्तिमत्त्वाची मुळं कायम भारतीय मातीशी जोडलेली राहिली.

उच्च दर्जाची सर्जनशीलता आणि शारीरिक प्रतिकूलतेवर मात करण्याची प्रखर जिद्द याकरिता त्यांची सदैव प्रशंसा केली जाईल.” सतीश गुजराल यांच्यासारख्या महान प्रतिभावंताचं कौतुक यापेक्षा आणखी वेगळ्या शब्दात कसं करता येईल ?

-------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com