

Everest
esakal
मृणालिनी चितळे
एव्हरेस्टच्या वाटेवर वैयक्तिक प्रयत्नांइतकीच निसर्गाची आणि शेर्पांची साथही महत्त्वाची ठरते. म्हणूनच या शेर्पांना ‘हाय अल्टिट्यूड डॉक्टर्स’ म्हटलं जातं. एव्हरेस्टच्या वाटेवर मृत्युमुखी पडणाऱ्या माणसांपैकी एक तृतीयांश माणसं शेर्पा जमातीतली असतात. एवढी एकच गोष्टही त्यांचं काम किती जिकिरीचं, धाडसाचं आणि धोक्याचं असतं यावर प्रकाश टाकायला पुरेशी आहे.
हिमालयातील माझा पहिलाच ट्रेक होता तो. बऱ्यापैकी उंच टेकडी उतरून जेमतेम दीड किलोमीटर अंतर पार केलं नसेल, तेवढ्यात लांबवर एक मळकट पांढरा पट्टा दिसला. वाटेत चकाकणारे अभ्रकाचे कितीतरी खडक लागले होते. वाटलं, हा चुनखडीचा प्रकार असावा, पण जवळ गेल्यावर कळलं, की ती चक्क हिमनदी होती! वरून गोठलेला बर्फ नि आत खळाळत वाहणारं पाणी. वाट अशी नव्हतीच. पाय रोवून आपल्यापुरती बर्फामध्ये पाऊलवाट तयार करायची. हिमनदीचा उतारही जबरी होता. पाण्यातून चालायला लागल्यामुळे पायातले बूटच नाही, तर आतले मोजेसुद्धा ओले कच्च झालेले. थंडीनं नि भीतीनं माझे पाय लटपटत होते. आमच्याबरोबर असलेल्या निमा शेर्पाच्या पायात मात्र साध्या स्लिपर्स होत्या. गालिचावरून चालावं इतक्या सहजपणे माझा हात धरून तो मला पुढेपुढे नेत राहिला. थंडी, ऊन, वारा, पाऊस यांची गणितं शेर्पांच्या दृष्टीनं किती वेगळी असतात याची ही पहिली झलक होती.