दा. कृ. सोमण
महाराष्ट्रात होलिका प्रदीपनाच्या दिवशी प्रदोषकाळात मधोमध आंबा किंवा एरंड झाडाची फांदी पुरली जाते. तिच्या सभोवताली गवत, पालापाचोळा, गवऱ्या, लाकडे घालून त्याची होळी केली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन करावयाचे असते. यादिवशी आणि रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना रंग लावण्याची प्रथा आहे.
फाल्गुन महिन्यात पानगळ होते. घराच्या परिसरात पानगळ झाल्याने, पानांचा कचरा निर्माण झाल्याने अस्वच्छता होऊन रोगराई पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे मुले आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पानगळीत पडलेला पालापाचोळा एकत्र करून तो जाळण्याची प्रथा पडली असावी.
परिसराची स्वच्छता केल्यावर अस्वच्छतेची ढुंढा राक्षसीण मुलांना आजारी पाडीत नाही, म्हणून होलिका दहनाची प्रथा पडली असावी. घर-परिसर आणि मनातील विकृती दूर करत (परगेशन ॲाफ माइंड), रंगांची उधळण करत वसंत ऋतूचे आनंदाने स्वागत करण्यासाठी होळीचा सण येत असतो.