अमोघ वैद्य
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंडपात गणेशाच्या विविध रूपांनी असंख्य नक्षी चमकत असते. काही रूपं सर्वज्ञात अष्टविनायकांप्रमाणे लोकमान्य, तर काही रूपं जणू इतिहासाच्या अथांग सागरात दडलेले मोती... केवळ शोधक दृष्टीने पाहिल्यावरच डोळ्यांसमोर येणारे. गणपतीची ही रूपं केवळ विघ्नहर्त्याची नव्हे, तर कला, शिल्प, अध्यात्म आणि श्रद्धेची अद्वितीय अशी दीपस्तंभ आहेत. ह्या महासागरातून मला भावलेल्या आणि हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवलेल्या काही अद्वितीय गणपतीरूपांची ही यात्रा...
जळगाव जिल्ह्यातील प्रवाळ क्षेत्र पद्मालय
अनेकांनी गणपतीची मंदिरं पाहिली असतील; मात्र बहुतेक ठिकाणी गाभाऱ्यात एकच मूर्ती विराजमान असते. पण जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातलं श्री क्षेत्र पद्मालय मंदिर याला अपवाद ठरतं. इथं केवळ एकच नव्हे, तर डाव्या सोंडेचा एक आणि उजव्या सोंडेचा एक अशा दोन गणपतींचा एकत्र साक्षात्कार घडतो.
गणरायाच्या अडीच पिठांपैकी हे स्थान ‘अर्धपीठ’ म्हणून ओळखलं जातं. प्रवाळ क्षेत्र पद्मालय या नावानंही हे तीर्थक्षेत्र भक्तांच्या मनात खोलवर रुजलं आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं हे ठिकाण एरंडोल शहरातून जाणाऱ्या नागपूर–सुरत एशियन महामार्गापासून अवघ्या १२ किलोमीटरवर, तर जळगावपासून साधारण २५ किलोमीटरवर आहे.