पुस्तक परिचय । डॉ. शिरीष चिंधडे
राजेन्द्र बनहट्टी हे कसलेले कथा-कादंबरीकार आहेत. कथनकला आणि कादंबरी या वाङ्मयप्रकारांवर त्यांची उत्तम हुकूमत आहे. संघर्षाविना नाट्य नाही आणि नाट्याविना रंजकता नाही, हे तत्त्व त्यांना उत्तमरितीने अवगत आहे.
शुद्धिपत्र या त्यांच्या कादंबरीत हे सर्व रसायन चपखलपणे जमले आहे. मात्र, केवळ रंजकतेच्या कुंपणापुरते हे लेखन मर्यादित नाही. ते भेदून लेखक अतिशय सूक्ष्मपणे आणि कलात्मकरितीने आजच्या त्रस्त करणाऱ्या बौद्धिक वातावरणाचे विश्लेषण करतात. समाजातील विध्वंसक प्रवृत्तींना ते सूक्ष्मदर्शक भिंगाखाली आणून त्यांचे खरे रूप उघड करतात. या अर्थाने शुद्धिपत्र ही समस्याप्रधान, गंभीर आणि चिंतनशील स्वरूपाची लेखनकृती आहे.
‘शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरा,’ असे इशारेवजा वाक्य कधी एखाद्या दुकानाच्या पाटीवर किंवा ट्रकच्या मागे लिहिलेले दिसते. राजेन्द्र बनहट्टी यांची शुद्धिपत्र ही ताजी कादंबरी शब्दरूपी शस्त्र अनपेक्षितपणे आणि अयोग्यरितीने एखाद्याला जखमी करू शकते, याची वेधक कहाणी सांगते.