डॉ. अंबरीष खरे
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला गेलेला वैशिष्ट्यपूर्ण दिवस असून तो केवळ नवीन खरेदीसाठी नव्हे, तर समाजोपयोगी आणि धार्मिक विधी करून व दान देऊन अमर्याद पुण्यफल साठविण्याची संधी उपलब्ध करून देणारा म्हणून भारतीय परंपरेमध्ये विशेष महत्त्वाचा सण मानला गेला आहे.
कालगणनेप्रमाणे वर्षातील दुसरा महिना म्हणजे वैशाख. या महिन्यातील पौर्णिमेला चंद्र विशाखा नक्षत्रात असल्याने त्या नक्षत्रावरून वैशाख असे नाव या महिन्याला दिले गेले आहे. ऋतुमानाच्या दृष्टीने पाहावयाचे झाल्यास वैशाख महिन्यात वसंताचा आल्हाददायकपणा कमी होऊन हवेतील उष्मा हळूहळू वाढू लागतो.
वसंत ऋतूमध्ये वृक्षांना आलेल्या फुलांचा बहर ओसरून फळे धरू लागतात. वसंतातील तरुण सृष्टी जणू प्रौढ होऊन मातृत्वाचे गुण धारण करते. कलिंगड, खरबूज, लिंबू यांसारखी रसदार फळे उपलब्ध होऊ लागतात. हवेतील उष्णतेमुळे तहानेची भावना वाढीस लागते. त्यामुळे थंडगार पाणी, विविध सरबते, कैरीचे पन्हे यांसारख्या पेयांचे महत्त्व वाढते. या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या सणांमध्येदेखील या साऱ्याची दखल घेतलेली दिसते.