कवी ना.घ. देशपांडे यांचे नदीकाठची रोमँटिक कथा सांगणारे गीत..

निःसंकोच शारीरिक प्रेमगीतांची सुरुवात करून देणारे कवी ना.घ. देशपांडे
romantic marathi song
romantic marathi song Esakal

हेमंत गोविंद जोगळेकर

मागच्या तीन लेखांकांतील गीते नववधूची होती. यावेळचे गीत आहे विवाहपूर्व प्रेमाचे आणि ते आहे मराठी कवितेत निःसंकोच शारीरिक प्रेमगीतांची सुरुवात करून देणारे कवी ना.घ. देशपांडे यांचे -नदीकिनारी.

ठिकाणही मोठे रोमँटिक आहे. नदीचा किनारा, तिथे निवेदक आणि त्याची प्रिया यांच्याशिवाय दुसरे तिसरे कोणीही नाही. वेळही संध्याकाळची आणि निसर्गही या प्रेमिकांना साथ देणारा. निळ्या काजळी ढगात सांज पांगलेली आणि वर ढवळ्या बगळ्यांची संथ भरारी. बालकवींप्रमाणे ना.घ.देखील रंगांचा उल्लेख केल्यावाचून राहत नाहीत आणि हे रंगही एकमेकांशी संधान बांधणारे!

अशा वातावरणात तिच्या डोळ्यात संमती दिसताच, निवेदक तिच्या अंगावर पाणी उडवतो आणि त्यामुळे उठून दिसलेली तिच्या उराची नवी थरारी निःसंकोच पाहतो. स्त्री-पुरुष प्रेमातले असे शारीर आकर्षण ना.घ. नाकारत नाहीत. धीटपणे व्यक्त करतात.

भवतालची राने आणि रात्र चंचल गाणे गाऊ लागताच, या युगुलाला जगाचाही विसर पडतो. हे सूचित करण्यासाठी ना.घ. त्यांना ‘दोन फरारी’ म्हणतात आणि तिथेच हे गीत पूर्णत्वाला जाते.

या गीताचा विशेष म्हणजे त्यातील दृश्यमयता. निळ्या का‍ळ्या ढगासमोरून उडत जाणारी शुभ्र बगळ्यांची माळ, तिच्याकडे लक्ष वेधून घेणारी तिची हिरवी साडी आणि साडीच्या पिवळ्या लाल किनारी सारेच आपल्याला दिसू लागते.

साडीची सळसळ, पदराची फडफड ऐकू येऊ लागते. गुडघाभर पाण्याचा उल्लेख ऐकून, न सांगताही तिच्या उघड्या पोटऱ्यांना होणाऱ्या पाण्याच्या स्पर्शाची आपण कल्पना करू लागतो. अशा सर्व ऐंद्रीय संवेदना ना.घ. या गीतातून प्रत्ययाला आणून येतात.

नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी, गऽ!

अवतीभवती नव्हते कोणी

नाचत होत्या राजसवाणी

निळ्या जळावर सोनसळीच्या नवथर लहरी, गऽ

दुसरे तिसरे नव्हते कोणी;

तुझेच हसले डोळे दोन्हीः

अवखळ बिजली भरली माझ्या उरात सारी, गऽ !

...

सळसळली गऽ, हिरवी साडी;

तिनेच केली तुझी चहाडीः

फडफडल्या पदराच्या पिवळ्या लाल किनारी, गऽ !

वहात होते पिसाट वारे;

तशात मी उडविले फवारेः

खुलून दिसली तुझ्या उराची नवी थरारी, गऽ !

कुजबुजली भवताली राने;

रात्र म्हणाली चंचल गाणेः

‘गुडघाभर पाण्यात दिवाणे दोन फरारी, गऽ’ !

नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी, गऽ !

romantic marathi song
Jhimma 2 Marathi Pori Song: "मराठी पोरी दुनियेला दाखवतील माज" झिम्मा 2 मधलं पहिलं धम्नाल गाणं बघाच

दुसरा विशेष म्हणजे यातील शब्दांची नेमकी अर्थपूर्ण निवड. तिच्या उराच्या थरारीला ‘नवी’ म्हणताच आपल्याला तिथे वय समजते. निवेदकाकडे लक्ष वेधणारे तिच्या साडीचे रंग तिची ‘चहाडी’ करतात.

प्रत्येक कडव्यात ना.घ. यांनी साधलेले अनुप्रास; निळ्या, काजळी, ढवळी, बगळे असे ‘ळ’चे अनुप्रास; वारे, फवारे, ऊर, भरारी, थरारी असे ‘र’ चे आणि प्रत्येक कडव्यानंतर येणारा ‘ऽग’ गीताला नादमधुर करतात. जी.एन. जोशींसारख्या गायकाने त्याला वेधक चाल लावून ध्वनिमुद्रिका करवून घेऊन ना.घं.च्या या गीताला जनमानसात अजरामर केले आहे. शृंगारगीतांचे नवे दालनच त्यांच्या गीतांनी उघडले.

त्यांची रानारानात गेलेली शीळ तेव्हाच्या युवकांच्या मनात घुमत राहिली आणि मग इतर गीतकारांच्या गीतांतून उमटत राहिली. ना.घं.च्या आधीच्या भा.रा.तांबे यांच्यासारख्या कवींनी कुटुंबवत्सल प्रेमाची गाणी लिहिली.

बालकवींसारख्या निसर्गकवीच्या कवितेत रविकिरणाच्या प्रेमात पडणारी फुलराणीही निरागस बालिकाच राहिली. ना.घंनी मात्र आपल्या गीतातून प्रेमातील निर्भरता, धुंदी, व्याकुळता प्रत्ययाला आणून दिली. मेहकरसारख्या आडगावात राहूनही त्यांचे चार कवितासंग्रह आणि एक आत्मपर लेखनाचे पुस्तक प्रसिद्ध झाले.

त्यातील खूणगाठीला साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. ना.घंच्या प्रेमगीतांना अमाप लोकप्रियता मिळाल्यानंतर मराठीत या वाटेने जाणारे अनेक गीतकार उदयाला आले. स्त्रीपुरुष प्रेमगीत समाजमान्य होण्यासाठी काहींनी राधा कृष्णाला नायक नायिका बनवले.

लोककवी मनमोहनांनी राधेलाच ‘तुझा अंबाडा सैल कसा झाला?’ असा सवाल करीत वाचकांना/ श्रोत्यांना त्याचे कारण कल्पायला लावून गुदगुल्या केल्या. ना.घ. देशपांडे यांची गावाकडच्या शृंगाराची परंपरा पुढे ना.धों.महानोरांनी पुनरुज्जीवित केली – अधिक रांगडेपणाने! पण त्याविषयी पुढील लेखांकात.

romantic marathi song
Marathi Song :तरी उत्तम गाणी विसरून कसं चालेल राव?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com