

Spain Immigration Crisis
esakal
रोहित वाळिंबे
स्पेनच्या सेउता आणि मेलिला या शहरांत उत्तर आफ्रिकेतील सीमा भागातून जुलैअखेरीस हजारो स्थलांतरितांनी समुद्रामार्गे आणि जमिनीवरून बेकायदा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. हे बेकायदा स्थलांतर केवळ स्पेनसाठीच नाही, तर युरोपसाठीही डोकेदुखी ठरणारे आहे. कारण सीमासुरक्षेचे आव्हान एवढीच याची व्याप्ती नसून, ही घटना वाढती आर्थिक विषमता, मानवी तस्करी आणि स्थलांतराच्या मुळाशी असलेल्या सामाजिक-आर्थिक प्रश्नांचे प्रतिबिंब आहे.
जिवाची पर्वा न करता स्पेनच्या दिशेने समुद्रातून येणारे हजारोजणांचे लोंढे... त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणारी स्पेनची अपुरी सुरक्षा व्यवस्था... आणि हे सर्व हतबलपणे पाहणारे आणि भयभीत झालेले सेउतामधील नागरिक... जुलै महिनाअखेरचे हे चित्र केवळ स्पेनचीच नव्हे तर अवघ्या युरोपाचीच झोप उडविणारे ठरले.
ता. ३० जुलैला उत्तर आफ्रिकेतील मोरोक्कोमधून स्पेनच्या सेउता सीमेवर आलेल्या सुमारे ५० ते ७० हजार बेकायदा स्थलांतरितांच्या लोंढ्याने सेउताची सीमा व्यवस्था अक्षरशः उद्ध्वस्त केली. मोरोक्कोमधून आलेल्या अनेकांनी समुद्रामार्गे पोहत स्पेनच्या भूभागात प्रवेश केला, तर काहींनी जमिनीवरील प्रवेशद्वार आणि अडथळे पार केले. आणि पाहतापाहता युरोपाच्या दक्षिणद्वारावर अभूतपूर्व गर्दी उसळली. परिस्थिती इतकी गंभीर झाली, की स्पेनला तेथे अतिरिक्त सुरक्षा दल आणि लष्कर तैनात करावे लागले.
सेउता हा स्पेनचा उत्तर आफ्रिकेतील छोटा भूभाग असून, भौगोलिकदृष्ट्या तो मोरोक्कोच्या सीमेला लागून आहे; मात्र राजकीयदृष्ट्या तो स्पेनचा आणि त्यामुळे युरोपीय महासंघाचा भाग आहे. अलीकडील काळात आफ्रिका आणि युरोप यांच्या सीमेवरील हे शहर स्थलांतरितांसाठी अत्यंत सोयीचे ठरले आहे. मोरोक्कोच्या भूमीवरून सेउतामध्ये प्रवेश मिळाला की युरोपीय भूभागावर पाऊल ठेवता येते. त्यामुळे आफ्रिकेतील अनेक देशांमधून येणाऱ्या स्थलांतरितांसाठी मोरोक्को हे युरोपकडे जाण्याचे प्रवेशद्वार ठरते आहे.