

Investment Strategies for Youth
esakal
कौस्तुभ केळकर
समृद्ध गोल्डन इनिंग खेळायची असेल, तर गाठीला पैसा पाहिजे आणि यासाठी गरज आहे आर्थिक नियोजनाचा श्रीगणेशा लवकरात लवकर करण्याची. आपल्या पैशाचा योग्य तो विनियोग करणे, दरमहा ठरावीक बचतीची शिस्त लावून घेणे हे समृद्ध, सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक आहे.
काही दिवसांपूर्वी राजेश भेटला होता. बी.टेक.ची पदवी मिळवून एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काही महिन्यांपूर्वीच तो नोकरीला लागला होता. त्याला वार्षिक नऊ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले होते. स्वारी भलतीच खुशीत आणि ऐटीत होती. आमच्या गप्पा सुरू झाल्या. ‘‘राजेश अभिनंदन, चांगला शिकलास म्हणून उत्तम नोकरी मिळाली. आयफोन दिसतोय, नवीन घेतलास का? छान आहे!’’ ‘‘आयफोनचे लेटेस्ट मॉडेल घेऊन जरा स्वतःला रिवॉर्ड दिले.’’ राजेश हसत म्हणाला. ‘‘अरे वा! आणि आता पगार मिळतोय तर बचतीचे काय करतोयस? काही एसआयपी, पीपीएफ सुरू केलेस की नाही?’’ यावर राजेश म्हणाला, ‘‘अजून जबाबदारी यायला बराच अवकाश आहे. त्यामुळे बचतीचे काही ठरवले नाही. महिन्याचा खर्च झाल्यावर पैसे उरले, तर सध्या सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये ठेवतो. बघू पुढे.’’ हे उत्तर ऐकून मी दचकलो आणि म्हणालो, ‘‘अरे तू मौजमजा जरूर कर, पण आधी खर्च आणि मग जमली तर बचत हे रास्त नाही. दरमहा बचतीची सवय लावून घे, कारण आयुष्यात चढ-उतार येतात, कठीण काळात जवळ पैसा पाहिजे.’’ राजेशला शक्य तेवढे पटवून दिले, आणखी थोड्या गप्पा मारल्या आणि मग निघालो.