‘बदलता भारत’ बनला कसा?

‘बदलता भारत: पारतंत्र्यातून महासत्तेकडे...’ हा महाग्रंथ मार्चअखेरीस छपाईला गेला
changing india
changing india sakal

‘मनोविकास’चा ‘मुगल-ए-आज़म’ झाला आहे!’ सर्वच अर्थाने मोठा, खर्चिक, पण देखणा आणि संस्मरणीय ठरणारा ग्रंथ अखेरीस तयार झाला. साधारण साडेतीन वर्षे चाललेले काम आणि अनेक चढउतारांनी भरलेली, पण काहीशी रंजक आणि बरीचशी उत्साहवर्धक वाटचाल याची ही नोंद...

‘बदलता भारत: पारतंत्र्यातून महासत्तेकडे...’ हा महाग्रंथ मार्चअखेरीस छपाईला गेला आणि ‘मनोविकास’ प्रकाशनाचे अरविंद व आशिश पाटकरांना मी म्हटले, ‘हा प्रकल्प म्हणजे ‘मनोविकास’चा ‘मुगल-ए-आज़म’ झाला आहे!’ सर्वच अर्थाने मोठा, खर्चिक, पण देखणा आणि संस्मरणीय ठरणारा ग्रंथ अखेरीस तयार झाला. साधारण साडेतीन वर्षे चाललेले काम आणि अनेक चढउतारांनी भरलेली, पण काहीशी रंजक आणि बरीचशी उत्साहवर्धक वाटचाल याची ही नोंद...

सन २०१९च्या स्वातंत्र्य दिनानंतर काही दिवसांनी ‘मनोविकास’चे अरविंद पाटकर आणि आशिश पाटकर यांनी एक कल्पना समोर ठेवली, की स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त एक ग्रंथ प्रकाशित करावा आणि त्याचे संपादन मी करावे.

साधारण १२-१५ लेखांचा नेहमीच्या आकारातील संग्रह व्हावा अशी कल्पना होती. पण शेवटी तो झाला ६० लेखांचा दोन खंडातील महाग्रंथ! दोन कॉलममध्ये छपाई केलेल्या मोठ्या आकाराच्या एकूण ११००हून अधिक पानांचा!

सहा महिने झालेल्या बैठका-चर्चांमधून ग्रंथाची रूपरेषा व त्याचा एकंदर आवाका निश्चित केला. स्वातंत्र्यलढा, राष्ट्रवाद, धर्म-जाती आणि संस्कृती, भारतीयता यांचा नेमका अर्थ काय आणि आपल्या देशाचे भवितव्य काय, अशा अनेक मुद्द्यांवर आज गोंधळ आहे. काही पूर्वग्रह घट्ट झाले आहेत. एकांगी व साचेबद्धरितीने देशाच्या इतिहासाकडे पाहिले जाते आहे.

ते लक्षात घेऊन हा ग्रंथ तयार होणे गरजेचे वाटले. आपल्या देशाचे स्वातंत्र्य हे असे आहे की जे जगात सर्वाधिक वर्चस्वशाली असणाऱ्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध इथल्या कोट्यवधी जनतेने केलेल्या अथक संघर्षाचे महाकथन, महान मुक्तिपर्व आहे. यातूनच आधुनिक भारताचा जन्म झाला आणि जगाच्या इतिहासावर त्याने आपली छाप उमटवली.

यातील ‘नायक-नायिका’, नेते, समाजधुरीण, क्रांतिकारक आणि महामानव यांच्याविषयी आजही देशभर अपार आदर, प्रेम आणि अद्‍भुत आकर्षणही आहे. यात दीड-दोन शतकांचे विविध जनसमुदायांचे अभिनव संघर्ष आहेत. याविषयी लोकांना, विशेषतः युवा पिढीला प्रचंड आदर आहे. ते त्यांना नव्या संदर्भात पुन्हा एकदा समजून घ्यायचे आहे.

changing india
Pune Traffic : मुंबई-बंगळुरु महामार्गावर वाहतूक ठप्प; कात्रज दरी पुलापासून वडगाव पर्यंत ट्रॅफिक, वाहनांच्या रांगा

पण ते तसेच देशातील आजची गुंतागुंतीची परिस्थिती समजून घ्यायची तर केवळ नेते व चरित्रे किंवा घटना व वर्णने यापलीकडे जाणे आता गरजेचे झाले आहे. त्यामुळे भारताला घडवणारे गेल्या शंभर-दीडशे वर्षांतील वादविवाद, विसंगती-विरोधाभास आणि प्रक्रिया व विश्लेषणे देणारे लेख यात असावेत असेही ठरले. विविध क्षेत्रे, राष्ट्रीय जीवनाची महत्त्वपूर्ण अंगे आणि जनसामान्यांचा सहभाग व उपेक्षित पैलू समोर आणणारे विषय आणि लेखक ठरवले गेले.

लेखक-लेखिकांशी पहिले संपर्क-भेटीगाठी सुरू झाल्या मार्च २०२०मध्ये मुंबई, सातारा, सांगली आणि कोल्हापूर... आणि लेख लिहिण्याची विनंती करण्यासाठीचा शेवटचा संपर्क झाला ऑगस्ट २०२२मध्ये! सुरुवात केली किमान २५-३० लेख निश्चितपणे मिळावेत म्हणून साधारण ४०-५० लेखकांना संपर्क करण्यापासून. पण संकल्पित योजना जरा मोठी होत गेली.

अधिकाधिक लेखकांशी संपर्क करत गेलो. एकंदर संपर्क केलेल्या व्यक्तींचा आकडा किमान ९० झाला. यामध्ये सतत प्रयत्न होता तो विविध क्षेत्रातील आणि विविध सामाजिक-भौगोलिक पार्श्वभूमी असलेले अगदी ज्येष्ठ ते तरुण स्त्री-पुरुष अभ्यासक-लेखक निवडण्याचा. मध्यंतरी बरेच काही घडत होते. एकतर २०१९च्या नोव्हेंबरपासून जगात वेगाने पसरणारी कोरोनाची साथ भारतात येऊन थडकली. मार्चच्या मध्यानंतर इथेही लॉकडाउन सुरू झाले.

changing india
Satara : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! धबधबे पाहायला जाणाऱ्यांवर होणार कारवाई, 'त्या' दुर्घटनेनंतर वनविभाग ॲक्टिव्ह

संभाव्य लेखक गाठीभेटी तर थंडावल्याच, पण काही काळातच एक चिंताजनक अनिश्चितता निर्माण झाली. ना ग्रंथालये उघडी होती, ना कोणाला स्वस्थता. ज्यांनी कबूल केले होते, त्यातील काही लेखकांनी अशा अवस्थेत लिहिणे अशक्य आहे असे सांगितले. असे किती काळ चालणार हे न कळल्याने प्रकल्प काही काळ टांगणीला ठेवणे अपरिहार्य झाले. लॉकडाउन उठले, थोडे काम पुढे सरकवण्याचे प्रयत्न केले, पुन्हा तेच. नंतर मात्र प्रकल्प नेटाने पुढे नेण्याचे ठरले आणि पुढच्या कोरोना लाटांसोबतच लेखक संपर्काचे आणि त्यांच्या लिखाणाचे काम पुढे सरकू लागले.

समान सूत्राभोवतींचे लेख

केवळ गोळाबेरीज पद्धतीने लेखांचे संकलन करण्यातून फारसे काही साधणार नव्हते. हा खटाटोप अर्थपूर्ण व्हायचा तर त्या साऱ्‍या विविधतेत काही समान सूत्र असणे आणि त्यातून एक व्यापक समग्रता साधली जाणे आवश्यक होते. त्यामुळे सर्व लेखकांना प्रकल्पाची संकल्पना, ग्रंथाचे केंद्रीय सूत्र व त्याचा ढोबळ ढाचा आणि कोणत्याही लेखात साधारण काय यावे याचे एक टिपण आम्ही पाठवत होतो.

लेखक हे त्या त्या विषयाचे व क्षेत्राचे जाणकार आणि अभ्यासक असले, तरी त्यांना दोन पायांवर चालण्याची कसरत करायला लावणारी ही योजना होती. एकतर विषय व त्याचा आवाका हा प्रत्येकी एक स्वतंत्र ग्रंथ होईल एवढा मोठा होता. दुसरे म्हणजे त्या क्षेत्रातील विश्लेषक आढाव्यासोबत त्याचे राष्ट्रवादाशी व भारतीयतेशी असलेले नाते उलगडले जावे अशीही अपेक्षा होती. त्यामुळे लेखात काय अपेक्षित आहे हे सुचवणाऱ्‍या मुद्द्यांचे व लेखासाठी विनंती करणारे दीड-दोन पानी पत्रही लेखकांना पाठवत होतो!

याला तरुण लेखक-लेखिकांपासून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञांनी प्रतिसाद देऊन आमच्या उत्साहात प्रचंड भर घातली. या कल्पनेचे व अपेक्षा व्यक्त करणाऱ्‍या पत्रांचे स्वागत केले. ‘अशी पद्धत अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही वापरली जाते. यातून लेखाविषयीची अपेक्षा कळते आणि विचाराला चालना मिळते’ असे अनेकांनी आवर्जून सांगितले.

फक्त एकांनीच आपली नाराजी व्यक्त करत असे कळवले की ‘ज्यांनी मुद्दे दिलेत त्यांनीच लेख लिहावा!’ अर्थातच लेखकांना आम्ही कळवले होते की मांडणीचे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि अर्थातच त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य घेऊन लेख लिहिले, स्वतःचे विश्लेषण, वैचारिक चौकट पक्की ठेवून आणि काय व किती द्यायचे याचा विचार करून.

काही अगदी मोजके लेख ग्रंथाला साजेसे नव्हते आणि काही कारणांनी लेखकांना संपादकीय सूचनांप्रमाणे ते बदलणे शक्य नव्हते. त्यामुळे नाइलाजाने ते नाकारावे लागले. तर काही लेखकांनी स्वतःहून लेख मागे घेतले. काही लेखकांना विविध अडचणींमुळे लेख देणे शक्य नाही, हे नंतर नंतर दिसू लागले. अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या त्या विषयांसाठी नवे लेखक शोधावे लागले. वर म्हटल्याप्रमाणे असा अगदी शेवटचा संपर्क ऑगस्ट २०२२मध्ये केला.

changing india
Solapur News : साठवणूक क्षमता वाढविल्यास सुरळीत पाणीपुरवठा जादा क्षमतेच्या २५ जलकुंभांचा प्रस्ताव एमजीपी’कडे

लेखकांचे योगदान

सर्व लेखकांनी जे योगदान दिले ते विलक्षण होते. महाग्रंथाचे सर्वप्रथम श्रेय जाते ते सर्व लेखक-लेखिकांना! स्वतःची आणि जिवलगांची आजारपणे, काही वेळा दुःखद मृत्यू, काही ठिकाणी पाऊस व पुराची समस्या, सर्वांच्याच कामाची व्यग्रता अशा अनेक ताणांना तोंड देत या साऱ्‍यांनी लेख पूर्ण केले. विशेष हे, की ग्रंथाचे वाचक व गरज लक्षात घेऊन आणि संपादकीय सूचनांच्या व संस्कारांच्या जाचाला तोंड देत लेखकांनी हे काम आनंदाने केले.

सर्व लेखकांनी अत्यंत मनापासून सहकार्य केले. एकदाच नव्हे, तर पुनःपुन्हा दोनदा-तीनदा केलेल्या संपादकीय सूचना लक्षात घेऊन बदल करून दिले. सर्वच लेखकांनी आपले विवेचन व विश्लेषण विशिष्ट शब्दमर्यादेत बसवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. एका अत्यंत ज्येष्ठ व नामवंत लेखकांनी तर आमच्या विनंतीनुसार संपूर्ण लेखच नवा लिहून दिला. काही लेख अपेक्षित शब्दसंख्येच्या दुप्पट-तिप्पटीहून अधिक शब्दसंख्येचे झाले होते.

काही वेळा ते दोन-तीनदा छोटे करण्याचे काम त्यांनी करून दिले. काही ज्येष्ठ लेखकांना तब्येतीच्या कारणांमुळे स्वतः बदल करणे वा भर घालणे शक्य नव्हते, त्यांच्या मुलाखती घेऊन व शब्दांकन करून त्यांचे लेख संपादित केले. आठ लेख इंग्रजीमध्ये आले होते. त्यांचा अनुवाद हे एक आव्हान होते. त्यातील परिभाषा व मांडणी ही सर्वसाधारण अनुवाद करणाऱ्‍या काहींना अवघड जात होती. त्यामुळे त्यावर पुनःपुन्हा काम करणे आले.

बरेचसे लेख नव्यानेच भाषांतर करून पुनःपुन्हा तपासले. यातील एक वगळता अन्य सर्व लेखक मराठीचेही जाणकार असल्याने त्यांच्याकडून अंतिम मराठी लेख संमत करून घेणे हेदेखील एक आव्हानच होते!

प्रत्येक लेखाची स्वतःची अशी वैशिष्ट्ये आहेत, आपापले वेगळेपण आहे. मात्र सर्व लेखांचे एक वैशिष्ट्य आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे. आपापल्या विषयातील वा क्षेत्रातील अगदी आजवरच्या घडामोडी आणि वाद, संशोधन आणि समस्या यांचे भरीव प्रतिबिंब त्यामध्ये उमटले आहे. हे करताना त्याविषयी जे नवे प्रवाह वा विश्लेषण मांडले जाते आहे ते अकादमिक पद्धतीने नव्हे, तर वाचकांना उद्‍बोधक वाटेल अशारितीने लेखांमध्ये आणले गेले आहेत.

विविध टप्प्यांवर अनेक लेखक-लेखिकांनी या कामाने आपल्याला समाधान वाटल्याचे आवर्जून सांगितले. जेव्हा कलाकार-व्याख्याती व्यक्ती आणि संयोजक तसेच लेखक आणि संपादक स्वतःच्या कामाविषयी समाधान व्यक्त करतात, तेव्हा ते काम प्रेक्षक व वाचकांपर्यंत संक्रमित होत असते. असे असल्याने देशातील आणि जगभरातल्या विचक्षण आणि चोखंदळ मराठी वाचकांसाठी हा ग्रंथ संग्राह्य ठरेल ही सार्थकता देणारी जाणीव निर्मितीच्या अंतिम टप्प्यात सर्व चमूला होत गेली.

changing india
Amit Shah In Pune : अमित शहा तात्काळ त्यांच्यासाठी पुण्यात आले; कोण होते मदनदास देवी ?

ग्रंथ दर्जेदार व्हावा यासाठी सर्वांनीच खूप परिश्रम घेतले. लेखांची भाषाशैली भिन्न असली तरी मुद्रितशोधनामध्ये एकवाक्यता असणे गरजेचे होते. त्यामुळे ‘मनोविकास’च्या विविध मुद्रित शोधकांची एक दिवसीय कार्यशाळा घेतली. शिवाय ग्रंथाचे महत्त्व आणि स्वरूप स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्रातील विक्रेते आणि ठळक शहरांमधील पत्रकार, महाग्रंथात योगदान देणारे त्या शहरातील लेखक व वैचारिक क्षेत्रातील निवडक लोक, यांच्या बैठका घेण्यात आल्या.

प्रकाशनामध्ये मूळ नियोजनापेक्षा झालेला अल्पसा विलंब वगळता संपूर्ण प्रकल्प समाधानकारकपणे पूर्णत्वाला नेता आला. लेखकांशी झालेला पहिला तसेच संपादकीय सूचनांचा पत्रव्यवहार, विविध चर्चा आणि नियोजनाचे काम याची प्रक्रिया व लिखापढी पाहून आशिश पाटकर थोडेसे विनोदाने म्हणालेही, ‘हे सगळे एकत्र केले तर ‘मेकिंग ऑफ बदलता भारत’ असा २५०-३०० पानांचा एक ग्रंथच होईल! हा स्वतंत्र करूया, की तिसरा खंड म्हणून छापूया?’

उत्साहवर्धक निर्मिती साहाय्य

महाग्रंथाच्या कामात संपादकीय साहाय्य व समन्वय करणाऱ्‍या संयोगिता ढमढेरे, माझी सहचारिणी विनया मालती हरी आणि ‘मनोविकास’चे संपादक विलास पाटील यांनी यामध्ये दिलेल्या सहनशील सहभागामुळे हे काम पद्धतशीरपणे पुढे नेता आले.

चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्याशी झालेल्या चर्चा, ते आणि राजेश भावसार यांनी केलेले कल्पक काम यामुळे ग्रंथ देखणा झाला. अनेक थोरामोठ्यांनी आवर्जून सांगितले की ग्रंथ पाहताच वा हातात घेताच तो आपल्या संग्रही असावा, असा संस्मरणीय झाला आहे!

‘मनोविकास’चे अरविंद व आशिश पाटकर यांनी प्रकाशक म्हणून सर्व जबाबदाऱ्‍या तर उचलल्याच, पण संपादक म्हणून मला पूर्ण मोकळीक दिली आणि मुक्तहस्ते पाठिंबा दिला हाही सुखद अनुभव होता. सुरुवातीच्या कल्पनेपेक्षा ग्रंथ ‘वाढता वाढता वाढे...’ असा फुगत गेला.

वादविवाद आणि चर्चा, अनोखे पैलू आणि उपेक्षित मुद्दे बाहेर आणण्याची तीव्र इच्छा, ऐतिहासिक दृष्टी आणि सखोल समीक्षा, बहुविधता आणि समग्रता यावर प्रेम असल्यामुळे माझ्यासारख्याचे नियोजन हे असे वाढत जाणे अटळ होते.

याने अर्थातच अर्थभारासह प्रकाशकांचे सर्वच काम प्रचंड वाढले. पण त्याबद्दल एखाद्या क्षणी, एखाद्या शब्दाने चिंता व्यक्त करणे वा कुरबूर करणे दूरच, अरविंद आणि आशिश पाटकरांनी अतिशय प्रेमाने आणि आस्थेने या सर्व प्रयत्नांचे स्वागत केले आणि अत्यंत उत्साहाने या प्रकल्पाच्या पाठीशी ते सतत उभे राहिले.

लेखक आणि प्रकाशकांसह संपादन-निर्मिती करणाऱ्‍या चमूचा सकारात्मक उत्साह आणि उद्‍बोधक ज्ञान हे दोन मोठ्या खंडांच्या रूपात आकाराला आले. जणू ६३ लेखक-लेखिकांनी गुंफलेले स्वातंत्र्यलढ्याचे आणि भारतीयतेच्या जडणघडणीचा वेध घेणारे आधुनिक महाकाव्य! त्यामागे अर्थातच प्रेरणा आहे ती या देशावरील व लोकांवरील या सर्वांच्या अपार प्रेमाची.

या देशाचेच नव्हे, तर इथल्या प्रत्येक आबालवृद्ध व्यक्तीचे स्वातंत्र्य टिकवणे आणि त्याचा विस्तार करणे याविषयीची त्यांची अपरंपार ओढ यामागे आहे. म्हणूनच या देशातील विलोभनीय बहुविधता आणि विषण्ण करणारी विषमता यांचे परखड विश्लेषण,आणि उज्ज्वल भविष्य यांचे बहुरूपदर्शक आणि समग्र चित्र रेखाटणारा हा अमूल्य वैचारिक खजिना उपलब्ध होऊ शकला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com