

Adolescent Psychology
esakal
डॉ. रंजना वांबूरकर
सुट्टीचे आकर्षण लहान-थोर सर्वांनाच असले, तरी शाळकरी मुलांसाठी ते विशेष असते. सुट्टी एके सुट्टी या कथासंग्रहातील बारा कथांमध्ये हुशार, खेळकर, थोड्या खोडकर, थोड्या गंभीर, तर कधी दंगामस्ती करणाऱ्या मुलामुलींच्या कथा वाचायला मिळतात. कुटुंबात व शाळेत दैनंदिन जीवनात घडणाऱ्या छोठ्या-मोठ्या प्रसंगाचे चित्रण कथांमध्ये केलेले आढळते.
गद्य, बालसाहित्य अशा प्रकारांत मुशाफिरी करणाऱ्या बहुआयामी लेखिका कविता मेहेंदळे यांची आजवर जवळजवळ पन्नास पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांचा नवा कथासंग्रह सुट्टी एके सुट्टी हा किशोर वाचकांसाठी आहे. या संग्रहातील कथा लहान तसेच किशोरावस्थेतील मुलामुलींचे मन व त्यांचे मानसशास्त्र याबाबतीत आहेत.
सुट्टी एके सुट्टी हे शीर्षक लहान मुलांना आकर्षित करणारे आहे. कारण सुट्टीचे आकर्षण लहान-थोर सर्वांनाच असले, तरी शाळकरी मुलांसाठी ते विशेष असते. पुस्तकाची अर्पणपत्रिकाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. ‘पाकळी-पाकळीतून फुलारून, जीवनानंद घेणाऱ्या माझ्या सर्व बाल दोस्तांना आणि अनुभवाचं ‘खत-पाणी’ त्यांना घालणाऱ्या माझ्या प्रिय पालक, शिक्षक बांधवांना...’
या कथासंग्रहातील एकंदर बारा कथांमध्ये हुशार, खेळकर, थोड्या खोडकर, थोड्या गंभीर, तर कधी दंगामस्ती करणाऱ्या मुलामुलींच्या कथा वाचायला मिळतात. कुटुंबात व शाळेत दैनंदिन जीवनात घडणाऱ्या छोठ्या-मोठ्या प्रसंगांतून त्यांची जडणघडण होते, त्याचेच चित्रण कथांमध्ये केलेले आढळते.