सतीश पाकणीकर
स्वरस्वामिनी आशा ग्रंथातील अनेकानेक वाक्ये व विचार आपल्या नजरेखालून जात असताना आशा भोसले नावाची ही महाविलक्षण गायिका कशी घडत गेली असेल याचे चित्रण आपल्या डोळ्यांसमोरून सरकत जातेच, पण त्या काळातील दुर्मीळ प्रकाशचित्रे आपल्याला जणू त्या काळातच घेऊन जातात.
साधारण तीन पिढ्यांना आपल्या दैवी स्वरांनी आनंद देणारी व्यक्ती म्हणजे आशा भोसले. सर्वांच्या हृदयाजवळची, सर्वांची आवडती अशी ही गायिका! ही जगप्रसिद्ध कलाकार गेल्या जवळजवळ सात दशकांहून अधिक काळ आपल्याला सुख-दुःखांच्या क्षणी अलौकिक स्वर-साथ करीत आलेली आहे. त्यांच्या या आपल्यावरील प्रेमातून उतराई होण्यासाठी व्हॅल्यूएबल ग्रुपनिर्मित, प्रकाशक मेराक इव्हेंट्स आणि जीवनगाणी व सहप्रकाशक डिंपल पब्लिकेशन यांनी अलीकडे एक देखणा ग्रंथ प्रकाशित केला आहे, तो म्हणजे स्वरस्वामिनी आशा!