Tanpura
Esakal
Premium|Tanpura: बाजारात नवीन कितीही ॲप्स आली, तरीही कलाकाराच्या आयुष्यातले तंबोऱ्याचे स्थान अढळ.!
डॉ. गौरी करंबेळकर
तानपुरा मॅन्युअल असो वा इलेक्ट्रॉनिक, तो खरोखरीच कलाकाराला गाताना-वाजवताना आधार देतो. तो असला की बाकी स्वरवाद्यं नसली तरी चालतं, त्यांवाचून फारसं अडत नाही. फार कशाला, तानपुरा नुसता वाजवला तरी एक माहोल तयार होतो, प्रसन्न वाटायला लागतं आपसूकच. सुरेल जुळलेला तानपुरा आपल्याला वेळ-काळाचं भान विसरायला लावतो, आपल्याला आतून शांत करतो, अंतर्मुख व्हायला आपल्याला भाग पडतो.
पं. कुमार गंधर्व अतिशय सुरेल तानपुरे जुळवूनच गाणं सुरू करण्याबाबत आग्रही असायचे. ते म्हणायचे, सुरेख जुळलेले तानपुरे गाण्यात कॅनव्हाससारखं काम करतात आणि तानपुरेच मला काय गायचं ते सांगतात, ‘मी’ गात नाहीच! किती खरं आहे कुमारजींचं हे म्हणणं!
पाहा ना, स्वतंत्र वादनाचं वाद्य म्हणून अस्तित्व किंवा मान नसला तरी या वाद्याशिवाय संगीताची - मग ते कंठ्य संगीत असो वा वाद्य संगीत, शास्त्रीय असो किंवा सुगम, फार काय एकल तबला किंवा नृत्याची मैफील होऊच शकत नाही, असं वाद्य म्हणजे तानपुरा किंवा तंबोरा! आणि म्हणूनच वाद्याबद्दल काही लिहाल का, अशी विचारणा झाल्यावर मला पहिल्याप्रथम आठवला तो प्रत्येक कलाकाराचा आधार असलेला आणि भारतीय संगीताचं प्रतीक ठरावं इतका महत्त्वाचा असलेला तंबोराच!
