Teenage Parenting: समस्या सोडवणं हेही एक कौशल्य; किशोरवयीन मुलांशी वागताना या पाच पद्धती ठरतील उपयोगी

एक व्यक्ती म्हणून बाप-नवरा-मुलगा-मैत्रीण-आई-नोकर-बॉस अशा असंख्य भूमिका मुलांना आयुष्यभर निभवायला लागणार आहेत
Teenage Parenting
Teenage ParentingEsakal

किशोरवय आणि जीवनकौशल्ये

डॉ. वैशाली देशमुख

अनेकदा किशोरवयीन मुलांवर पालकांना त्रास देणारी, कुटुंबावर भार होणारी, आगाऊ, उद्दाम मुलं असा शिक्का मारला जातो.

पण खरंतर तो एक समाजामध्ये शांतता आणि सद्‍भावना नांदवायला आवश्यक असलेला, समाजाच्या उन्नतीला हातभार लावणारा निर्मितिक्षम घटक असतो.

एका अर्थानं मानवाचं भवितव्यच आहेत ही मुलं. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे प्रतिसाद संपूर्ण मानवजातीवर पडणार आहेत. त्यादृष्टीनं जीवनकौशल्यं उपयोगाला येतील.

गेल्या काही लेखांमध्ये आपण किशोरवयीन मुलांसाठी शिफारस केल्या गेलेल्या काही जीवनकौशल्यांविषयी बोलतो आहोत. जरी आपण त्यांची वेगवेगळी चर्चा केली, तरी प्रत्यक्षात ही सगळी कौशल्यं एकमेकांना पूरक असतात आणि एकत्र वापरली जातात; मुख्यतः समस्या निवारणाची वेळ येते तेव्हा.

हे समस्या निवारणाचंही एक कौशल्य आहे आणि ते किशोरवयीन मुलं आणि त्यांचे पालक अशा दोघांना घडीघडीला लागतं.

‘आज चहा पिऊ की कॉफी, आत्ता पिऊ की नंतर’ अशा किरकोळ प्रश्नांपासून ते ‘या मुलाशी लग्न करू का? ही नोकरी सोडली तर चालेल का?’ असे जटिल प्रश्न आयुष्यभर पाठलाग करत असतात. ते सोडवले नाहीत, तसेच भिजत ठेवले, तर त्रासदायक ठरतात; शिवाय त्यातून इतर अनेक नवीन प्रश्न निर्माण होतात.

उदा. मित्रांच्या दबावाची समस्या सोडवता आली नाही, तर अभ्यासातून लक्ष उडणार किंवा नको ते उद्योग करावेसे वाटणार, किंवा मादक पदार्थांचा आस्वाद घ्यावासा वाटणार किंवा आहाराच्या अथवा आभासी जगातल्या वाईट सवयी लागणार.

त्यामुळे हे कौशल्य आत्मसात करायला हवं. त्याची चर्चा आपण शेवटी करतो आहोत, कारण आधीची जवळजवळ सगळी जीवनकौशल्यं इथे एकत्रितरित्या वापरावी लागतात.

कुठल्याही प्रश्नाला टप्प्याटप्प्यानं, पायरीपायरीनं भिडलं तर तो सोडवणं काहीसं सोपं जातं. नाहीतर ते सगळं प्रकरण अगदी अंगावर येतं, गोंधळून टाकतं आणि आपल्याला उपायांपासून दूर नेतं.

समस्या निवारणाच्या या पायऱ्या पाहूया:

१. सर्वात आधी समस्या नक्की काय आहे हे स्पष्ट झालं पाहिजे. समोर जो काही प्रश्न आहे, त्यात मुख्य समस्या कोणती? त्याला आपण समस्या का म्हणतोय? त्याचा आपल्याला नक्की काय त्रास होणार आहे किंवा होतो आहे? तो सोडवण्याची कितपत तातडी आहे? एकदा का समस्येचं स्वरूप स्पष्ट झालं, की भावनिक गोंधळाचं धुकं वितळतं आणि मेंदू जास्त स्पष्टपणे काम करू शकतो.

शिवाय उपायांची दिशाही नीट दिसायला लागते आणि उपाय यशस्वी होण्याची शक्यता वाढते. यासाठी आवश्यक असतं स्व-ओळखीचं जीवनकौशल्य. त्याचबरोबर त्यात असणाऱ्या इतर घटकांचा/व्यक्तींचा विचार करण्यासाठी लागते आस्था!

समजा एखादा मित्र पार्टीला येण्याचा आग्रह करतो आहे. आई-बाबांना ते फारसं योग्य वाटत नाहीये, पण त्या किशोर-मित्र किंवा मैत्रिणीला वाटतंय की ‘ही तर एक छान संधी आहे, समस्या कसली?’ तेव्हा ते समस्या सोडवण्याच्या पहिल्या पायरीवरच ठेचकाळलेले असतात.

कारण समजा ही पार्टी कुठल्यातरी दूरच्या संशयास्पद जागी असेल, किंवा तिथे मुबलक ड्रग्ज उपलब्ध असणार आहेत किंवा तुमच्याकडे जाण्या-येण्यासाठी गाडी आहे याचा त्या मित्राला वापर करून घ्यायचा आहे, तर हे आमंत्रण हीच समस्या असू शकते!

त्यातूनही ही एक सामाजिकीकरणाची, स्वीकाराची संधी आहे असं एखाद्याला किंवा एखादीला वाटलं, तरीही त्यापुढे त्यात काही प्रश्न उद्‍भवू शकतील. उदा. डेट रेप, व्यसनांशी तोंडओळख, जाण्या-येण्याच्या समस्या, भलत्या लोकांशी नकोशी जवळीक, कायदेबाह्य घडामोडी..

यातलं काही तिथं घडलं, तर त्यांचं त्यांनाच हे सोडवायला लागणार. आणि या घटना तरुण मुलांच्या पार्ट्यांमध्ये अगदी सहज, नियमितपणे घडू शकतात. याविषयी ते जागरूक असतील, तरच त्यांच्याकडून काही तजविजी केल्या जातील, काही सावधगिरी बाळगली जाईल.

२. काय सोडवायचं आहे, याची साधारण रूपरेषा स्पष्ट झाली की एक दिशा मिळते. आता शोधायचे त्यावरचे पर्याय.

हे शोधण्यासाठी मनाचे वारू सैल सोडावे लागतात. आपल्या कल्पक विचारशक्तीला जागं करावं लागतं. ‘हे नको, ते जमणार नाही, ते शक्यच नाही, असं कसं चालेल’ अशा स्वरूपाचे विचाररूपी अडथळे जागच्या जागी ठेचून काढायला लागतात.

जसे आपण वयानं मोठे होत जातो, अधिक अनुभव घेतो, तसे अनेक नकारात्मक विचार, अनेक पूर्वग्रह आपल्याला अधिकाधिक रोखतात.

पण किशोरवयीन मुलं मात्र भन्नाट पर्याय शोधतात. बरे की वाईट, उपयुक्त की निरुपयोगी असा त्यांच्यावर शिक्का न मारता जास्तीत जास्त पर्याय शोधणे हा या पायरीचा उद्देश! त्याचं विश्लेषण पुढच्या पायरीला करायचंच आहे.

एकदा किशोरवयीन मुलांसाठी एक कार्यशाळा चालू होती. त्या काळात मुंबईतल्या डबेवाल्यांनी संप पुकारला होता. ‘अशा वेळी मुंबईत एकट्या राहणाऱ्या अन् ऑफिसला जाणाऱ्या माणसानं काय करावं? त्याच्याकडे काय काय पर्याय असतील?’ असा प्रश्न आम्ही मुलांपुढे मांडला.

समस्या काय होती? डबेवाल्यांनी संप का केला, ते असं कसं करू शकतात, ही नव्हती. काही मुलांनी ते गृहीत धरून डबेवाल्यांवर कारवाई करावी, आपणही त्यांच्याविरोधात संप पुकारावा, असे मार्ग सुचवले. पण खरी समस्या होती जेवणाचं काय करायचं, पोट कसं भरायचं!

एकदा समस्येचं हे स्वरूप सर्वसंमत झाल्यावर भरपूर सारे पर्याय पुढे आले! सकाळी जाताना काहीतरी पार्सल न्यायचं किंवा स्वतः डबा करायचा, जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन खायचं, शहरात राहणाऱ्या मैत्रिणीला जास्तीचा डबा आणायला सांगायचा, फळं खायची, सकाळीच भरपेट नाश्ता करून यायचं, ऑफिसमध्ये नूडल्स करायच्या असे अनेक.

एका मुलीनं तर सुचवलं की त्यादिवशी उपवास करायचा, आपोआपच डिटॉक्स आणि डाएटिंग होईल.

३. समस्या काय हे कळलं, त्यावर करता येण्यासारख्या उपायांची यादी तयार करून झाली, आता मोठ्या माणसांचा तर्कट मेंदू कामाला लावायला हरकत नाही. साधक बाधक विचार करून त्यातला कोणता पर्याय जमणारा, चालणारा, आवडणारा, उपयोगी पडणारा आणि योग्य आहे, तो निवडायचा.

आपापल्या कमकुवतपणा आणि क्षमतांची जाणीव असेल तर हे ठरवणं सोपं जातं. आपल्या भावनांशी आणि तणावांशी दोस्ती असेल, तर शांत डोक्यानं प्रसंगाकडे पाहता येतं, स्थिर बुद्धीनं निर्णयाप्रत पोहोचता येतं.

उदा. वरच्या उदाहरणात प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे या पर्यायांचं विश्लेषण करून योग्य पर्याय ठरवता येईल. एखाद्याला मधुमेह असेल तर उपवास करता येणार नाही, पैसे नसतील तर हॉटेलमध्ये जाऊन खाता येणार नाही.

४. नुसता पर्याय निवडून उपयोग नाही, त्याची योग्य अंमलबजावणीसुद्धा व्हायला हवी. त्यासाठी तालीम, पूर्वतयारी करायला हवी; योग्य वेळ-काळ-स्थळ पाहायला हवं. निर्णय घेता यायला हवा, आपलं म्हणणं इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी संवादकौशल्य हवं.

उदाहरणार्थ, आपली परिस्थिती मैत्रिणीपर्यंत योग्य प्रकारे पोहोचवता आली, तर ती डबा आणेल. किंवा भुकेवर ताबा ठेवणं शक्य असेल तर उपवास तडीला जाईल.

५. ही प्रक्रिया इथेच थांबत नाही, तिला पुन्हा एकवार भेट द्यायला हवी. आपली निर्णयप्रक्रिया बरोबर होती का, ती अधिक प्रभावी करता आली असती का, पर्याय वेगळे शोधायला हवेत की काय, अंमलबजावणीत कुठे कमतरता आली का, चांगल्या-वाईटाची चाचपणी अजून काटेकोरपणे करायला हवी होती का?

जर अपयश आलं असेल तर प्रक्रियेत काय बदल करावे लागतील? त्या अपयशाला तोंड देऊन त्यातून शिकून पुढच्या वेळी ते टाळता येईल का? त्यामुळे आलेला हताशपणा-नैराश्य कसं हाताळायचं याची कौशल्यं मला येतात का? यातून मी काय शिकेन?

उदा. मला स्वयंपाक करता येत नसेल तर मी तो शिकून घेईन, म्हणजे पुढच्या वेळी असं झालं तर मी माझा माझा डबा करून नेऊ शकेन. दुसरं एक उदाहरण घेऊन बघू.

खूप पालकांची तक्रार असते, की मुलांची खोली अतिशय घाण असते, खूप पसारा असतो. खरकट्या ताटल्या, फळांची सालं, मागवलेल्या अन्नाचे रिकामे बॉक्स, न धुतलेले कपडे, चिखलानं माखलेले बूट असे सगळे गुण्या-गोविंदानं एकत्र नांदत असतात. आणि कितीही वेळा डोकेफोड केली तरी यात सुधारणा होत नाही.

Teenage Parenting
Parenting Tips : मुलांचा सतत मूड बदलतोय? मग, 'या' पद्धतीने करा हॅंडल

नक्की समस्या काय आहे? तर माझं मूल माझं ऐकत नाही ही. ही कोणाची समस्या आहे? आई-बाबांना विचारलं तर ते म्हणतील अर्थातच मुलांची. पण मुलांना ‘घाण खोली’ ही मुळात समस्याच वाटत नसेल तर? ते का त्याचा पत्कर घेतील? त्यांची समस्या एवढीच असते, की आई-बाबा कटकट करतात. परिस्थिती एकच, पण प्रत्येकाचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा.

काहीही असलं तरी हे चालू राहिलं, तर परिणामी मुलांना घाणेरड्या सवयी लागतील, अस्वच्छतेमुळे आजार होतील याची आई-बाबांना सार्थ काळजी आहे. यावर उपाय काढायचा असेल, तर मुलांना त्यात काय समस्या वाटते आहे हे शोधून काढायला हवं, तर ते त्याच्यावर उपाय शोधण्यात सहभागी होतील.

उदा. त्यांना हव्या त्या वस्तू हव्या त्या वेळेला सापडणार नाहीत, ही यात त्यांची समस्या असू शकेल. तो मुद्दा धरून त्यांना पर्याय शोधायला सांगितलं तर? त्यात आई-बाबांनीही सहभागी व्हायचं, कारण त्यांच्याही काही समस्या आहेत.

दोघांच्या विचार-मंथनातून जे काही पर्याय निघतील त्यावर साधक-बाधक चर्चा करून काहीतरी समान उपाय, निदान काहीतरी किमान तडजोड सापडेल. एका कुटुंबानं या सर्व पायऱ्या वापरून यावर असा उपाय काढला, की ओल्या-खरकट्या गोष्टी स्वयंपाकघरातल्या कचऱ्यात रोजच्या रोज टाकल्या जातील.

महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रं नीट ठेवायची जबाबदारी मुलं घेतील; आईबाबा आठवड्यातून एकदा खोली चेक करतील, रोज-रोज त्यावर टीका करणार नाहीत. आपल्या लक्षात आलं असेल, की दोन्ही घटकांनी इथे थोडीफार तडजोड केली.

जर ते आपापल्या मुद्द्यांवर अडून राहिले असते, तर परिस्थिती कदाचित तशीच मागच्या पानावरून पुढे चालू राहिली असती. आत्ता निदान दुरुस्तीची प्रक्रिया सुरू तरी झाली. अजून काही दिवसांनी पुन्हा आढावा घेऊन आई-बाबांना पुढचं पाऊल उचलता येऊ शकेल.

मुलांना स्वावलंबी आणि कणखर करणं हा पालक होण्याचा उद्देश असतो म्हणतात. त्या प्रक्रियेतला एक महत्त्वाचा भाग आहे, त्यांना ही निरनिराळी तंत्रं शिकवून सक्षम करणं. पालक मुलांचं पालन-पोषण करतात, शिक्षण देऊन त्यांना साक्षर करतात, नोकरी-व्यवसायाच्या लायकीचे बनवतात.

त्यांच्यासाठी जमेल तशी संपत्ती साठवतात. पण तरीही जगण्यासाठी मुलांना यापलीकडे कितीतरी करायला लागणार आहे. एक व्यक्ती म्हणून बाप-नवरा-मुलगा-मैत्रीण-आई-नोकर-बॉस अशा असंख्य भूमिका त्यांना आयुष्यभर निभवायला लागणार आहेत.

अनेक बऱ्यावाईट प्रसंगांना सामोरं जायला लागणार आहे, अनेक सोपे-अवघड निर्णय घ्यायला लागणार आहे, जगण्याच्या तणावाला यशस्वीपणे हाताळायला लागणार आहे आणि याबरोबरच जगण्याचा आनंदही त्यांना मिळवायचा आहे.

आई-बाबांना त्यांना त्यांच्या आयुष्यभर हाताला धरून नेणं ना शक्य आहे, ना शहाणपणाचं! अनेकदा किशोरवयीन मुलांवर पालकांना त्रास देणारी, कुटुंबावर भार होणारी, आगाऊ, उद्दाम मुलं असा शिक्का मारला जातो.

पण खरंतर तो एक समाजामध्ये शांतता आणि सद्‍भावना नांदवायला आवश्यक असलेला, समाजाच्या उन्नतीला हातभार लावणारा निर्मितिक्षम घटक असतो. हीच मुलं पुढची पिढी जन्माला घालून ती पोसणार-वाढवणार-शिकवणार आहेत.

एका अर्थानं मानवाचं भवितव्यच आहेत ही मुलं. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचे प्रतिसाद संपूर्ण मानवजातीवर पडणार आहेत. त्यादृष्टीनं ही जीवनकौशल्यं उपयोगाला येतील, हो ना?

-------------------

Teenage Parenting
Teenage Parenting: किशोरवयीन मुलांशी संवाद साधताना या ८ पद्धतींचा करा वापर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com