

Tejal Hasabnis Cricketer
esakal
टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळणं ही दुय्यम दर्जाची गोष्ट मानली जाते, परंतु अशाच चेंडूवर सराव करता करता भारतीय संघात स्थान मिळविणं ही काही सोपी गोष्ट नाही. ही आव्हानात्मक कामगिरी पुण्याच्या तेजल हसबनीस या अष्टपैलू खेळाडूने करीत आपल्या भावी यशाची झलक दाखवून दिली आहे. अलीकडेच उदयोन्मुख खेळाडूंच्या आशियाई अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात तिनं महत्त्वाचा वाटा उचलला होता. तिच्याशी मारलेल्या गप्पा...
तेजलला खरंतर भारतीय हवाई दलात करिअर करायचं होतं. पण महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २०११मध्ये भारतीय संघानं विश्वकरंडकावर नाव कोरल्यानंतर अनेक मुला-मुलींना आपणही क्रिकेटमध्येच करिअर करावं असं वाटलं नसतं तर नवलच! लहानपणी आपल्या सोसायटीत इतर मुलांबरोबर टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळणाऱ्या तेजललादेखील क्रिकेटमध्येच करिअर करण्याची प्रेरणा मिळाली. आशियाई करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर जेमतेम दोन-तीन दिवसच तिला पुण्यात येण्याची संधी मिळाली. या दोन-तीन दिवसांतही तिनं नियमित व्यायामाची सवय मोडली नाही. पुण्यात शिंदे प्रशालेच्या मैदानावर सराव संपल्यानंतर तिनं आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीविषयी व भावी करिअरविषयी संवाद साधला.