

Climate change & carbon cycle
esakal
डॉ. गुरूदास नूलकर
कार्बन चक्रामुळे माती सुपीक राहते, महासागरीय आम्लता नियंत्रित होते आणि ऑक्सिजन चक्र शक्य होते. वनस्पती, समुद्र आणि पाणथळ प्रदेश यांना नैसर्गिकरित्या सशक्त ठेवणे हा पृथ्वीला थंड ठेवण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. आपण या नैसर्गिक स्रोतांचे रक्षण केले, तरच आपण हवामान बदलाच्या संकटावर मात करू शकू. त्यामुळे कार्बन चक्र हे पृथ्वीचे ‘थर्मोस्टॅट’ आहे आणि त्याचे संरक्षण करणे मानवी अस्तित्वासाठी अनिवार्य आहे.
जागतिक पातळीवर होणारे कार्बन डायऑक्साइड आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे जागतिक तापमानवाढी महत्त्वाचे कारण आहे. तापमानवाढ रोखायची, तर हे उत्सर्जन कमी करण्याशिवाय पर्याय नाही, असे तज्ज्ञ गेली अनेक वर्षे सांगत आहेत. या कार्बनचे शोषण पृथ्वीवरील काही नैसर्गिक घटक सातत्याने करीत असतात. पृथ्वीचे वातावरण संतुलित ठेवण्यासाठी कार्बनचे शोषण ही निसर्गाची अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. वनस्पती, जंगले, समुद्र आणि पाणथळ जागा नैसर्गिकरित्या वातावरणातील कार्बन शोषून घेतात आणि पृथ्वीचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत करतात. त्यांना ‘कार्बन सिंक्स’ म्हणतात.
वनस्पती ज्या प्रक्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात, त्याला मराठीत ‘प्रकाशसंश्लेषण’ आणि इंग्रजीमध्ये ‘फोटोसिंथेसिस’ म्हणतात, हे सगळ्यांनाच माहीत आहे. प्रकाशसंश्लेषण ही वनस्पतीजगतातील सर्वात मूलभूत जैवरासायनिक प्रक्रिया आहे. हिरव्या वनस्पती आणि शैवाल यांच्यामध्ये हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल असते. हे सजीव सूर्यप्रकाशातील ऊर्जेचा वापर करून कार्बन डायऑक्साइड वातावरणातून शोषून घेतात आणि जमिनीतून पाणी घेऊन त्यावर प्रक्रिया करतात. यातून ग्लुकोज म्हणजे साखरेसारखे कार्बोहायड्रेट तयार करतात. हे त्या वनस्पतींचे अन्न असते आणि यातूनच त्यांची वाढ होत जाते. प्रकाशसंश्लेषण या प्रक्रियेतून एक उपघटक बाहेर पडतो, तो म्हणजे प्राणवायू किंवा ऑक्सिजन. म्हणजे वनस्पती एकीकडे स्वतःसाठी आणि इतर सजीवांसाठी अन्न तयार करतात, आणि दुसरीकडे प्राणवायूनिर्मितीही होते. त्यामुळे प्रकाशसंश्लेषण ही प्रक्रिया पृथ्वीवरील वनस्पतीएतर सर्व सजीवांची आधारस्तंभ आहे. वातावरणातील सुमारे ७० टक्के ऑक्सिजन यातूनच मिळतो.