रैदासजींच्या बेगमपुऱ्यापासून एका अर्थाने मध्ययुगीन भारतात समाजवादी समाजाची संकल्पना सर्वप्रथम अवतरली.

sant ravidas
sant ravidasesakal

भक्ती आंदोलनात सक्रिय असलेल्या सर्व संतांच्या वाणीत व रचनांमध्ये समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यांचे विचार कमी-अधिक प्रमाणात प्रकट होताना दिसतात. असे असले तरी रैदासजींच्या वाणीमध्ये ह्या विचारांचे अस्तित्व अधिक ठळक व प्रभावीपणे जाणवते.

डॉ. राहुल हांडे

अब हम खूब वतन घर पाया, उंचा खेरसदा मन भाया ।

बेगमपुरा सहर का नाऊं, दुःख अंदेस नहीं तिहीं ठाऊं ।।

ना तसबीस खिराजु न मालू खौफन खता न तरसु जवालु ।

काइमु दाइमु सदा पातिसाही, दाम न, साम एक सा आही ।

आवादानु सदा मसहूर ऊहांगनी बसहिं मामूर ।

तिउं-तिउं सैर करहिं जिउ भावै, हरम महल मोहिं अटकावै ।

कह रैदास खलास चमारा, जो उस सहर सों मीत हमारा ।।

आता मला खूप चांगला देश अथवा गाव आणि घर मिळाले आहे. ह्या शहराचे नाव ‘बेगमपुरा’ (बेगम- गम अथवा दुःख नसलेले शहर) असे आहे. याठिकाणी दुःख आणि आशंका यांना स्थान नाही. येथे कशाची पडताळणी होत नाही. कोणत्याही मालावर कोणताही कर नाही.

येथे भय नाही आणि कोणी अपराधदेखील करत नाही. येथील बादशाहत म्हणजे राजवट चिरंतन आहे. साम आणि दाम एकसमान आहेत. बेगमपुऱ्यात कोणीही कोठेही येऊ जाऊ शकते. येथे फिरण्याला कोणी कुणाला अटकाव करत नाही.

ह्या आबाद म्हणजे समृद्ध शहरात सर्व लोक संतुष्ट व समाधानी आहेत. त्यामुळेच हा चर्मकार रैदास म्हणतो, की अशा शहरात असलेला किंवा आलेला प्रत्येकजण आमचा मित्र आहे.

बेगमपुरा ह्या काल्पनिक शहराच्या वर्णनातून रैदासजींनी युरोपात सर थॉमस मूर यांच्या ‘युटोपिया’च्या (इ.स.१५१६) समांतर आणि कार्ल मार्क्सची ‘कम्युन’ संकल्पना अस्तित्वात येण्यापूर्वी त्याचे भारतीय प्रारूप दिलेले दिसते.

sant ravidas
Secular-Socialist: राज्यघटनेच्या सरनाम्यातून 'सेक्युलर', 'सोशलिस्ट' शब्द वगळले! अधिवेशनादरम्यान गोंधळ

भक्ती आंदोलनात सक्रिय असलेल्या सर्व संतांच्या वाणीत व रचनांमध्ये समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यांचे विचार कमी-अधिक प्रमाणात प्रकट होताना दिसतात. असे असले तरी रैदासजींच्या वाणीमध्ये ह्या विचारांचे अस्तित्व अधिक ठळक व प्रभावीपणे जाणवते.

समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ह्या तत्त्वत्रयीवर आधारित समाज म्हणजे त्यांचा बेगमपुरा. उत्तर भारताला प्रेरणादायी ठरलेल्या महाराष्ट्रातील भक्ती आंदोलनात चोखोबा पांडुरंगाला स्वतःच्या स्थितीविषयी आणि जन्मजात अवहेलनेविषयी सवाल करतात.

या जन्मात समाजव्यवस्थेद्वारे लादण्यात आलेल्या दुःखाला पूर्वजन्मीच्या पापावर सोडून देतात आणि स्वतःच्या मनाचे समाधान करून घेतात. त्यांच्यानंतर जन्मलेले रैदासजी त्यांच्या पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी योग्य जगाची कल्पना बेगमपुराच्या रूपाने मांडतात.

ह्या दोन बिंदूंना साधले तर दलित जाणिवेचा होत जाणारा विस्तार आपल्या लक्षात येऊ शकतो. रैदासांचा बेगमपुरा त्यांच्या समकालीन समाजव्यवस्थेला तिच्यातील उणिवा दाखवताना दिसतो.

बेगमपुरा वसवण्याचे स्वप्न पाहणारे रैदासजी आणखी काही ठिकाणी आपली समतावादी विचारधारा व्यक्त करताना दिसतात. जातिगत अवहेलना, गरिबी आणि हतबलता त्यांना भक्तीच्या पारलौकिक विश्वातून लौकिक विश्वात आणल्याशिवाय राहत नाही. समाजाच्या ठेकेदारांना थेट सवाल करण्याचा तो काळ नव्हता.

तसेच रैदासजींसारख्या शूद्र संतांना भक्तीच्या माध्यमातून सामाजिक वास्तवाची दाहकता व्यक्त करण्यासाठी परमेश्वर सोडून कोणता पर्याय नव्हता. मध्ययुगीन भारतातील चर्मकार समाजातील रैदास कोणालाच थेट प्रश्न करण्याचे धैर्य दाखवू शकत नव्हता.

अशावेळी शुद्रांना-गरिबांना जाळणारी पिढ्यानं पिढ्यांची भूक त्यांच्या चिंतनाच्या केंद्रस्थानी येणे स्वाभाविकच होते. ह्या भुकेसाठी रैदासजी परमेश्वराला आपल्या भाषेत ‘हेची दान देगा देवा’ असे सांगताना म्हणतात -

माधवे! पारस मनि लै जाऊ,मोहिं सोने का नहिं चाऊ ।

जउ मों पै राम दयाला,देउ चून लून घीऊ दाला ।

मै रुखी सूखी खाऊं, औरन की भूख मिटाऊं ।

कोई परै ना दुःख की पासा, सब सुखी बसे रैदासा ।।

हे माधवा! आपला पारस मणी परत घेऊन जा. मला सोन्याचीदेखील आस नाही. तू खरोखरच माझ्यावर कृपावंत असशील तर मला पीठ, मीठ, तूप आणि डाळ दे. त्यातून मी कोरडी भाकर खाऊ शकेन आणि इतरांचीही भूक शमवेन.

माझी एवढीच इच्छा आहे की कोणीही भुकेच्या दुःखात अडकून पडू नये आणि सर्व सुखी रहावेत.

sant ravidas
Shri Sant Gajanan Maharaj : हजारोंच्या उपस्थितीत श्रींच्या पालखीचे बुलडाणा जिल्हात आगमन

रैदासांचे हे मागणे पसायदान अथवा हेची दान देगा...चा विस्तार गाठू शकणारे नसले तरी अनंत काळाच्या भुकेला आकळणारे ठरते. आपण ज्या सामाजिक स्तरातून आलो आहोत. तेथील भूक आणि ह्या भुकेमुळे जीवनाला व्यापणारे दुःख रैदासजी विसरत नाहीत.

त्यांना परमेश्वराकडून आपल्यासाठी काही नकोय कारण भक्तीने त्यांना भौतिक सुखांच्या पल्याड पोहोचवले आहे. त्यांना स्वतःसोबतच आपल्या पददलित बांधवांच्या भुकेचा प्रश्न परमेश्वराकडून सोडवायाचा आहे.

कारण ही भूकच त्यांना माणूस म्हणून जगण्यास असमर्थ ठरवत आहे. एवढेच काय तर त्यांचे जीवन निरर्थक ठरवत आहे. हा समाज भुकेच्या विळख्यातून सुटला तर तो इतर उच्च मानवी मूल्य-मुक्ती-मोक्ष असो की उच्च कोटीचा त्याग असो याचा विचार करू शकतो.

कदाचित भूक मिटली तर त्यांना परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवता येऊ शकेल.

रैदासजी आणि युटोपियाचे लेखक थॉमस मूर यांच्यामध्ये कमालीचे साधर्म्य आढळून येते. हे दोघे समकालीन होते. रैदासजींचे निर्वाण इ.स. १५२०च्या दरम्यान झाले, तर इ.स. १५३५मध्ये थॉमस मूर यांचे निधन झाले.

मूर यांनी आपल्या युटोपियामध्ये समाजवादी समाजाचे चित्रण केलेले आहे. त्याचवेळेस भारतात रैदासांसारख्या दलित संतकवीने बेगमपुराची कल्पना मांडली आहे.

कवी, संत या भूमिकांच्या पुढे जाऊन रैदास समाज तत्त्वचिंतक आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून आपले चिंतन व अभ्यास व्यक्त करतात. त्यांचे हे वेगळेपण लक्षात आल्याशिवाय राहत नाही. भक्ती आंदोलनातील उच्चवर्णीय संतांच्या विचारात आणि वाणीत हा पैलू आढळून येत नाही.

अशावेळी रैदास समाजवादी समाजाची अपेक्षा करतात. याचा शोध घेताना असे लक्षात येते, की उच्चवर्णीय संत माणसाच्या श्रीमंती अथवा गरिबीला पूर्वजन्माचे फळ मानत होते. दुसरे म्हणजे ते गरीब नव्हते. रैदासांची गरिबी मात्र जातिगत गरिबी होती.

शूद्र गरीबच जन्माला येत होता आणि मरत होता. त्यामुळे शुद्रांमध्ये आपली गरिबी ही पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ आहे, अशी भावना दृढमूल होणे स्वाभाविक होते. त्यामागील सामाजिक असमतेच्या विचारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे ज्ञानदेखील नव्हते.

अशावेळी बेगमपुरा हे कोणताही कर द्यावे न लागणारे शहर आहे. साम म्हणजे परस्पर सांमजस्य अथवा समता आणि दाम म्हणजे मोलदेखील समान आहे. येथील दाम अथवा मोलाची समता माणसांसाठीदेखील अपेक्षित आहे. भेदभाव, अस्पृश्यता, उच्च-नीच भाव यांनादेखील बेगमपुऱ्यात स्थान नाही. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांच्या पायावर बेगमपुरा उभा असलेला दिसतो.

sant ravidas
Sant Dnyaneshwar :भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण संत ज्ञानेश्वर!

थॉमस मूर आणि रैदासजी यांच्या समाजवादात एक मूलभूत अंतरदेखील सांगता येते. मूर यांच्या युटोपियात आलेला समाजवाद हा युरोपातील प्रबोधन काळाचा परिपाक होता. त्यांनी युटोपियात मांडलेला समाजवाद हा युरोपातील अनेक विचारवंतांच्या चिंतनाचा व मांडणीचा प्रभावदेखील होता.

थोडक्यात मूर यांच्या समाजवादाची तात्त्विक पार्श्वभूमी तयार झालेली होती. त्यांनी केवळ समाजवादाच्या संकल्पनेला प्रतिभा व लालित्य यांची जोड देऊन कादंबरीच्या रूपात सादर केले. रैदासांना अशी कोणतीच पार्श्वभूमी नव्हती. काही अभ्यासकांच्या मते चर्मकार समाज हा पूर्वाश्रमीचा बौद्ध होता.

त्या संदर्भाने विचार केला तरी रैदासांपर्यंत बौद्ध धर्माशी व तत्त्वज्ञानाशी या समाजाचा संबंध विस्मृतीत गेलेला होता. शुद्रत्वामुळे चावार्क-बुद्ध-गोशाला मखाली इत्यादी ऐहिक तत्त्वज्ञानांचा आणि रैदासांचा संबंध येण्याचे कारण नव्हते.

त्यांचे ज्ञान आणि भक्ती मार्ग हा केवळ श्रवण आणि स्मरण यांच्या माध्यमातून विस्तारित झालेला आहे. त्यामुळे रैदासांच्या अध्यात्माला शास्त्रांच्या कसोटीवर पडताळणे व्यर्थ आहे.

अध्यात्म, धर्म, भक्ती यासंदर्भात त्यांना जे श्रवण करता आले आणि स्मरण ठेवता आले, त्याचा आधार घेत त्यांनी भक्ती मार्गावर मार्गक्रमण केले. अशा सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या रैदासजींचा बेगमपुरातील समाजवाद हे विशुद्धपणे त्यांच्याच चिंतनाचा सार होते.

sant ravidas
Sant Janabai: स्त्री संत आपली परमेश्वरभक्ती कशा व्यक्त करीत असतील?

रैदासजींचा बेगमपुरा मध्ययुगीन संरजामशाहीवरदेखील भाष्य करणारा आहे. त्यांच्या निर्गुणवादी काव्याच्या तुलनेत विचार करता बेगमपुरा आध्यात्मिक अनुभूतीची रचना अजिबात नाही. तत्कालीन सरंजामी व्यवस्थेचे दर्शन घडवत भारतीय समाज व्यवस्थेला अनुकूल समाजवाद मांडण्याचा रैदासांनी केलेला प्रयत्न म्हणजे त्यांचा बेगमपुरा.

हर का भजे सो हर का कोई अशी सर्वसाधारण धारणा भक्ती आंदोलनातील संतांची होती. अभिजन वर्गातील आणि आर्थिक संपन्न स्तरातील संतांना रैदासजी असो वा चोखोबा यांच्या जीवनसंघर्षाची आणि त्यांच्या चिरंतन व्यथा-वेदनांची जाणीव असणे शक्यच नव्हते.

रैदासजींचा संघर्ष भक्ती मार्गावरील षड््रिपूंपासून प्रारंभ न होता भुकेपासून व अवहेलनेपासून प्रारंभ होत होता. त्यामुळे त्यांना पारलौकिक वैकुंठापेक्षा लौकिक बेगमपुरा निर्माण होणे महत्त्वाचे वाटल्यास नवल नाही. रैदासजींच्या बेगमपुऱ्याच्या प्रभावातून सतराव्या शतकात 'सतनामी' नावाचे एक सशस्त्र संघटन उभे राहिले होते.

पंजाबातील रैदास पंथीयांनी बेगमपुरा संकल्पनेचा आधार घेत २०१२ साली बेगमपुरा लोक पार्टी नावाचा पक्षही स्थापन केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरदेखील बेगमपुराच्या समाजवादी कल्पनेने प्रभावित झाले होते. रैदासजींच्या बेगमपुऱ्यापासून एका अर्थाने मध्ययुगीन भारतात समाजवादी समाजाची संकल्पना सर्वप्रथम अवतरली.

युरोपातील प्रबोधन काळाला समांतर समाजव्यवस्थेनं सर्वकाही नाकारलेल्या वर्गातून आलेला एक संत भूवैकुंठाची निर्मितीसाठी नकळतपणे समाजवादी संकल्पना मांडून जातो, हे मध्ययुगीन भक्ती आंदोलनातील एक सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरल्याशिवाय राहत नाही.

-----------------

sant ravidas
डॉ. बाबासाहेब आंबेडकर थोर क्रांतिकारक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com