प्रतिनिधी
संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया मातीच्या छोट्या सुगडांमध्ये हरभरा, कापूस, हळकुंड, गव्हाच्या ओंब्या, उसाचे करवे घालून एकमेकींना वाण देतात. रथसप्तमीच्या दिवसी सूर्यनारायणाची पूजा केली जाते.
तारखेनुसार साजरा केला जाणारा संक्रांत हा बहुधा एकमेव सण असावा. दरवर्षी १४ जानेवारी आणि लीप वर्ष असेल तर १५ जानेवारीला ‘संक्रांत’ येते! सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो तो हा दिवस. या दिवसापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो.
पृथ्वीची स्वतःभोवती आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा सुरू असताना, तिची उत्तर धृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते त्या स्थितीला उत्तरायण आणि दक्षिण धृवाकडील बाजू जास्तीत जास्त सूर्याच्या जवळ येते त्या स्थितीला दक्षिणायन म्हणतात. उत्तरायणामुळे दिवस मोठा होऊ लागतो व रात्री लहान होऊ लागतात. हवेतला उष्मा वाढू लागतो. थंडीनं गारठलेली सृष्टी पुन्हा फुलून येण्यासाठी सज्ज होते.