कार रेसिंग ड्रायव्हिंगमधील गुणवत्ता दैवी लाभलेला; पहिला कृष्णवर्णीय 'फॉर्म्युला वन रेसिंग' जगज्जेता!

वेगवान, थरारक, रोमांचक मोटरस्पोर्ट््स असलेल्या फॉर्म्युला वन रेसिंगमधील यावेळच्या मोसमाला पुढील महिन्यात सुरुवात
luis hamilton
luis hamiltonesakal
Updated on

किशोर पेटकर

सन २०२५ मध्ये हॅमिल्टनच्या सफल अनुभवाचा आधार घेण्याचे फेरारी संघाने ठरविले आहे. पुढील वर्षी हॅमिल्टन चाळिशीत असेल, तरुणपणीचे जोशपूर्ण ड्रायव्हिंग साधत तो पुन्हा जगज्जेतेपद पटकावेल का या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावीच लागेल.

वेगवान, थरारक, रोमांचक मोटरस्पोर्ट््स असलेल्या फॉर्म्युला वन रेसिंगमधील यावेळच्या मोसमाला पुढील महिन्यात सुरुवात होत आहे. मार्च महिन्याच्या दोन तारखेला बहारीन ग्रांप्रीने जागतिक मालिकेला प्रारंभ होईल.

त्यापूर्वीच एक सनसनाटी घोषणा झाली. मर्सिडीज-एएमजी पेट्रोनास मोटरस्पोर्ट््स संघातील सात वेळचा जगज्जेता ब्रिटिश ड्रायव्हर लुईस हॅमिल्टन आणि फेरारी संघ यांच्यातील कराराने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.

मर्सिडीज संघातर्फे हॅमिल्टनची २०२४मध्ये अखेरची फॉर्म्युला वन मालिका असेल. तो सध्या ३९ वर्षांचा असून कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे, त्यामुळे तब्बल अकरा वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या संघात असतानाच तो फॉर्म्युला वन रेसिंगला अलविदा करण्याची अटकळ होती.

कारकिर्दीत १०३ शर्यती जिंकलेल्या या महान ड्रायव्हरने आपण थांबणार नसल्याचे स्पष्ट करताना, फेरारीची गाडी भरवेगाने अफलातून कौशल्याने चालविण्याचे निश्चित केले आहे.

ज्युनियर पातळीवरील कार रेसिंगमध्ये लौकिक प्राप्त केल्यानंतर हॅमिल्टन पूर्णपणे व्यावसायिक झाला, ते वर्ष होते २००७. मॅक्लॅरेन संघात तो दाखल झाला. २०१२पर्यंत तो या संघात होता.

मॅक्लॅरेन संघातील गाड्यांमध्ये फॉर्म्युला वन रेसिंगसाठी मर्सिडीजचे तंत्रज्ञान वापरले जाते. हॅमिल्टन नंतर २०१३ साली मर्सिडीज संघात दाखल झाला. आता २०२४मध्येही तो याच संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

तब्बल १७ वर्षे या झंझावाती ब्रिटिश ड्रायव्हरने मर्सिडीज तंत्रज्ञानाची गाडी बेफामपणे चालविली. आत पुढील वर्षी तो प्रथमच बिगर मर्सिडीज तंत्रज्ञान असलेली फेरारीची गाडी चालविणार आहे. त्यामुळे त्याच्या ड्रायव्हिंग कौशल्याकडे लक्ष राहील.

वयाच्या चाळिसाव्या वर्षी हॅमिल्टन फेरारीला गतवैभव मिळवून देऊ शकतो का? याचीही चर्चा आतापासूनच सुरू झालीय. फॉर्म्युला वन जागतिक मालिकेत फेरारीची कार गतमोसमात काहीप्रमाणात वेगवान ठरली होती.

कदाचित त्यामुळे हॅमिल्टनने २०२५ साली इटालियन कारला प्राधान्य दिल्याचा कयास आहे. त्याने मर्सिडीजची कार चालविताना जागतिक रेसिंगमध्ये अनोखा अध्याय लिहिला; सातपैकी सहा वेळा तो मर्सिडीजच्या गाडीतून जगज्जेता ठरला, मात्र गेल्या दोन वर्षांत त्याची ही कार तुलनेत संथ ठरली.

२०२१, २०२२ व २०२३मध्ये मर्सिडीजला रेड बुल संघाने मागे टाकले. हॅमिल्टनने २०२१ साली सौदी अरेबियातील जेद्दा येथे शेवटची शर्यत जिंकली होती. मागील दोन वर्षांत त्याला एकही शर्यत जिंकता आली नाही, त्यामुळे २०२४ हे त्याचे फॉर्म्युला वन रेसिंगमधील अखेरचे वर्ष असल्याचे मानले जात होते.

कारकिर्दीत एकूण १९७ वेळा पोडियमपर्यंत पोहोचलेल्या या महान ड्रायव्हरने आता साऱ्या शक्यतांना तिलांजली दिली आहे. मर्सिडीज संघ सोडताना हॅमिल्टनने सोशल मीडियावरील आपल्या मनोगतात कोणतीही कटुता व्यक्त न करता उलट खुल्या दिलाने जर्मन कार कंपनीचे आभार मानले आहेत.

फेरारीची लाल गाडी चालविणे हे बालपणापासूनचे स्वप्न होते, त्याची पूर्तता होणार आहे. वयाच्या १३व्या वर्षीपासून मर्सिडीजने आपल्या आयुष्यात फार मोठी भूमिका बजावली असून हा संघ सोडण्याचा निर्णय खूपच कठीण असल्याचे हॅमिल्टनने मनोगतात नमूद केले आहे.

दिग्गज ड्रायव्हर

लुईस हॅमिल्टनने सात वेळा फॉर्म्युला वन रेसिंगमधील जगज्जेतेपद पटकावले. फॉर्म्युला वन रेसिंगमधील तो पहिला कृष्णवर्णीय ड्रायव्हर.

कार रेसिंग ड्रायव्हिंगमधील त्याची गुणवत्ता दैवी मानली जाते. वेग आणि कौशल्य यांचा अचूक संगम साधत त्याने गाडीवर पूर्ण नियंत्रण राखत रेसिंगमधील लौकिक कायम ठेवला.

आणखी एक महान फॉर्म्युला वन ड्रायव्हर मायकेल शुमाकर याच्या विश्वविक्रमाशी हॅमिल्टनने २०२०मध्ये बरोबरी साधली. शुमाकरने फेरारीचे प्रतिनिधित्व करताना सातपैकी पाचवेळा जगज्जेतेपद पटकावले होते. योगायोग असा, की आता हॅमिल्टनही याच फेरारी संघात दाखल झाला आहे.

मॅक्लॅरेन संघात दाखल झाल्यानंतर पहिल्याच वर्षी २००७मध्ये हॅमिल्टन जागतिक उपविजेता ठरला, मात्र पुढच्या वर्षी त्याने पहिले जगज्जेतेपद पटकावले.

ही किमया त्याला पुन्हा साधता आली नाही आणि २०१३पासून त्याने मर्सिडीज संघाचे प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली. हॅमिल्टन व मर्सिडीज यांची जोडी जमली आणि जागतिक फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये नवा इतिहास रचला गेला.

२०१४ व २०१५मध्ये आणि नंतर २०१७ ते २०२०पर्यंत सलगपणे हॅमिल्टनने जगज्जेतेपदावर हक्क सांगितला. २०२१मध्ये तो उपविजेता ठरला, त्यामुळे शुमाकरला मागे टाकणे त्याला शक्य झाले नाही.

२००७ साली कॅनेडियन ग्रांप्री शर्यत जिंकून यशस्वी कारकिर्दीचा श्रीगणेशा केलेल्या हॅमिल्टनने १७ वर्षांच्या कालखंडात खूप मोठी मजल मारली आहे. माजी जगज्जेता फर्नांडो अलोन्सो प्रारंभीच्या काळात हॅमिल्टनचा प्रतिस्पर्धी होता.

पुढे मर्सिडीज संघात दाखल झाल्यानंतर हॅमिल्टन व निको रॉसबर्ग यांच्यातील चुरस पाहायला मिळाली. किमी रैकोनन यानेही हॅमिल्टनला आव्हान दिले. रेसिंग ट्रॅकवर हॅमिल्टन व रेड बुल संघाचा सेबॅस्टियन व्हेट्टेल यांच्यातील रंगतदार द्वंद अनुभवायला मिळाले.

जबरदस्त चुरस आणि जिंकण्याची भूक यातून हॅमिल्टनमधील ड्रायव्हर अधिकच विकसित होत गेला. २०१७ ते २०२० या कालावधीत त्याने सलग चार वेळा जगज्जेतेपद पटकावताना विक्रमी कामगिरी नोंदवली.

नव्या गुणवत्तेचे आव्हान

हॅमिल्टन कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असताना रेड बुल रेसिंगच्या मॅक्स व्हर्स्ताप्पन याने ब्रिटिश ड्रायव्हरचा दबदबा मोडून काढला. २०२१ ते २०२३ अशी सलग तीन वर्षे व्हर्स्ताप्पन जगज्जेता ठरला. २०२१मध्ये हॅमिल्टन उपविजेता ठरला.

त्या वर्षी त्याने आठ शर्यती जिंकत व्हर्स्ताप्पनसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र २०२२ व २०२३मध्ये हॅमिल्टनची मर्सिडीज कार रेड बुल रेसिंगच्या वेगासमोर फिकी ठरली. व्हर्स्ताप्पन याने निर्विवाद वर्चस्व राखले.

या दोन्ही वर्षी हॅमिल्टनला एकही शर्यत जिंकता आली नाही. २०२२मध्ये तो चक्क सहाव्या क्रमांकावर फेकला गेला. तुलनेत गतवर्षी एका शर्यतीत पोल पोझिशन मिळवत त्याने जागतिक मालिकेत तिसरा क्रमांक प्राप्त केला.

भन्नाट रेसिंग करताना हॅमिल्टन कधीच कचरला नाही. नवी आव्हाने स्वीकारण्यास त्याने नेहमीच प्राधान्य दिले. आता फॉर्म्युला वन रेसिंगमधील नवी गुणवत्ता त्याला वरचढ ठरत आहे. त्यातच आता त्याची मर्सिडीज कार अपेक्षित वेग घेताना दिसत नाही.

व्हर्स्ताप्पनने हॅमिल्टनला शह दिलेला आहेच, खुद्द मर्सिडीज संघात त्याचा सहकारी जॉर्ज रसेल उल्लेखनीय प्रगती साधताना दिसत आहे.

२०२४मध्ये हॅमिल्टनसमोर आपल्याच संघातील युवा ड्रायव्हरकडून जोरदार आव्हान असेल. गतवर्षी रसेलने हॅमिल्टनच्या वेगाची परीक्षा पाहिली होतीच.

फेरारीचा किमी रैक्कोनन २००७ साली जगज्जेता बनला होता, त्यानंतर या जगप्रसिद्ध गाडीचा ड्रायव्हर फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये जगज्जेतेपद मिळवू शकलेला नाही.

त्यानंतर मर्सिडीजचा हॅमिल्टन, तसेच रेड बुल रेसिंगचे सेबॅस्टियन व्हेट्टेल व मॅक्स व्हर्स्ताप्पन यांचाच दबदबा रेसिंग ट्रॅकवर पाहायला मिळाला आहे.

आता २०२५मध्ये हॅमिल्टनच्या सफल अनुभवाचा आधार घेण्याचे फेरारी संघाने ठरविले आहे. पुढील वर्षी हॅमिल्टन चाळिशीत असेल, तरुणपणीचे जोशपूर्ण ड्रायव्हिंग साधत तो पुन्हा जगज्जेतेपद पटकावेल का या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावीच लागेल.

------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com