

Egg Biryani recipe
esakal
साहित्य
पाच ते सहा उकडून सोललेली अंडी, २ कप तांदूळ, २ उभे चिरलेले कांदे, १ टेबलस्पून मिरची पावडर, २ टीस्पून किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ, चार टेबलस्पून तेल, गरजेनुसार तूप, १ टेबलस्पून गुलाबपाणी, अर्धा कप तळलेला कांदा, १ गोल कापलेला टोमॅटो.
वाटणासाठी
अर्धा कप सुकं खोबरं, अर्धा कप तळलेला कांदा, अर्धा कप पुदिना, अर्धा कप चिरलेली कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, १ मसाला वेलदोडा, १ टीस्पून शहाजिरं, ४ चक्रीफूल पाकळ्या, ६ ते ७ लसूण पाकळ्या, १ इंच आलं.
कृती
सर्वप्रथम दोन कप तांदळाचा मोकळा भात तयार करून घ्यावा. कढईत तेल तापवावं. त्यात कांदा आणि वाटण घालून चांगलं परतून घ्यावं. मग त्यात मिरची पावडर, किचन किंग मसाला घालून चांगलं परतून घ्यावं. एक कप गरम पाणी घालून चवीनुसार मीठ घालावं आणि एकाचे दोन काप करून उकडलेली अंडी घालावीत. थर लावण्यासाठी पातेल्यात कांदा आणि टोमॅटोचे गोल काप पसरून घ्यावेत. त्यावर तयार भात निम्मा घालून तूप घालावं. त्यावर अंड्याचं मिश्रण पसरून घ्यावं. पुन्हा त्यावर तळलेला कांदा आणि कोथिंबीर घालून राहिलेला सगळा भात घालावा. शेवटी तळलेला कांदा, कोथिंबीर आणि गुलाबपाणी घालून बिर्याणी घट्ट झाकावी. तापलेल्या तव्यावर हे भांडं ठेवून मोठ्या आचेवर पाच मिनिटं आणि लहान आचेवर दहा मिनिटं ठेवून बिर्याणीला चांगला दम द्यावा. बिर्याणी सर्व्ह करताना भांड्याच्या खालपर्यंत डाव घालून थर काढावेत.