

Bali Tourism Culture and Spirituality
esakal
बालीतील अनुभव केवळ डोळ्यांचे नाही, तर मनाचेही पारणे फेडणारा आहे. प्रत्येक घरासमोर रोज श्रद्धेने ठेवला जाणारा नैवेद्याचा टोपला, सतत हसतमुख असणारे आणि आदराने वागणारे लोक, साधेपणा आणि अध्यात्म यांचा अप्रतिम संगम हे बालीचे खरे वैभव आहे. गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय कमी असलेले हे बेट धकाधकीच्या आयुष्यात जगण्याचा वेग कमी करून वेळेचे मोल शिकवते.
एक सुंदर सायंकाळ... पुण्यातून निघताना मनात एक वेगळीच धाकधूक आणि प्रचंड उत्सुकता होती. पती अमित आणि आमच्या दोन मुली, वेदांती आणि तेजस्वी यांच्यासोबत पाहिलेले बाली सहलीचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरत होते. आमचे कौटुंबिक मित्र नीलेश बराटे यांच्या अनुभवसंपन्न मार्गदर्शनामुळे आमचा हा दहा दिवसांचा प्रवास अतिशय सुखकर झाला. मुंबईहून चेन्नईमार्गे इंडोनेशियातील बाली बेटावर पाऊल ठेवताच पहिल्याच क्षणी जाणवले, की हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर निसर्ग, संस्कृती, अध्यात्म आणि साहसाचा अद्भुत संगम असलेली अनुभवांची एक वेगळीच दुनिया आहे.
बालीमध्ये पाऊल ठेवताच येथील वेगळेपण भुरळ घालते, पण मनात परकेपणा अजिबात जाणवत नाही. रस्त्यांवरून फिरताना चौकाचौकांत गणपती, विष्णू आणि राम यांच्या अतिशय सुबक मूर्ती दिसतात. घरोघरी आणि दुकानांसमोर केळीच्या पानांत फुले, तांदूळ आणि उदबत्ती लावून सजवलेला ‘कॅनंग सारी’ हा नैवेद्य नित्यनेमाने अत्यंत श्रद्धेने दाखवला जातो. हा नैवेद्य घरातील व्यक्तींना वाईट शक्तींपासून दूर ठेवतो, अशी येथील लोकांची गाढ श्रद्धा आहे.
बालीच्या दैनंदिन जीवनात संस्कृत भाषेचा मोठा प्रभाव जाणवतो. पुरुषांची नावे वामन, सूर्य, तर स्त्रियांची नावे देवी, सरस्वती अशी सहज ऐकायला मिळतात. येथील रामायण आणि महाभारतावर आधारित कला व नृत्य परंपरा दोन देशांमधील प्राचीन दुव्याची साक्ष देतात. बालीतील ग्रामीण भागात फिरताना येथील गाईंचे आगळेवेगळे रूप पाहायला मिळते. बाली कॅटल प्रकारच्या गुरांच्या पायांचा गुडघ्यापर्यंत क्रीम किंवा पांढरा रंग असतो, जणू काही त्यांनी पांढरे पायमोजे घातले आहेत! हे एक अतिशय कुतूहलवर्धक भौगोलिक वैशिष्ट्य आहे. हे सर्व पाहताना आपण परदेशात नसून भारताच्याच एका दूरच्या, समुद्रापार गेलेल्या भगिनीला भेटत आहोत, अशी सुखद भावना दाटून येते.