

Konkan travel experience
esakal
रिक्षाचालक वयस्क पण शिक्षित वाटत होते. त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली आणि त्यांना मी इंदूरहून आलोय असं कळलं. पुळ्याच्या गणपती मंदिराजवळ उतरलो आणि त्यांना पैसे देऊ लागलो. त्यांनी चक्क पैसे घेण्यास नकार दिला आणि म्हणाले, ‘‘साहेब, तुम्ही इतक्या दुरून आमच्या कोकणात आला. तुम्ही आमचे पाहुणे. मग तुमच्याकडून पैसे घ्यायचे काय?’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘अहो, आमच्या इंदूरकडे एक म्हण आहे - घोडा यदि घास से दोस्ती करेगा, तो खाएगा क्या? तुमच्या रिक्षात तर माझ्यासारखे नेहमीच बसणार. तुम्ही पैसे घेतले नाही तर तुमचं चालणार कसं?’’ शेवटी त्यांनी पैसे घेतले.
माझी पाळंमुळं जरी महाराष्ट्रात असली तरी जन्म इंदूरचाच. त्यामुळे मला कुणी ‘तुम्ही कुठले?’ असं विचारलं (जे हमखास विचारलं जातंच), तर म्हणावंच लागतं की मी इंदूरचा. पण का कुणास ठाऊक, समजू लागलं त्या वयापासूनच महाराष्ट्राबद्दल आणि त्यातल्या त्यात कोकणाबद्दल एक प्रकारची आपुलकी वाटत आलीये. वाचता येऊ लागलं तेव्हापासूनच मराठी कवी आणि लेखकांच्या साहित्यात आढळणारं कोकण मनावर मोहिनी घालून खुणावत होतंच. तरीही कोकणाच्या लाल मातीचा स्पर्श व्हायला जीवनाची अडुसष्ट वर्षं वाट बघावी लागली! शेवटी काही दिवसांपूर्वी तो योग आला.