nostalgia
Esakal
ऋचा नामजोशी
आताशा जाम काय, तुती काय किंवा बोरं; ही सगळी कितीतरी वेळा बाजारातून विकत आणून खातो. पण त्याची गोडी हातानं तोडून खाल्लेल्या बोरांएवढी कशी असेल? स्वतः तोडून खाताना त्या बोरांना चिकटलेलं आठवणींचं बालपण जणू आपल्या हाती गवसतं आणि विलक्षण गोड आनंद देऊन जातं.
सगळ्यात पुढे मोहन सर, त्यांच्या मागे सातवी ते नववीतले मुलगे, मग मुख्याध्यापक सर, त्यांच्यामागे सातवी ते नववीतल्या मुली आणि शेवटी मी; अशी आमची रांग गावातून बाहेर रानात पक्षी बघायला चालली होती. गाव मागं पडून रानवाटा सुरू झाल्यावर मात्र मुंग्यांसारखी शिस्तीतली रांग हळूहळू मोडून शेळ्यांप्रमाणे वाभरत चालू लागली. त्याला कारणही तसंच होतं. बाजूच्या रानवाटा लाल-पिवळ्या बोरींनी पिकुळल्या होत्या. त्या खाण्याचा मोह माझ्यासकट साऱ्यांना होत होता. पण सर ओरडतील या भीतीपोटी सगळी निमूट पुढे चालत होती. त्यामुळे वाटेतल्या प्रत्येक बोरीपाशी थबकून, तिला मनात भरून घेत पुढे जाताना पहिल्यासारखी रांग कुठल्या कुठे मोडून गेली होती.