Konkan Coast
Esakal
नीती मेहेंदळे
मराठी मुलखातून भेटणाऱ्या अरबी समुद्राला आणि त्याच्या लगतच्या वातावरणाला एक मराठमोळा गंध आहे. इतके किनारे पाहिलेत मी, युरोपातले, अमेरिकेतले, अगदी जगाच्या दुसऱ्या टोकावरच्या गोड्या पाण्याचेसुद्धा, पण असा गंध जगात कोणत्याच किनाऱ्याला नाही. तोच आपल्याला खेचून आणतो कोकणकिनारी, बाकी कोणी नाही.
पुष्कळ वर्षं झाली. उत्तनच्या डोंगरावर उभी होते एकदा. सूर्य मावळतीला आला होता. समुद्रात बुडणारा सूर्य नेहमीच आत काहीतरी ढवळून जातो. तसा तो क्षितिजावर येऊन ठेपला होता. उंचीवर असल्यामुळे त्या विहंगम दृश्यात मधे येणारं सुदैवानं कोणीच नव्हतं. फक्त मी, समुद्र, सूर्य नि संध्याकाळ...! हेच दृश्य पुन्हा कितीक वेळा महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांवर किंवा किनारकट्ट्यांवर मी पाहिलं असेल. पण तेव्हा मराठी वाक्यं कानांवर पडत असत. खेकड्या-मासळीच्या वासानं जीव पार सुरमट, वशट होऊन जाई. पायांवरच्या वाळूच्या पुटांना अलग न करता किनाऱ्यावर दक्षिणोत्तर चालत राहायचं हा आवडता नाद असे.
आजूबाजूला कितीही माणसं असोत, आपली आतली शांतता आणि आपल्यापुरता सूर्यास्त जाणवून घ्यायला जमायला लागलं होतं. ही मुंबईची शिकवण. तिनंच शिकवलं, अशा वेळी फक्त भेळ खायची असते. मग कालांतरानं दक्षिणेत सरकत गेले तशी कांदाभजी, तळलेले ताजे मासे असंपण काय काय समुद्राच्या साक्षीनं खातात आणि ते त्या खारट हवेत उत्तम लागतं हे पण समजत गेलं. अशा ठिकाणी फुगे विकत घेऊन हवेत सोडून गंमत बघायची असते हेही ज्ञान पदरात पडलं. अलिबागसारख्या पर्यटनात प्रसिद्ध किनाऱ्यावर कंदिलांत दिवे घालून ते हवेत सोडले होते. ते मात्र मनोरम दृश्य ठरलं होतं. ही सगळी समृद्धी मिळाली ती फक्त माझ्या मराठी समुद्राकडून.