

Traditional Indian Thali
esakal
भाग्यश्री फडके-धर्माधिकारी
सर्व डाळी, कडधान्ये, दही, पनीर, अंडी, मासे, शिवाय इतर प्रथिनयुक्त घटक आहारात अंतर्भूत करता येऊ शकतात. भाज्या, सॅलड यांचे प्रमाण आहारात वाढवता येऊ शकते. संतुलित प्रमाणात कर्बोदके, प्रथिने, भाज्या, संपृक्त चरबी याचा मिलाफ असलेले अन्नपदार्थ आहारात समाविष्ट केले पाहिजेत. यासाठीच आपले पारंपरिक ताट आदर्श आहे. त्यात पोळी/भाकरी, भात याबरोबरच वरण, आमटी, उसळ, कोशिंबिरी, सॅलड, तेलबियांच्या चटण्या, दही, ताक असावे. आहारामध्ये बदल करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
सध्याची जीवनशैली पाहता, आपल्या घरांमध्ये भारतीय परंपरेतून आलेले सकस, पोषणमूल्य असलेले अन्न, खाद्यपदार्थ खाल्ले जात आहेत की जाहिरातींचा मारा केलेले निकृष्ट, चरबी वाढवणारे, आजारपण वाढवणारे पदार्थ खाल्ले जात आहेत, याकडे डोळसपणे बघण्याची गरज प्रकर्षाने समोर येत आहे. कुपोषणाशी लढा देण्यासाठी आणि चांगल्या पोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी सप्टेंबर हा महिना यावर्षीही राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला गेला. आरोग्य, उत्पादकता आणि सर्वांगीण विकासात पोषणाच्या भूमिकेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी अन्न व पोषण मंडळाने १९८२मध्ये हा उपक्रम सुरू केला.
प्रत्येक नागरिकाला - मग ती लहान मुले असोत, गर्भवती स्त्रिया असोत, वयोवृद्ध असोत किंवा कोणताही नागरिक असो - उच्च पोषणमूल्य असलेले देशी अन्न, खाद्यपदार्थ, श्रीधान्य उपलब्ध व्हावे आणि त्यातून आरोग्यपूर्ण देश घडावा, हासुद्धा हा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यामागचा उद्देश आहे.