

Why Students Choose Shortcuts in Competitive Exams
esakal
राज्यात सध्या उन्हाची तीव्रता अफाट आहे; हवामान असे बिकट असताना राज्यातली तरुणाई अशांत असून त्यांच्या मनातल्या अस्वस्थतेची धगही तितकीच वाढलेली आहे. ‘नीट’ या परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाच वेगवेगळ्या विद्याशाखांना प्रवेश घेण्याची गुणांची शेवटची मर्यादा आणि मुलांना पडलेले गुण यातली तफावतही वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची मुले अस्वस्थ आहेत. काही वर्षांपूर्वी अभियांत्रिकी शाखांतील जागा रिकाम्या राहण्याची वेळ याच राज्यात आलेली होती. राज्यात व्यवसाय व नोकरीच्या अनेक चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत, मात्र त्यावर तरुणांची वर्णी लागण्याची शक्यता दुरावत असून, हे थांबण्याची गरज आहे. म्हणजे एकीकडे हाताला काम नाही तर अनेक उद्योगात चांगले उमेदवार मिळत नाही, अशी विचित्र परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळीकडेच चांगले वातावरण आहे असे नाही. मात्र ज्यांना संधी मिळत आहे त्यांनी पुढे जायला हवे आणि तसे घडतही आहे, काही तरुणांना मोठमोठ्या कंपन्यांची पॅकेजेस ऑफर होत आहेत. दुसरीकडे काहींना साध्या संधी मिळणेही अवघड झाले आहे. त्यामुळे संधी खेचून आणण्यासाठी तंत्र बदलावे लागेल का, असा विचार करताना लक्षात येते की आपल्याकडे संधीचा शोध घेण्याची वृत्तीच लोपल्याचे वातावरण आहे.