

War and Peace Philosophy
esakal
डॉ. सदानंद मोरे
पेन, पेरी, रुसो किंवा कांट हे काही कवी नव्हते. पण संवेदनशील होते हे निश्चित. त्यामुळेच ते विश्वासाठी - निदान युरोपसाठी युद्धे थांबावीत, शांतता नांदावी, त्यासाठी संघराज्याची निर्मिती करावी अशा कल्पना करू शकतात. मानवाचा इतिहास हा जसा युद्ध आणि युद्धप्रयत्न यांनी युक्त आहे, तसाच तो शांततेच्या प्रयत्नांचा, त्यासाठी व्याकूळ होऊन झटणाऱ्यांच्या विचारांचाही आहे हे विसरता कामा नये.
‘विश्वाचे आर्त’ हा साप्ताहिक सकाळमधील महाप्रकल्प एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. तात्त्विक आणि व्यावहारिक अशा दोन्ही बाजूंनी सतराव्या आणि अठराव्या शतकांमधील युरोप खंडामधील युद्ध आणि शांतता याविषयीचे, म्हणजेच युद्ध थांबवून शांतता कशी प्रस्थापित करता येईल याचे.एखाददुसरे युद्ध आणि ते थांबवण्यासाठी केला जाणारा तह नव्हे तर युद्ध, या घटनेचे मानवी इतिहासातून कसे कायमस्वरूपी उच्चाटन होईल आणि शाश्वत शांतता कशी नांदेल हा तेव्हाच्या विचारवंतांपुढील महत्त्वाचा प्रश्न होता.
खरेतर युरोपच्या इतिहासामधील हा कालखंड विसंगती आणि विरोधाभास यांनी भरलेला आहे. युद्ध आणि शांतता यांचा तेव्हाचा ‘डिस्कोर्स’ किंवा विचारविश्व युरोप खंडापुरते मर्यादित आहे. शांततेची चर्चा करणाऱ्यांना युरोपबाहेरील देशांशी लढाया करून, ते जिंकून तेथे आपली वासाहतिक सत्ता गाजवण्यात काही गैर वाटत नाही. किंबहुना, ते आपले इतिहासदत्त कर्तव्यच नव्हे तर हक्क आहे, त्याला धर्माचे समर्थन तर आहेच, परंतु ते उचित वाटत नसल्यास संस्कृतीचे समर्थन मिळवता येते. असे करणे हा युरोपीय राष्ट्रांच्या ‘Civilizing Mission’चा भाग आहे, असा दावा केला जाई.