अ‍ॅन एम्पायर ऑफ रिझन

पाश्चात्त्य विचारविश्वाचा इतिहास लिहावयाचा झाला तर तो कोणत्या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून लिहावा या प्रश्नाचे एक अतिसंभाव्य उत्तर म्हणजे रिझन (Reason).
निकोलस दि कोंदरसेट
ॲलेक्सिस द टॉकविली
निकोलस दि कोंदरसेट ॲलेक्सिस द टॉकविलीesakal

डॉ. सदानंद मोरे

पाश्चात्त्य विचारविश्वातील बुद्धिवादाने एका बाजूला विज्ञानाला जन्म दिला, तर दुसऱ्या बाजूला बुद्धीचा प्रयोग समाजजीवनाच्या क्षेत्रातही करून सामाजिक, राजकीय व नैतिक संस्थांना व संकल्पनांनाही बुद्धीच्या पायावर उभे करायचा प्रयत्न केला. व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य असो की लोकशाही राज्यव्यवस्था असो, त्यांचा विकास बुद्धीच्या घुसळणीतूनच होऊ शकला.

पाश्चात्त्य विचारविश्वाचा इतिहास लिहावयाचा झाला तर तो कोणत्या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून लिहावा या प्रश्नाचे एक अतिसंभाव्य उत्तर म्हणजे रिझन (Reason). हेगेल या चिद्वादी (Idealist) तत्त्ववेत्त्याच्या मांडणीच्या लिखित रूपात तर रिझन शब्दातील ‘R’ कॅपिटल (मोठ्या लिपीत) लिहायचा पायंडा होता. या चिद्वादावर पुढे रसेल वगैरेंनी वैचारिक हल्ले चढवले. पॉझिटिव्ह विचारवंतांनी तर चिद्वादासह एकूणच मेटॅफिजिक्स निरर्थक ठरवून टाकले; पण तोही या विचारविश्वाचाच भाग होय, हे विसरता कामा नये.

तत्त्वज्ञानाच्या खोल पाण्यात न शिरता एवढे सांगता येते, की ही चर्चा थेट ग्रीक काळापासून सुरू होती. प्लेटो हे तिचे प्रातिनिधिक उदाहरण. प्लेटोचाच शिष्य ॲरिस्टॉटल याने माणसाच्या प्रत्यक्ष जगण्याच्या अंगाने विचार करीत अनुभवाला व बुद्धीच्या बाहेरील घटकांना यथोचित स्थान देत कोऱ्याकरकरीत बुद्धिवादाचे माहात्म्य थोडे कमी केले, तरी मानव म्हणजे ‘रॅशनल अॅनिमल’ ही त्याने केलेली मानवाची व्याख्या गृहीत धरूनच पाश्चात्त्य विचारविश्वाचा पुढील प्रवास झाला हे विसरता कामा नये. ग्रीकांच्या पतनानंतर उदयाला आलेल्या रोमन साम्राज्यात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला तेव्हाही बुद्धीचे महत्त्व अमान्य करणे दुरापास्त असल्यामुळेच ख्रिस्ती विचारवंतांनी धर्माचा गाभा असलेल्या श्रद्धा (Faith) प्रमाणाचा बुद्धीशी मेळ घालण्याचा कसोशीने प्रयत्न केला, हेदेखील विसरता कामा नये. पुढे प्रबोधनयुगात या दोन तत्त्वांचा संघर्ष होऊ लागला. त्यातून पाश्चात्त्य विज्ञानाचा विकास झाला. दरम्यान, श्रद्धेला, ग्रंथप्रामाण्याला बाजूला ठेवून विचार करणाऱ्या वैज्ञानिकांचा कसा छळ झाला याची नोंद इतिहासात झालेली आहे. धर्मश्रद्धा व तद्‌नुषंगिक ग्रंथप्रामाण्याला शह देण्यासाठी बुद्धिवादी विचारवंतांनी अनुभवाला (Experience) जवळ केले ते बुद्धीचा उपयोग करून श्रद्धांचेही समर्थन केले जाऊ शकते हे लक्षात आल्यामुळे. अर्थात, पुढे बुद्धिवाद (Rationalism) टोकाला जाऊन त्याचा अनुभववादाशीच (Empiricism) संघर्ष झाला हा भाग वेगळा. त्या चर्चेची येथे आवश्यकता नाही. येथे स्पष्ट करावयाचा मुद्दा हा आहे, की पाश्चात्त्य विचारविश्वातील बुद्धिवादाने एका बाजूला विज्ञानाला जन्म दिला, तर दुसऱ्या बाजूला बुद्धीचा प्रयोग समाजजीवनाच्या क्षेत्रातही करून सामाजिक, राजकीय व नैतिक संस्थांना व संकल्पनांनाही बुद्धीच्या पायावर उभे करायचा प्रयत्न केला. व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य असो की लोकशाही राज्यव्यवस्था असो, त्यांचा विकास बुद्धीच्या घुसळणीतूनच होऊ शकला. विज्ञान तर स्वभावतःच सार्वत्रिक किंवा वैश्विक (Universal) असतेच; परंतु आपल्या विचारांमधून पुढे आलेल्या सामाजिक, राजकीय संकल्पना व संस्थाही तशाच आहेत हा आत्मविश्वास पाश्चात्त्यांना आला (व तो अगदी अलीकडील काळात चीनने आव्हान देईपर्यंत अबाधित राहिला) तो काही उगाच नव्हे.

पाश्चात्त्य विचारविश्वाचा असा इतिहास ही काही एकविसाव्या शतकातील पश्चात्दृष्टी (Hindsight) नव्हे. त्याचा स्पष्ट उच्चार अठराव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेलेल्या निकोलस दि कोंदरसेट (Nicolas de Condorcet, १७४३-९४) याच्या अॅडव्हान्सेस ऑफ द ह्युमन माईंड (Advances of the Human Mind) या मूळ फ्रेंच रचनेतून ऐकायला मिळतो. कोंदरसेटने त्याच्या काळापर्यंतच्या विचारविश्वाचा (आणि अनुषंगाने कृतिविश्वाचाही) इतिहास सांगितला आहेच. शिवाय भविष्यातील शक्यतांचा विचार करीत काही कार्यक्रमही दिला आहे. खरे तर त्यामुळेच त्याची चर्चा या ठिकाणी विशेषतः हर्बर्ट सायमनच्या (Herbert Simon) संदर्भात करावीशी वाटते.

उच्च दर्जाचा गणितज्ञ असलेला कोंदरसेट तत्कालीन सामाजिक, राजकीय घडामोडींमध्येही अग्रेसरपणाने कृतिशील होता. त्याचा फ्रेंच राज्यक्रांतीतही वाटा होता. अर्थात, फ्रेंच राज्यक्रांतीचे तारू पुढे उत्साहाच्या व उताविळीच्या भरात भलतेच भरकटले तेव्हाही कोंदरसेटने आपले डोके शाबूत ठेवले होते. सोळाव्या लुईला मृत्युदंड देऊ नये, हे त्याचे मत क्रांतीच्या पुढाऱ्यांना रुचणे शक्यच नव्हते. त्यांनी सरळ त्याला उचलून तुरुंगात टाकले. तेथे तो पहिल्याच दिवशी मृत्यू पावला. त्याच्यावर विषप्रयोग झाला; तो कोणी दुसऱ्याने केला, की त्याचा त्यानेच याविषयी चर्चा होतच राहिली. क्रांती आपलीच पिले खात असते ही समजूत यथार्थ असल्याचा हा पुरावाच नव्हे काय?

कोंदरसेटला ‘एनलायटनमेंट’ (Enlightenment) युगाचा शेवटचा शिलेदार मानण्यात येते. हे युग म्हणजे पाश्चात्त्य बुद्धिवादाची चरमसीमा असून जर्मन तत्त्ववेत्ता इमॅन्युअल कांटला (Immanuel Kant) त्याचा शिरोमणी मानण्यात येते. हे युग प्रबुद्धांचे किंवा प्रबोधनयुग मानण्यात येते. मराठी लेखकांनी त्याअगोदरच्या ‘रेनेसाँ’ (Renaissance) या शब्दासाठी ‘प्रबोधन’ शब्दाचा वापर करून मोठाच घोळ करून ठेवला आहे. ‘रेनेसाँ’ या (फ्रेंच) शब्दाचा अर्थ संजीवन, पुनरुज्जीवन, पुनर्जन्म असा होतो. या काळात विशेषतः ग्रीक भाषेतील ग्रंथांची भाषांतरे होऊन तो वारसा जणू पुनरुज्जीवित करण्यात आला. (त्याचे कारण अरबांची मध्यस्थी. ग्रीक ज्ञानावर पोसलेल्या अरबांनी सुरुवातीला ग्रीक भाषेतील ग्रंथांची भाषांतरे करून युरोपला मागे टाकले होते. नंतर त्यांच्यातील धर्मवेडाने उचल खाल्ल्याने ते मागे पडले. इकडे युरोपियनांनी अरबीमधील भाषांतरांच्यामार्गे ग्रीक वारसा गाठला व त्याचा उपयोग करीत विज्ञानाचा विकास केला. पुढे हाच वारसा, विशेषतः ॲरिस्टॉटल, या विकासाच्या आड येतो आहे हे लक्षात आल्यावर तोही दूर केला. पण या मुद्द्याची विस्तृत चर्चा येथे नको.) तशा प्रकारचा काही आधार ‘एनलायटनमेंट’वाल्यांना नव्हता. ते खरे प्रबोधन! स्वतंत्र विचारांवर आधारित. अर्थात, तरीही मूळ पाया ग्रीकांचाच!

ते असो, पण अठराव्या शतकापर्यंतच्या पाश्चात्त्य बौद्धिक व कार्मिक विश्वाचा वेध घेत कोंदरसेट विचारतो, “Aren’t all nations bound someday to approach the state of civilization reached by the peoples, who are most enlightened, most freest, most clear of prejudices, e.g. the French and the Anglo-Americans?”

एखाद्याला हा प्रश्न पाश्चात्त्य शहाजोगपणाचा (Chauvinism) आविष्कार वाटेल. पौर्वात्यवादाचा (Orientalism) एक प्रकार वाटेल. तसे वाटणे स्वाभाविक मानण्यासाठीचे पुरावेही कोंदरसेटच्या या पुस्तकात आहेत. मानवाची आजवर वैचारिक आणि भौतिक प्रगती कोणामुळे शक्य झाली या संदर्भात तो लिहितो, “So ultimately he owes it to the victory of the Greeks over the Persians in the battle of Salamis, without which the darkness of oriental despotism threatened to cover the whole of earth.”

आणि ग्रीक परंपरेतील कोणा एकाचे नाव घ्यायचे झाल्यास, “the sailor who is saved from the shipwreck by the accurate observation of longitude owes his life to a theory that descends through a chain of truths, from discoveries made in the school of Plato and buried for twenty centuries in total disuse.”

हे नाव ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटोचे आहे आणि विकासाचे श्रेय गणित या ज्ञानशाखेचे!

निकोलस दि कोंदरसेट
ॲलेक्सिस द टॉकविली
सूर्यमालेच्या शोधातील दोन नावे अशी आहेत ज्यांनी इतर शास्त्रज्ञांसारखे शोध लावले नाहीत.

कोंदरसेटचा हा शहाजोगपणा आणि युरोअमेरिकी अहंकार अक्षम्य ठरला असता, कधी? जर त्याने या देशांच्या साम्राज्यवादाचे समर्थन केले असते तर. प्रसिद्ध इंग्रजी लेखक कवी रुडयार्ड किपलिंगसारखा ‘White man's burden’ सिद्धांत मांडून वसाहतवादावर पांघरूण घातले असते तर! परंतु कोंदरसेट तसे करीत नाही. त्याची दृष्टी अखिल मानवजात हीच एक ‘युनिट’ मानणारी आहे. ज्या देशांमध्ये पाश्चात्त्यांसारखा विकास होऊ शकला नाही त्यांना शहाणे करून आपल्याबरोबर आणणे हे तो पाश्चात्त्य देशांचे कर्तव्यच समजतो आणि त्यांची ही जबाबदारी निरपेक्ष असल्याचेही त्याचे सांगणे आहे. त्यासाठी या देशांनी आफ्रिका वा आशियाकडून कसलीही अपेक्षा करायचे कारण नाही. त्यांच्यावर सत्ता गाजवण्याचे तर नाहीच नाही. असा हा कोंदरसेटचा निष्काम कर्मयोग आहे. तो वसाहतवादी व साम्राज्यवादी पाश्चात्त्य सत्तांनी चालविलेल्या या शोषणाच्या विरोधातच आहे. स्वातंत्र्य, न्याय, समता ही मूल्ये युरोप-अमेरिकेपुरती मर्यादित ठेवता कामा नयेत. राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये व एकेका राष्ट्रातील व्यक्ती-व्यक्तींमध्ये समता असली पाहिजे, असा त्याचा आग्रह आहे आणि याचे अधिष्ठान आहे ते अर्थातच बुद्धिवाद!

ख्रिस्ती मिशनऱ्यांवरही त्याचा आक्षेप आहेच. हे मिशनरी इतर देशांत जाऊन तेथील गरजू लोकांना वैद्यकीय वा शैक्षणिक सेवा देतात हे नाकारायचे कारण नाही; पण त्यामागचा त्यांचा अंतःस्थ हेतू धर्मांतराचा असतो हे सत्य लपून राहिले नाही. त्या स्थानिक लोकांमधील त्यांच्या धर्मांतून आलेल्या अंधश्रद्धा दूर करायला हव्यात; पण त्यांची जागा नव्या धर्मामधील अंधश्रद्धा घेणार असतील तर ते कोंदरसेटला नको आहे. कोणी आगीतून निघत असेल तर ते चांगलेच आहे; पण फुफाट्यात पडणे मात्र योग्य नव्हे!

मग अशा मागास लोकांना उचित असा मार्ग कोण दाखवणार? त्यांना पाश्चात्त्य बुद्धिवादातून निष्पन्न झालेल्या संकल्पना, मूल्ये, संस्था आणि सोयी-सुविधांपर्यंत कोण पोहोचवणार? कोंदरसेट ही जबाबदारी नव्या बुद्धिवादी ‘मिशनरी’सदृश वर्गाकडे सोपवतो. या मंडळींनी युरोपातील ‘the principles and the example of Europe’s liberty, enlightenment and reason’ आफ्रिका व आशिया खंडांमधील लोकांपर्यंत न्यावीत.

असे करता आले तर या मागासलेल्या वसाहतींमधील लोकांची प्रगती युरोपातील लोकांपेक्षा वेगाने होईल आणि ती स्थिर असेल, हे कोंदरसेट जाणतो. ज्या टप्प्यापर्यंत येण्यासाठी पाश्चात्त्य राष्ट्रांना कित्येक शतके अथक प्रयत्न करावा लागला, अंतर्गत संघर्षाला तोंड द्यावे लागले तेथपर्यंत वसाहतीमधील लोकांना अलगदपणे पोहोचवल्यावर यात अशक्य ते काय आहे? कोंदरसेटला खात्री आहे, “The time will come when the Sun shines only on men who are free and acknowledge no master except their reason.”

आधुनिक बुद्धिवादी व सुधारलेल्या राष्ट्रांमध्ये कोंदरसेटने फ्रान्स, इंग्लंड आणि (उत्तर) अमेरिका यांचा उल्लेख केला आहे. त्याने हे पुस्तक लिहायला घेतले तेव्हा अमेरिका आणि फ्रान्स या देशांमध्ये क्रांती होऊन गेल्या होत्या. त्याचा इंग्लंडच्या वणिकवृत्तीवर कटाक्ष आहेच. परंतु इंग्लंड वसाहतींना ज्या प्रकारे वागवत आहे ते त्याला चुकीचे वाटत होते. अमेरिकेने युद्धाच्या मार्गाने इंग्लंडला नमवून स्वातंत्र्य मिळवले याचे त्याला कौतुक आहे. तो लिहितो, “The British Government acted as though it thought that God has created America, like Asia for the pleasure of the inhabitants of London and wanted to keep a long-distance grip on a subject nation.”

निकोलस दि कोंदरसेट
ॲलेक्सिस द टॉकविली
Human Evolution: मानवाचे पूर्वज 'या' खंडातील..?

इंग्लंड आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाकडे कोंदरसेट दोन ‘एनलायटन्ड’ राष्ट्रांमधील संघर्ष म्हणून पाहतो. एक राष्ट्र – अमेरिका, एकूणच मानवजातीच्या नैसर्गिक हक्कांचा संरक्षक व दुसरे इंग्लंड ‘rights are subjects to edicts, political interests and written conventions’चे समर्थक!

प्लेटो आणि डेकार्ट यांच्या बुद्धिवादी परंपरेचा वारसा कोंदरसेटला एका बाजूने विज्ञान व विज्ञानाच्या साह्याने मानवजातीचे जगणे सुसह्य करण्याकडे नेतो, तर दुसऱ्या बाजूने या मानवजातीचे नियंत्रण नियमन करणाऱ्या सामाजिक, राजकीय व नैतिक मूल्यांकडे व संस्थांच्या रचनेकडे घेऊन जातो.

अमेरिकेतील कोंदरसेटच्या विचारसरणीच्या मंडळींचीही अशीच धारणा होती. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे टॉमस पेन. पेनचे द एज ऑफ रिझन (The Age of Reason) आणि राईट्स ऑफ मॅन (Rights of Man) हे ग्रंथ जगभरातील स्वातंत्र्यवाद्यांचे व गुलामगिरीच्या विरोधकांचे प्रेरणास्थान बनले होते. आपल्याकडील उत्तम उदाहरण म्हणजेच अर्थातच महात्मा जोतिराव फुले. त्यांनी आणि त्यांचे सहकारी मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी पेनच्या पुस्तकांची अक्षरशः पारायणे केली होती.

पण मुख्य मुद्दा आहे तो बुद्धी आणि बुद्धिवाद यांचा. युरोप आणि अर्थातच अगदी अलीकडील अमेरिकेतील घडामोडींची ऐतिहासिक संगती लावताना कोंदरसेटने तो एक ‘रॅशनल जर्नी’ (Rational Journey) असल्याचे सांगितले होते. पारंपरिक धर्मसमजुती, पूर्वग्रह, सत्ताकांक्षा हे प्रकार मुळातच बुद्धिवादाशी विसंगत असल्याचा त्याचा दावा असून; न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव हे सुसंगत होत, असेही तो मानतो. म्हणजेच एकीकडचा गणिती-वैज्ञानिक प्रवास व दुसरीकडील सामाजिक, राजकीय, नैतिक प्रगती या एकाच प्रक्रियेच्या दोन बाजू आहेत. या प्रक्रियेत इंग्लंड मागे पडत असून, फ्रान्स व अमेरिका पुढे आहेत हा त्याचा यापुढील दावा. स्वतः जोतिराव इंग्लंडमधील लोकसत्ता शुद्ध नसून हीणकस, भेसळयुक्त असल्याचे सांगतात याची येथे आठवण करून देतो. नंतरच्या काळात १८३५-४०च्या दरम्यान फ्रेंच प्रवासी ॲलेक्सिस द टॉकविली (Alexis Henri C M Clerel Tocqueville -१८०५-५९) याने अमेरिकेला भेट देऊन अमेरिकेच्या लोकशाहीवर एक पुस्तक लिहिले. (इंग्रजी भाषांतर Democracy in America) अमेरिकेने इंग्लंडसारख्या युरोपियन देशांनाच काय पण खुद्द फ्रान्सलाही धडा घालून दिला असल्याचे तो सांगतो.

१९८७-८८ दरम्यान अमेरिकी राज्यघटनेला दोनशे वर्षे पूर्ण झाली. अमेरिका हे काही संस्थानांचे संघराज्य होते. ही राज्यघटना सर्व घटक संस्थानांनी स्वीकारावी, तसा करार (Ratification) करावा हा राजकीय प्रक्रियेचा भाग झाला. न्यू यॉर्क राज्याने ही घटना कशी स्वीकारली, त्या वेळी कोणत्या प्रकारची चर्चा झाली याची एक डॉक्युड्रामावजा टेलिव्हिजन मालिका या द्विशताब्दीच्या प्रसंगी निर्माण करण्यात आली. तिचे नाव अॅन एम्पायर ऑफ रिझन (An Empire of Reason). या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे त्या काळात टेलिव्हिजन माध्यम असते तर ही घटना प्रक्रिया कशा प्रकारे सादर केली गेली असती, अशा कल्पनेतून ती निर्माण करण्यात आली. संविधान स्वीकृतीची प्रक्रिया चर्चेतून साकार झाली व ती अर्थातच Rational म्हणजे तर्कनिष्ठ होती या गृहितावरच मालिकेचे नामकरण करण्यात आले असणार हे उघड आहे.

कोंदोरसेटला ही मालिका पाहायला नक्कीच आवडले असते!

या बुद्धीसाम्राज्याला शह देणारे नवे मॉडेल सिद्ध करायच्या प्रयत्नातील देश म्हणजे चीन!

-----------

निकोलस दि कोंदरसेट
ॲलेक्सिस द टॉकविली
Sant Dnyaneshwar :भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण संत ज्ञानेश्वर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com