वाचनाचा आग्रह धरतो, त्यावेळी ‘काय वाचावे’ हे सांगण्याची जबाबदारी आपलीच

आयुष्य उजळवणाऱ्या ‘वाचनवाटा’
books to read
books to readesakal

इंग्रजीमध्ये ‘बुक्स ऑन बुक्स’ प्रकारच्या पुस्तकांचे आणि आस्वादक समीक्षेचे दालन समृद्ध आहे. मराठीमध्ये त्या तुलनेत अशी फारच कमी पुस्तके आहेत. म्हणूनच नुकतेच आलेले वाचनवाटा हे आदिनाथ चव्हाण लिखित पुस्तक अत्यंत मोलाचे ठरते.

सतीश कुलकर्णी

कोणत्याही वाचनालयामध्ये गेलो, तर आपल्याला पुस्तकांची कपाटे भरलेली दिसतात. त्यातून काय वाचायचे, असा प्रश्न बहुतेकांना पडतो. अर्थात, प्रत्येक वाचकाची सुरुवात नेहमी त्याला आवडणाऱ्या विषयापासून, प्रकारातून होते.

प्रथम उत्सुकता वाढवणारे, कुतूहल शमवणारे, मनाचे रंजन करणारे असे साहित्याचे प्रकार आवडतात. पाठ्यपुस्तकातून काही लेखक व कवी, त्यांचे साहित्य, लेख, कविता आपल्या भेटीला आलेल्या असतात.

तो धडा, कविता आवडल्यावर त्याच लेखकांची काही पुस्तके आपल्याला वाचनालयात खुणावतात. ती घरी आणून वाचल्यानंतर आपल्या आनंदात भर पडत जाते. या आनंदाच्या भरामध्ये अशीही काही पुस्तके वाचली जातात, जी आपल्याला फारशी भावत नाहीत.

अर्थात, ती वाचल्याशिवाय चांगले काय, वाईट काय याचा आपल्याला स्वतःलाच अंदाज येत नाही.

जगभरच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये स्वतःचे अभिजात असे वाङ्‍मय आहे. त्यापर्यंत आपण पोहोचले पाहिजे. ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण खरेतर अशाच अभिजात पुस्तकांच्या वाचनाविषयी असावी, असे मला नेहमी वाटत आले आहे.

आपण जेव्हा एखाद्याला वाचनाचा आग्रह धरतो, त्यावेळी आपल्यावर नकळत ‘काय वाचावे’ हे सांगण्याची एक जबाबदारी येऊन पडते.

ही जबाबदारी पार पाडणाऱ्या काही साक्षेपी व्यक्ती आणि पुस्तके असतात. इंग्रजीमध्ये तर ‘बुक्स ऑन बुक्स’ प्रकारच्या पुस्तकांचे आणि आस्वादक समीक्षेचे दालन समृद्ध आहे. मराठीमध्ये त्या तुलनेत अशी फारच कमी पुस्तके आहेत. म्हणूनच नुकतेच आलेले वाचनवाटा हे आदिनाथ चव्हाण लिखित पुस्तक अत्यंत मोलाचे ठरते.

books to read
Randeep Hooda Wedding: "महाभारतात जसं अर्जुनाने मणिपूरची.." लग्नाची घोषणा करत रणदीप-लिननं शेयर केली पोस्ट

स्वतः उत्तम वाचक, संपादक असलेल्या आदिनाथ चव्हाण यांनी अॅग्रोवनमध्ये मला भावलेलं पुस्तक या मालिकेअंतर्गत वर्षभर जगभरातील अभिजात वाङ्‍मय अत्यंत सोप्या भाषेमध्ये वाचकांसमोर खुले केले.

या रसग्रहणाचेच पुस्तकरूप म्हणजे वाचनवाटा हे पुस्तक. यामध्ये त्यांनी निवडलेली ३८ पुस्तके जगातील विविध भाषांतील आहेत आणि त्यातील बहुतांश सर्व पुस्तकांचे मराठी अनुवाद उपलब्ध आहेत. म्हणजेच भाषेच्या कोणत्याही अडथळ्याविना ही पुस्तके आपल्याला वाचनासाठी नक्कीच उपलब्ध आहेत.

त्याची विभागणी पाच भागांमध्ये केली आहे. प्रत्येक विभागाला गाण्याच्या स्वरूपातील शीर्षक दिलेले आहे. उदा. प्रेमाची विविध रूपं (दो लफ्जों की है दिल की कहानी...), जीवनाचे विविध रंग (जिंदगी इक सफर है सुहाना), युद्धखोरांमुळे मानवतेचं झालेलं नुकसान (कभी किसी को मुक्कमल जहाँ नहीं मिलता), माणूसपण आणि मानसशास्त्राविषयी (तोरा मन दर्पण कहलाए), निसर्ग आणि स्वतःच्या आत्म्याचा शोध (निसर्गराजा ऐक सांगतो!)...

अभिजात पुस्तके म्हणजे काही तरी फार अवजड, अवघड असा आपल्या कुणाचाही समज असू शकतो. पण या पुस्तकातील साध्या, सोप्या आणि त्याच वेळी मनाला भिडणाऱ्या भाषाशैलीच्या रसास्वादामुळे तो नक्कीच खोडला जातो. कधी कविता, गाण्याच्या ओळी, शेर आणि खरेतर विविध संदर्भांच्या साह्याने आपल्याला या मूळ पुस्तकांकडे खेचून नेण्याचे काम लेखक करतात.

यातील अनेक कादंबऱ्यांवर निघालेले चित्रपट व त्याची वैशिष्ट्येही ते जाता जाता सांगत जातात. हे तर आजच्या डिजिटल आणि स्क्रिनमध्ये बुडालेल्या तरुणाईला पुस्तकाकडे आकर्षित करणारे ठरते.

books to read
Importance Of Reading: काय आहेत पुस्तक वाचण्याचे फायदे?

वाचनवाटा पुस्तकामध्ये लिओ टॉलस्टॉय (अॅना कॅरेनिना), हेन्री डेव्हिड थोरो (वॉल्डन), खलिल जिब्रान (द प्रॉफेट आणि द गार्डन ऑफ प्रॉफेट), ऑस्कर वाइल्ड (द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे), अर्नेस्ट हेमिंग्वे (द ओल्ड मॅन ॲण्ड द सी), जॉर्ज ऑरवेल (अॅनिमल फार्म आणि 1984), बर्ट्रांड रसेल (द कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपीनेस), गॅब्रिअल गार्सिया मार्केझ (लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा), सिग्मंड फ्रॉइड (इंटरप्रिटेशन ऑफ ड्रिम्स), सिमोन द बोव्हुआर (सेकंड सेक्स), लुईसा मे अल्कॉट (लिटल वूमेन), मॅक्झिम गॉर्की (मदर) अशा एकापेक्षा एक दिग्गजांची पुस्तके आपल्या भेटीला येतात. खरेतर यातील एकेकाच्या विचाराने, साहित्याच्या लखलखाटाने गेल्या अनेक पिढ्यांना भारून टाकलेले आहे.

पर्ल बक (द गुड अर्थ), जॉन स्टाईनबेक (द ग्रेप्स ऑफ रॉथ), पीअर्स पॉल रीड (अलाइव्ह), कॅथरिन ओवेन्स पिअर (द हेलन केलर स्टोरी), अर्नेस्टो चे गव्हेरा (द मोटरसायकल डायरीज), आल्बेर काम्यू (द स्ट्रेंजर) या कादंबऱ्या आपल्या जगण्याचे भान वाढवू शकतात.

यातील प्रत्येकामध्ये एक वेगळे विश्व आहे. अशी आपले विचारविश्व समृद्ध करणारी एकापेक्षा एक पुस्तके आपल्या भेटीला येतात. त्यातील एखादे जरी आपल्या हातात आले की ते मनात कायमचे राहील, यात शंका नाही.

अर्थातच, यातील बहुतांश पुस्तके परदेशी असली तरी त्यातील भावना, माणूसपण आणि एकूणच जगणे यांची नाळ कुठेतरी आपल्याशी जुळली असल्याचे आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही, हे या पुस्तकाचे सामर्थ्य मानावे लागेल.

ही मूळ पुस्तके मिळवून वाचण्याची ओढ खऱ्या वाचकांना लागल्याशिवाय राहणार नाही. यात उल्लेखलेले चित्रपटही आंतरजालात शोधून पाहिल्याशिवाय राहवणार नाही.

कोणत्याही माध्यमातून असो, पण मूळ पुस्तकाच्या आशय, विषयामध्ये डुंबून आल्याशिवाय चैन पडत नाही, हेच खरे तर या लेखांचे, पुस्तकाचे यश म्हणावे लागेल.

books to read
Reading Strategies & Tips: टिप्स - वाचन अनिवार्यच..!

आपल्यासमोर दीर्घ पसरलेले तारांगण असले तरी त्यातील नेमक्या नक्षत्रांचा शोध घेण्यासाठी जसा त्यातील तज्ज्ञ वाटाड्या सोबत असावा लागतो, तसेच पुस्तकांच्या बाबतीत आहे.

पुस्तकांच्या जगामध्ये फेरफटका मारताना उत्तम वाटाड्या म्हणून हे पुस्तक काम करू शकते, यात शंका नाही. कारण या पुस्तकाची अर्पणपत्रिका सांगते, त्याप्रमाणे -

एक चांगला वाचक मरण्यापूर्वी हजारो आयुष्यं जगतो!

वाचलेल्या हजारो पुस्तकांना, जगलेल्या हजारो आयुष्यांना!

चला, आपणही हजारो आयुष्ये एकाच आयुष्यात जगण्याच्या मार्गाने निघू या...

वाचनवाटा

लेखक : आदिनाथ चव्हाण

प्रकाशन : सकाळ प्रकाशन, पुणे

किंमत : ₹ ३९९/-

पाने ः २७०

निकोला टेस्ला

लेखक ः सुधीर फाकटकर

किंमत ः ₹ २७०

पाने ः १८६

शब्द सूर जपून ठेव...

लेखक ः नेहा लिमये

किंमत ः ₹ ३००

पाने ः २००

रक्तफुलांचे ताटवे

लेखक ः नोमेश नारायण

किंमत ः ₹ १८०

पाने ः ९१

कथा एका मंदिराची

संपादक व लेखक ः

मंगेश बबनराव चव्हाण

प्रकाशक ः श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट, पुणे

किंमत ः ₹ १००

पाने ः ६०

books to read
Reading Benefits : वाचनाची सवय तुमचे मानसिक आरोग्य आणि आयुर्मान देखील वाढवते, जाणून घ्या ‘हे’ फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com