स्नेहल बाकरे
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. ही विविधता इथल्या पादत्राणांमध्येही दिसून येते. इथल्या काही राज्यांमध्ये खास प्रकारच्या चपला, बूट तयार करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ती पद्धत त्या त्या प्रदेशाच्या हवामानाशी, संस्कृतीशी आणि जीवनशैलीची जोडलेली आहे. काही पादत्राणांचे प्रकार फक्त त्या विशिष्ट भागांतच तयार होतात, मात्र ते आता जगभरात खूप प्रसिद्ध आहेत.
पदस्त्राण/ पादत्राणे किंवा पायताण म्हणजे एक प्रकारचे पायात घालण्याचे वस्त्र. पण केवळ पायांचे संरक्षण करणे किंवा चालणे, धावणे यांसारख्या क्रिया अधिक सुलभ करणे एवढेच याचे महत्त्व नाही बरं का! पायताण सौंदर्याचे आणि विविध संस्कृतीचे प्रतीकदेखील आहे. वेगवेगळ्या देशांत याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
इंग्रजीत याला शूज (Shoes), हिंदीत ‘जुता’, संस्कृतमध्ये ‘खडावा’ किंवा ‘पादुका’ (व्यास ऋषींनी लिहिलेल्या व्यासभाष्यमध्ये याचा उल्लेख पदस्त्राण असाही केला आहे.), फ्रेंचमध्ये ‘चॉस्युर’ (Chaussure), स्पॅनिशमध्ये ‘जापातो’ (Zapatos), जर्मनमध्ये ‘शु’ (Schuh), रशियनमध्ये ‘ओबुव’ (Oòybb), जपानीमध्ये ‘कुत्सु’ (Kutsu), कोरियनमध्ये ‘नमस्किन’ (Namaksin), मँडरीनमध्ये ‘शुई’ (Xie), अरबीमध्ये ‘हिधा’ (Hidha) असं म्हणतात.