पाच-सहा लोकांसमोर प्रेझेंटेशन द्यायलासुद्धा तुम्ही घाबरता का? जाणून घ्या, 'सोशल फोबिया' बाबत डॉक्टर काय सांगतात

आपले हसे होईल किंवा अपमान होईल, अशी चिंता तुम्हालाही सतावते का?
 social phobia
social phobiaEsakal

डॉ. अविनाश भोंडवे

सामाजिक चिंता विकार हा एक दीर्घकालीन मानसिक विकार आहे. मनोविकारचिकित्सा, औषधे, त्यात उद्‍भवणाऱ्या प्रसंगांशी दोन हात करण्याची कौशल्ये शिकली, आत्मविश्वास वाढवला आणि इतरांशी संवाद साधण्याची क्षमता सुधारली तर या आजारावर मत करता येते.

सभेमध्ये व्यासपीठावर जाऊन लोकांसमोर भाषण करायला सभाधारिष्ट्य लागते. नेते मंडळींसाठी तर तो एक आवश्यक गुणच असतो. पण सर्वसामान्यांमध्ये अनेकांची जनसमुदायासमोर भाषण करताना पाचावर धारण बसते.

काही धडपड्या व्यक्ती अशा सार्वजनिक प्रसंगांना वरचेवर तोंड देऊन भाषणे ठोकण्यात पारंगत होतातही, मात्र समाजामध्ये असेही अनेकजण असतात, की ज्यांची पाच-सहा लोकांसमोर प्रेझेंटेशन देतानासुद्धा गाळण उडते.

याउलट काही जणांना तर भाषण सोडाच, पण नोकरीसाठी एखाद्या इंटरव्ह्यूला जायचे, किंवा काही कामासाठी एखाद्या अनोळखी माणसाला भेटायचे म्हटले तरी ते कमालीचे चिंताग्रस्त होतात. याला सामाजिक भयगंड किंवा सामाजिक चिंताविकार आणि वैद्यकीय परिभाषेत सोशल अँग्झायटी सिंड्रोम अथवा सोशल फोबिया म्हणतात.

या विकारात, दररोजच्या परस्परसंवादामधूनही काही व्यक्तींमध्ये लक्षणीय चिंता, आत्म-जागरूकता आणि पेचप्रसंग निर्माण होतात; कारण त्यांना आपली कोणतीही कृती समोरच्या व्यक्तींकडून बारकाईने तपासली जाण्याची किंवा आपल्याबाबत इतर लोक नकारात्मक निर्णय घेतील अशी मनोमन भीती वाटते.

सामाजिक चिंता विकार हा एक दीर्घकालीन मानसिक विकार आहे. मनोविकारचिकित्सा, औषधे, त्यात उद्‍भवणाऱ्या प्रसंगांशी दोन हात करण्याची कौशल्ये शिकली, आत्मविश्वास वाढवला आणि इतरांशी संवाद साधण्याची क्षमता सुधारली तर या आजारावर मत करता येते.

लक्षणे

लहान मुलामुलींत किंवा तरुण मुलींमध्ये अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना लाजणे, बुजणे किंवा अस्वस्थ होणे ही लक्षणे अनेकदा दिसतात. पण अशा परिस्थितीमध्ये लाजाळूपणा किंवा अस्वस्थता ही सामाजिक चिंता विकाराची चिन्हे नसतात.

काही मुले मुळातच बुजरी असतात, तर काही पूर्णपणे धटिंगण असतात. छोट्या मुलांमुलींचा आणि पौगंडावस्थेतील युवक-युवतीचा हा बुजरेपणा, नंतरच्या आयुष्यातील अनुभवांनी, प्रयत्नांनी आणि काही वेळेस प्रशिक्षणाने बहुसंख्य वेळा बदललेला आढळतो.

पण सामाजिक चिंता विकारामध्ये थोडी वेगळी परिस्थिती असते. या व्यक्तींना ओळखीच्या व्यक्तींशीसुद्धा संपर्क करताना भीती आणि चिंता वाटते, त्यामुळे ते अशा प्रसंगांबाबत सदोदित टाळाटाळ करतात.

त्याचा परिणाम त्यांचे नातेसंबंध, दिनचर्या, काम, शाळा आदींवर होऊ लागतो किंवा अन्य कामांमध्ये व्यत्यय येऊ लागतो. सामाजिक चिंता विकाराची सुरुवात लहानपणी किंवा किशोरवयात होते. क्वचितप्रसंगी तो प्रौढत्वातही सुरू होताना आढळतो.

भावनिक आणि वर्तनात्मक लक्षणे

सामाजिक चिंता विकारामध्ये बहुसंख्य व्यक्तींत खालील चिन्हे आणि लक्षणे निश्चितपणे आढळतात-

  • इतर व्यक्तींना सामोरे जाण्याची भीती आणि इतरांना भेटण्याबाबत सतत नकारात्मक निर्णय

  • इतरांना भेटल्यावर आपले हसे होईल किंवा अपमान होईल, अशी चिंता

  • अनोळखी लोकांशी संवाद साधण्याची किंवा त्यांच्याशी बोलण्याची तीव्र भीती

  • आपण चिंताग्रस्त दिसत आहोत, हे इतरांच्या लक्षात येईल याची भीती

  • इतरांना भेटल्यावर लाजणे, घाम येणे, थरथर कापणे किंवा आवाज कापणे अशी लक्षणे आणि इतरांना भेटल्यावर ती लक्षणे निर्माण होतील याची भीती

  • लज्जेने, भीतीने काही महत्त्वाच्या गोष्टी न करणे किंवा लोकांशी बोलणे टाळणे

  • एखाद्या प्रसंगामध्ये अशी व्यक्ती केंद्रस्थानी असल्यास त्या प्रसंगापासून दूर राहणे

  • नजीकच्या भविष्यात असा प्रसंग उद्‍भवण्याआधीच केवळ विचारांनी भयकंपित किंवा चिंताग्रस्त होणे

  • सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबाबत तीव्र भीती किंवा चिंता

  • आपल्या कामगिरीचे आपणच विश्लेषण करत राहणे आणि अशा सामाजिक परिस्थितीनंतर स्वतःमधील परस्परसंवादातील त्रुटी आठवत बसणे

  • सामाजिक कार्यक्रमांमध्ये यापूर्वी आलेल्या नकारात्मक अनुभवामुळे, त्या पुढील सर्व कार्यक्रमात तसेच वाईट परिणाम घडू शकतील, अशी खात्री बाळगणे

  • लहान मुलांसाठी, प्रौढांशी किंवा समवयस्कांशी संवाद साधताना तीव्र चिंता वाटणे; अशा प्रसंगात रडणे, प्रसंगांपूर्वी किंवा प्रसंगांदरम्यान राग येणे, पालकांना चिकटून राहणे किंवा सामाजिक परिस्थितीत बोलणे आवश्यक असतानादेखील बोलण्यास नकार

  • सामाजिक चिंता विकार असलेल्या बऱ्याच व्यक्ती सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना किंवा काही सादर करताना तीव्र भीती आणि चिंता अनुभवतात, पण इतर प्रकारच्या घरगुती प्रसंगात त्यांना तशा प्रकारची भीती अथवा चिंता जाणवत नाही.

शारीरिक लक्षणे

सामाजिक चिंता विकार असणाऱ्या व्यक्तींमध्ये कधीकधी खालील शारीरिक चिन्हे आणि लक्षणे आढळतात-

  • चेहरा लाजेने आरक्त होणे

  • हृदयाचे ठोके जलद पडणे

  • अंगाचा थरकाप होणे

  • घाम फुटणे

  • पोट दुखणे किंवा मळमळणे

  • श्वास घ्यायला त्रास होणे

  • चक्कर येणे किंवा एकदम डोके हलके होणे

  • अचानक सर्व ‘ब्लँक’ झाल्यासारखे वाटणे

  • स्नायू ताठरणे

  • एखादी अगदी किरकोळ भेटगाठही टाळणे

  • जेव्हा एखाद्याला सामाजिक चिंता विकार असतो तेव्हा काही साधे, सर्वसामान्य दैनंदिन प्रसंगही सहन करणे त्यांना कठीण वाटू लागते. उदाहरणार्थ,

  • अपरिचित लोक किंवा अनोळखी लोकांशी संवाद साधणे

  • पार्ट्या किंवा सामाजिक मेळाव्यात सहभागी होणे

  • कामाला जाणे, शाळेत जाणे

  • एखाद्याशी काही साध्या कारणासाठी बोलावे लागणे

  • इतरांच्या डोळ्याला डोळा भिडवणे

  • मित्र-मैत्रिणींसोबत सहज बाहेर जाणे

  • एखाद्या खोलीत, जिथे काही लोक आधीच बसलेले आहेत, तिथे प्रवेश करणे

  • दुकानामध्ये जाऊन काही खरेदी करणे किंवा एखादी वस्तू परत करणे

  • इतरांसमोर खाणे

  • सार्वजनिक शौचालय वापरणे

सामाजिक चिंता विकारांची लक्षणे कालांतराने बदलू शकतात, पण जीवनात घडणारे नकोसे बदल, तणाव, इतरांच्या अपेक्षा किंवा मागण्या पूर्ण करणे अशा परिस्थितींना सतत सामोरे जावे लागत असेल तर लक्षणे विकोपालाही जाऊ शकतात.

चिंता निर्माण करणाऱ्या परिस्थिती टाळल्याने त्यांना अल्पकाळ बरे वाटू शकते, परंतु त्यानंतर उपचार न मिळाल्यास त्या चिंता दीर्घकाळ घर करून बसण्याची शक्यता जास्त असते.

कारणमीमांसा

इतर अनेक मानसिक विकारांप्रमाणे, सामाजिक चिंता विकारदेखील जैविक आणि पर्यावरणीय घटकांच्या जटिल परस्परसंवादातून उद्‍भवतात. याच्या संभाव्य कारणांमध्ये खालील गोष्टी समाविष्ट असतात-

आनुवंशिकता : चिंता विकाराला बहुतेकदा कौटुंबिक इतिहास असल्याचे आढळते. मात्र यात आनुवंशिकता आणि परिस्थितीजन्य घटना या दोन्हीचा समावेश असतो.

मेंदूची रचना : मेंदूतील अमिग्डाला हा भाग वाटणाऱ्या भीतीची प्रतिक्रिया नियंत्रित करण्याची भूमिका बजावत असतो.ज्या व्यक्तींमध्ये ॲमिग्डाला अतिक्रियाशील असतो, त्यांच्यामध्ये भीतीची प्रतिक्रिया वाढलेली आढळते. त्यामुळे सामाजिक परिस्थितींमध्ये चिंता वाढते.

पर्यावरण : सामाजिक चिंता विकार हे बाह्य गोष्टीतून अंगवळणी पडलेले (अॅक्वायर्ड) वर्तन असते. काही व्यक्तींमध्ये अप्रिय किंवा लाजिरवाण्या सामाजिक घटनेनंतर लक्षणीय चिंता निर्माण होते.

सामाजिक चिंता विकार असलेल्या पाल्यांचे पालक त्यांच्या स्वतःच्या अशा सामाजिक घटनांमध्ये चिंतांचा कसा सामना करतात यावर ती मुले, तशाच परिस्थितीमध्ये कशी वागतील हे अवलंबून असते.

मुलांना वाटणाऱ्या चिंतांचे नियंत्रण काही पालक स्वतः करतात आणि मुलांचे मर्यादेपेक्षा जास्त संरक्षण करतात, अशी मुले पुढील आयुष्यात तशा प्रकारच्या प्रसंगांना स्वतंत्रपणे तोंड देण्यात असमर्थ ठरतात, परिणामी त्या मुलांमध्ये चिंता विकार निर्माण होण्यात होते.

जोखमीचे घटक

जीवनातल्या अनेक घटकांमधून, अनेक सामाजिक प्रसंगातून सामाजिक चिंता विकार विकसित होण्याचा धोका वाढत असतो, यामध्ये-

कौटुंबिक इतिहास : जैविक पालकांमध्ये किंवा भावंडांमध्ये ही स्थिती असेल, तर त्यांच्या संततीमध्ये, भावंडांमध्ये सामाजिक चिंता विकार होण्याची अधिक शक्यता असते.

नकारात्मक अनुभव : छेडछाड, गुंडगिरी, नकार, उपहास, अपमान असे अनुभव घेतलेल्या मुलांना सामाजिक चिंता विकार होण्याची अधिक शक्यता असते. याशिवाय कौटुंबिक संघर्ष, आघात किंवा अत्याचार अशा जीवनातील इतर नकारात्मक घटना, हा विकार उद्‌भण्यामध्ये कारणीभूत असू शकतात.

स्वभाव : जी मुले लाजाळू, भित्री, प्रत्येक वाद प्रसंगात माघार घेणारी असतात किंवा नवीन परिस्थितींना तोंड देत असताना सतत संयम ठेवतात, अशांना हा विकार जडण्याचा जास्त धोका असतो.

नव्या स्वरूपाच्या सार्वजनिक किंवा कामाच्या गरजा: सामाजिक चिंता विकार लक्षणे सामान्यतः किशोरवयीन वर्षांमध्ये सुरू होतात, परंतु नवीन लोकांना भेटणे, सार्वजनिकपणे भाषण देणे किंवा महत्त्वपूर्ण कार्य सादर करणे अशा प्रसंगांनी या विकाराच्या लक्षणांची सुरुवात होऊ शकते.

लक्ष वेधून घेणारे शारीरिक स्वरूप किंवा स्थिती: आजारामुळे चेहरा विद्रूप होणे, तोतरे बोलणे किंवा पार्किन्सनसारख्या आजाराने अंग थरथरत राहणे, अशा अन्य गोष्टींमुळे घडलेल्या विकृतींबाबत काहीजण ‘सेल्फ-कॉन्शस’ होतात आणि त्यातून सामाजिक चिंता विकार उद्‍भवतो.

गुंतागुंत

या विकाराचा उपचार न केल्यास त्या व्यक्तीच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सार्वजनिक, व्यावसायिक जीवनात उलथापालथ होऊ लागते; काम, शाळा, नातेसंबंध किंवा जीवनाच्या आनंदात व्यत्यय येऊ लागतात.

परिणामतः आत्माभिमान कोलमडून पडतो, मनाचा खंबीरपणा ढळतो, नकारात्मक पद्धतीचा स्वसंवाद सुरू होतो, छोटीशी टीका झाली तरी त्याबद्दल अतिसंवेदनशील प्रतिक्रिया मनात येत राहतात, सामाजिक कौशल्यांचा ऱ्हास होऊ लागतो, एकलकोंडेपणा वाढू लागतो, सामाजिक व कौटुंबिक संबंधात दुरावा निर्माण होतो, शैक्षणिकदृष्ट्या ते मागे पडू लागतात, रोजगार मिळणे दुष्प्राप्य होते, मद्यसेवन, धूम्रपान किंवा मादक पदार्थांची व्यसने लागू शकतात आणि सर्वात दुर्दैवी प्रकार म्हणजे आत्महत्येचे विचार मनात घोळू लागतात किंवा तसे प्रयत्नही केले जातात.

सामाजिक चिंता विकाराच्या जोडीने अनेकांमध्ये इतर चिंता विकार, इतर मानसिक आरोग्य विकार, वैद्यकीय नैराश्य विकार आणि पदार्थांच्या गैरवापराच्या समस्या उद्‍भवताना दिसून येतात.

प्रतिबंध

कोणाही व्यक्तीमध्ये चिंता विकार नक्की कशामुळे निर्माण झाला आहे, हे सांगणे अवघड असते, परंतु चिंताग्रस्त अवस्थेमधील लक्षणांचा प्रभाव कमी करण्यासाठी काही पावले उचलता येतात. त्यासाठी विकारांची सुरुवात ओळखून सुरुवातीच्या टप्प्यातच वैद्यकीय मदत मिळवणे आवश्यक असते. अन्य शारीरिक किंवा विकारांप्रमाणेच यातही वेळ घालवल्यास, नंतर उपचार करणे कठीण होऊ शकते.

नोंदवही ठेवणे : आपल्या डायरीमध्ये नियमित स्वरूपात वैयक्तिक जीवनाचा मागोवा ठेवल्याने स्वतःला आणि डॉक्टरांना, हा तणाव कशामुळे असू शकेल आणि बरे वाटण्यास कशामुळे मदत होईल हे ठरवता येते.

जीवनातला प्राधान्यक्रम ठरवावा. आपला वेळ आणि आपली क्षमता यांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन केल्यास चिंता कमी करता येतात. आवडणाऱ्या गोष्टी करण्यातच वेळ व्यतीत केला जातो आहे, याची खात्री करता येते.

व्यसने : मद्यसेवन, तंबाखू, धूम्रपान, ड्रग्ज यांचा वापर टाळावा.अगदी चहा-कॉफीमधले कॅफिन किंवा सिगारेटमधील निकोटीनचा वापर चिंता निर्माणही करतात किंवा त्या वाढवूही शकतात. यापैकी कोणत्याही पदार्थाचे व्यसन असल्यास, ते सोडणेदेखील चिंतेचे कारण बनते त्यासाठी वैद्यकीय मदत, उपचार कार्यक्रम किंवा समर्थन गट शोधावा.

निदान

  1. सामाजिक चिंता विकाराचे निदान करण्यासाठी डॉक्टरांकडून खालील गोष्टींची चर्चा केली जाते. तुमचे डॉक्टर यावर आधारित निदान निर्धारित करू शकतात.

  2. एखादा शारीरिक आजार किंवा काही अशी औषधे घेतली गेल्यामुळे चिंतेची लक्षणे उद्‍भवली आहेत का, याचे मूल्यांकन करण्यासाठी काही शारीरिक तपासण्या केल्या जातात.

  3. लक्षणे किती वेळा आणि कोणत्या परिस्थितीत उद्‍भवतात?

  4. चिंता निर्माण करणाऱ्या सर्वसामान्य घटनांची यादी करून त्यातील कोणत्या घटनांनी त्रास होतो याची नोंद केली जाते.

  5. सामाजिक चिंतेच्या लक्षणांबद्दल रुग्णाच्या स्वतः नोंद केलेल्या अहवालाबाबत प्रश्नोत्तरे

  6. याबाबत, अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनने प्रकाशित केलेल्या डायग्नोस्टिक अॅण्ड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्समध्ये (डीएसएम-५) समाविष्ट असलेल्या खालील निकषांचे मोजमाप केले जाते.

  7. रुग्णाला त्याच्याकडे नकारात्मक पद्धतीने पाहिले जाईल, त्याचा उपहास केला जाईल किंवा त्याला अपमानित केले जाईल याची खात्री वाटते अशा काही विशिष्ट सामाजिक परिस्थिती. त्यामुळे त्या सामाजिक परिस्थितीबाबत सतत, तीव्र भीती किंवा चिंता वाटणे

  8. चिंता निर्माण करणाऱ्या सामाजिक परिस्थिती टाळणे किंवा त्याबाबतची तीव्र भीती किंवा चिंता सहन करणे

  9. सदर सामाजिक परिस्थितीबाबत, प्रमाणापेक्षा जास्त प्रतिक्रिया व्यक्त करणे

  10. चिंता किंवा वाटणाऱ्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात व्यत्यय येणे

  11. शारीरिक आजार, अन्य कारणांसाठी वापरली जाणारी औषधे किंवा व्यसने यातून स्पष्टपणे न उद्‍भवलेली भीती किंवा चिंता

उपचार

दैनंदिन जीवनात सामाजिक चिंता विकारांमुळे एखाद्याच्या कार्यक्षमतेवर कितपत परिणाम झाला आहे, यावर त्याचे उपचार अवलंबून असतात. सामाजिक चिंता विकारावरील उपचारांमध्ये मानसोपचार, मानसशास्त्रीय समुपदेशन (टॉक थेरपी) तसेच औषधे यांचा समावेश असतो.

मानसोपचार : सामाजिक चिंता विकार असलेल्या बहुतेक रुग्णांमधली लक्षणे मानसोपचारांमुळे सुधारतात. या उपचारात स्वतःचे नकारात्मक विचार कसे ओळखावे आणि कसे बदलावे हे शिकवले जाते आणि त्रासदायक सामाजिक परिस्थितींमध्ये आत्मविश्वास मिळविण्यात मदत करणारी कौशल्ये विकसित केली जातात.

कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (सीबीटी) सामाजिक चिंता विकारांच्या मानसोपचाराचा हा सर्वात प्रभावी प्रकार असतो. तो वैयक्तिकरित्या किंवा गटांमध्ये आयोजित केला जातो.

एक्सपोजर : या उपचारपद्धतीत सीबीटीमध्ये रुग्णाला ज्या परिस्थितीची भीती वाटते त्या परिस्थितींचा सामना करण्यासाठी हळूहळू प्रयत्न करणे शिकवले जाते.

त्यातून अशा स्थितीचा सामना करण्याची कौशल्ये सुधारतात, चिंता निर्माण करणाऱ्या परिस्थितींना सामोरे जाण्याबद्दल आत्मविश्वास जागा होतो, सामाजिक कौशल्यांचा सराव करण्यासाठी आणि इतरांशी संबंधित आराम आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण किंवा भूमिका बजावण्यातदेखील सहभागी केले जाते.

आपल्या चिंतांना आव्हान देण्यासाठी सामाजिक परिस्थितींना सामोरे जाण्याचा हा सराव विशेष उपयुक्त असतो.

औषधे : अशा विकारांवर उपचार करताना मुख्यत्वे सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रीअपटेक इनहिबिटर (एसएसआरआय), सिरोटोनिन नॉरएपिनेफ्रिन रीअपटेक इनहिबिटर या गटातील औषधे वापरली जातात.

साइड इफेक्टचा धोका कमी करण्यासाठी ही औषधे कमी मात्रेमध्ये सुरू करून, हळूहळू पूर्ण डोसमध्ये वाढवली जातात. रुग्णांच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्यासाठी अनेक आठवडे ते अनेक महिने उपचार करावे लागतात.

या औषधांसोबत, काही अँटिडिप्रेसन्ट, चिंता विरोधी औषधे, बीटा ब्लॉकर अशी इतर औषधेही दिली जातात.

उपचारांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी, नियमितपणे डॉक्टरांच्या आणि समुपदेशकांच्या भेटी घेणे आणि दीर्घकाळ, न चुकता, न चुकवता, औषधोपचार चालू ठेवणे आवश्यक असते.

----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com