अवनीवाच्या गोष्टी ।मैत्रेयी पंडित-दांडेकरनकाराचं शॉर्ट टर्म पेन हे आमच्या एकूण लाँग टर्म गेनसाठीच आहे, हे आता पटायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच साबणाच्या ‘दाग अच्छे है’ जाहिरातीनंतर आता ‘नकार अच्छे है’ असं म्हटलं, तर ते काही वावगं ठरणार नाही. .‘आजकालची जनरेशन प्रिव्हिलेज्ड आहे, एनटायटल्ड आहे’, ‘त्यांना नकार पचवण्याची ताकद नाहीये’, ‘काही मागितलं की सगळं लगेच मिळतं’ अशी उथळ वाक्यं फेकणाऱ्या आया, मावश्या, काकवा, आज्या वगैरेंना आमच्याकडे एक दिवस मुक्कामाला बोलवायला पाहिजे, असं आम्हाला क्षणोक्षणी वाटतं. सकारात्मकतेचा प्रचार करणारे आमचे पालक दिवसातील आमच्या अतिशय महत्त्वाच्या (पण त्यांच्या मते फाजील, फालतू, क्षुल्लक आणि अनावश्यक) अशा ४६ मागण्यांपैकी ६४ मागण्यांना निष्ठुरपणे नकार देतात. जसं की,.‘‘मम्मा, मला आयफोन घेशील?’’ ‘‘नाही!’’‘‘मम्मा, उद्या स्कूल लंच करू?’’ ‘‘नाही!’’‘‘मम्मा, मी नीवूचे दात घासून देऊ?’’ ‘‘नाही!’’‘‘मम्मा, माझ्या वाढदिवसाला मी केस कलर करू?’’ ‘‘नाही!’’‘‘मम्मा, मी दियाकडे स्लीपओव्हरला जाऊ?’’ ‘‘नाही!’’‘‘मम्मा, आज वरण भात खाल्ला म्हणून आइस्क्रीम देतेस?’’ ‘‘नाही!’’इत्यादी....आम्हास कधी ना होकार मिळेनापालकांच्या मुखाचा नकार टळेनाकोण म्हणे किती मी सुदैवी आहे‘क्षुल्लक’ मागणी माझा अंत पाहे ।। १ ।।मग आमच्या पालकांचा हा नन्नाचा पाढा ऐकून आम्हीपण आमची कर्णकर्कश्श नकारघंटा वाजवायला लागतो. आम्हीही त्यांच्या दिवसागणिक वाढणाऱ्या अवाजवी मागण्यांना ‘नो’ म्हणून त्वरित रिजेक्ट करू लागतो. जसं की,.अवनी, तुझा पसारा आवरतेस का?’’ ‘‘नोsss’’‘‘नीवा, आज कोबीची भाजी करू?’’ ‘‘नोsssss’’‘‘चला, शुभंकरोती म्हणायचं का?’’ ‘‘नोsssssss’’‘‘अवनी केस बांधून घेतेस का?’’ ‘‘नोssssssअsss’’‘‘नीवा मराठीत बोलशील का?’’ ‘‘नोsssssssअsssss’’इत्यादी...मना सर्वदा नकारघंटाच वाजेमना मानसी दुःख केवढे विराजेतया ऐकता राग मनी पुरेनासदा सर्वदा वादविवाद चुकेना ।। २ ।।आणि मग घरी नकाराची जुगलबंदी सुरू होते. त्यावरून आरडाओरडी, चिडचिड, भांडाभांडी, रडारडीत तारसप्तकं गाठली जातात. मम्मा विरुद्ध अवनीवा अशा दोन्ही आडमुठ्या बाजूंत बिचारा बाबा मात्र मधल्यामध्ये होरपळला जातो आणि बारीकसारीक नकार, नाराजीपेक्षा ‘बिगर पिक्चर’वर फोकस करायचा सल्ला दोन्ही गटांना वेळोवेळी देतो..जनी वादविवाद सोडूनि द्यावाजनी वादसंवाद सूखे करावानसे नकार असे विवाद विकारीनकारातून होकार जन्मे हीतकारी ।। ३ ।।.आम्हाला हळूहळू बाबाचं बोलणं पटायला लागतं आणि या जादुई नकारांमुळे आमच्यात सकारात्मक बदल घडू लागतात. काय, कधी, किती, कुठे आणि कशासाठी मागायचं याचा आम्ही अभ्यास करू लागतो. त्यातून नकाराचा होकार कसा करून घ्यायचा, हे आम्हाला समजू उमजू लागतं. ग्लास अर्धा रिकामा बघण्यापेक्षा अर्धा भरलेला बघण्याचा नवा दृष्टिकोन आम्हाला कळू लागतो. त्याप्रमाणे आमच्या मागण्यांत हळूहळू बदल घडू लागतात. आयफोनचा नाद सोडून स्क्रीन टाइममध्ये पाच मिनिटं वाढीची मागणी केली जाते (अवनीवा म्हणे, ‘त्यातल्या त्यात’!). आठवड्यातून एक दिवस स्कूल लंचला मंजुरी मिळवली जाते (अवनीवा म्हणे, ‘त्यातल्या त्यात’!). नीवूचे दात मी घासण्यासाठी बाबाच्या हाताखाली दोन आठवडे प्रशिक्षण घेण्याचा आणि मग परीक्षा देण्याचा करार मंजूर होतो (अवनीवा म्हणे, ‘त्यातल्या त्यात’!). केस रंगवण्याऐवजी रंगीबेरंगी, खोटे केसाचे एक्सटेंशन असलेल्या हेअरबँडची खरेदी केली जाते (अवनीवा म्हणे, ‘त्यातल्या त्यात’!). .आइस्क्रीम, चॉकलेटं असे गोड पदार्थ किंवा प्लॅस्टिकचा किरकोळ खेळणी वजा कचरा अशा फाजील मागण्या आई-वडील सोडून फक्त मामा, मीमी, जीजी, आज्या अशा प्रेमळ लोकांकडेच करायच्या हे कळायला लागतं (अवनीवा म्हणे, ‘त्यातल्या त्यात’!). आणि अशाप्रकारे ४६ मागण्यांपैकी २३ मागण्यांना होकार मिळू लागतात (अवनीवा म्हणे, ‘त्यातल्या त्यात’!). शेवटी मम्मा म्हणते ‘हे सत्य पचवा, नाहीतर माझ्याशी गाठ आहे’ आणि उरलेले २३ नकार कमी कुरकुरत पचवण्याची ताकद आमच्यात निर्माण होते..तिकडे आनंदीबाईंच्या ‘ध’च्या ‘मा’पासून प्रेरित होऊन आमच्या मातोश्री मुलींच्या ‘नो’चा ‘हो’ करायला घेतात आणि नन्नाचा पाढा कमी करण्याचं जाहीर वचन घेतात. त्यानुसार पसारा आवरण्याच्या नियमात थोडी सवलत दिली जाते (मम्मा म्हणे, ‘त्यातल्या त्यात’!). कोबीचा पिझ्झा, फ्लॉवरचे चिकन विंग्ज अशा अनेक चवदार आणि फसव्या जंक पदार्थांचा मम्माकडून शोध लावला जातो (मम्मा म्हणे, ‘त्यातल्या त्यात’!). शुभंकरोती/रामरक्षेवर नाचबीच बसवून, म्युझिकल चेअरमध्ये त्यांना घुसडून आपलंस केलं जातं (मम्मा म्हणे, ‘त्यातल्या त्यात’!). अधूनमधून आम्हाला झिंज्या मोकळ्या सोडायला, तूपनामक लिपस्टिक लावायला परवानगी दिली जाते (मम्मा म्हणे, ‘त्यातल्या त्यात’!). मराठीत बोलणारीचं जास्त कौतुक करून अप्रत्यक्षपणे दुसरीला मराठीत बोलायला उद्युक्त केलं जातं (मम्मा म्हणे, ‘त्यातल्या त्यात’!). शेवटी अवनीवा म्हणतात, ‘थोडी चिल हो, नाहीतर अवघड आहे.’ त्यामुळे थोडक्यात काय, तर आकाशपाताळ एक करणाऱ्या तुरळक गोष्टी वगळता मम्मादेखील इतर गोष्टींसाठी थोडी ‘चिल’ होते..तर अशा या नकारघंटेतल्या मजबूत लोलकांनी आम्हाला बडवून बडवून आता अगदी स्ट्रॉँग केलं आहे. आमच्या बाबानी आम्हाला वेळोवेळी वास्तवाची जाणीव करून दिली आहे. नकाराचं शॉर्ट टर्म पेन हे आमच्या एकूण लाँग टर्म गेनसाठीच आहे, हे आता पटायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच साबणाच्या ‘दाग अच्छे है’ जाहिरातीनंतर आता ‘नकार अच्छे है’ असं म्हटलं, तर ते काही वावगं ठरणार नाही..POCSO: मुलांचे सक्षमीकरण, सुरक्षिततेसाठी कायदा आणि लैंगिक शिक्षणाची जोड.जगी धन्य ज्याला नकार मिळालाहोकार करण्यात तल्लीन झालातया लाभली मनःशांती पुण्य थोडेतया भाषणे नष्ट संदेह मोडे ।। ४ ।।(मैत्रेयी पंडित-दांडेकर कॅलिफोर्नियास्थितबायोमेडिकल इंजिनिअर आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.