इलॉन मस्क आणि बिल गेट्स या दोघांवरही प्रभाव पाडणारे AI विषयाचे ते कोणते पुस्तक? अनेक जर्नल्सनेही केली होती पुस्तकाची चिकित्सा

AI क्षेत्राच्या बाबतीत चीन अपवाद कसा ठरतो?
Elon musk and bill gates
Elon musk and bill gates Esakal

माणसाला त्याच्या आदिमानव असण्याच्या काळापासून अनेक धोक्यांना तोंड देत, त्यावर मात करतच आपली प्रगती करावी लागली. मानवाची आजची तत्त्वज्ञानप्रधान संस्कृती याच व प्रदीर्घ प्रक्रियेतून घडत आलेली आहे, असे सांगायला खरे तर बोस्ट्रॉर्मसारख्या तत्त्ववेत्त्याची आवश्यकता नाही, याबाबत कोणतेही दुमत होणार नाही. बोस्ट्रॉर्म यापुढे जे सांगतो ते अधिक महत्त्वाचे आहे व तेथेच अस्तित्वधोका नावाचा धोका संभवतो.

डॉ. सदानंद मोरे

ज्यांनी संगणक नावाचे यंत्र तयार केले, ज्यांनी कृत्रिम बुद्धीचा विकास केला व तिच्या साह्याने एरवी आपल्या ज्ञानाच्या कक्षेत येण्याची फारच कमी शक्यता असलेल्या वस्तू, प्रक्रिया इत्यादींचे हुबहूकरण केले ते, म्हणजे अर्थातच पृथ्वी नावाच्या ग्रहावरील मानव, स्वतःच त्याच्यापेक्षा अधिक तंत्रप्रगत असलेल्या संस्कृतीने केलेले हुबहूकरण असण्याची शक्यता लक्षणीय आहे, असे निक बोस्टॉर्मने २००३मध्येच सांगितले होते.

तथापि तेव्हा तो विषय एआय क्षेत्रातील तज्ज्ञांपुरताच मर्यादित राहिला असावा. तोही त्या क्षेत्रातील तात्त्विक विचार करू शकणाऱ्यांपुरता. एरवी ज्यांना आपण तंत्रज्ञ, अभियंते असे ओळखतो त्यांना अशा मूलभूत प्रश्नांचा विचार करायला फुरसतही नसते. प्रतिभावंतांकडून मिळालेल्या गाईचे जास्तीत जास्त दूध कसे काढता येईल असेच जणू या बुद्धिवंतांना वाटत असणार, यात शंका नाही.

कृबुचा अमर्याद विस्तार करणे हेच उद्दिष्ट बाळगून बसलेल्यांच्या हे लक्षात येत नाही, की असा विस्तार करणे शक्य असले तरी, ते इष्ट आहे की नाही याचा विचार करूनच पुढचे पाऊल टाकण्याची गरज आता निर्माण झाली आहे. विज्ञानाच्या इतिहासात असा प्रसंग यापूर्वी फक्त एकदाच निर्माण झाला होता.

तो म्हणजे अणुस्फोटाचा. विशेष म्हणजे तेव्हा अणुबॉम्बच्या निर्मितीचा नेता असणारा वैज्ञानिक ओपनहायमरने नंतर थोड्याच काळात अमेरिका जेव्हा अधिक विनाशकारी अशा हायड्रोजनबॉम्ब निर्मितीचा प्रकल्प घ्यायचा म्हणू लागली तेव्हा नाराजी व नापसंती व्यक्त केली होती. ओपनहायमर हा खरोखरच तात्त्विक (Philosophical) कल असलेला वैज्ञानिक होता. त्याला भगवद््गीतेचे तत्त्वज्ञान ठाऊक होते.

अर्थात त्याच्या म्हणण्याची ना वैज्ञानिकांच्या वर्तुळाने दखल घेतली ना राज्यकर्त्यांनी. इतकेच नव्हे तर स्वतः ओपेनहायमरच्याच निष्ठेविषयी शंका घेण्यात आली. तो मॅकार्थी मोहिमेत (म्हणजे कम्युनिस्ट विचारसरणीशी या ना त्या प्रकारे निगडित असलेल्यांना शोधून काढून बहिष्कृत करण्याच्या) भरडत गेला.

अर्थात अमेरिकी राज्यकर्त्यांचा एच.बॉम्ब बनविण्याचा हा निर्णयही समजून घ्यायला हवा. तो शीतयुद्धाचा काळ होता आणि आपण शस्त्रसज्जतेत आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक पाऊल पुढे असले पाहिजे, असे गृहीत धरून अमेरिका आणि रशिया यांच्यात चढाओढ सुरू होती.

अमेरिकेने व्यावहारिक किंवा तात्त्विक किंवा नैतिक मुद्द्यावर महाविनाशकारी एच.बॉम्ब करायचा नाही, असा निर्णय घेतला आणि तरीही रशियाने असा बॉम्ब तयार करण्यात यश मिळवले तर काय होईल, असा प्रश्न उपस्थित करूनच अमेरिकेचे परराष्ट्र धोरण ठरवले जात होते.

असाच विचार रशियाचाही असणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे ओपनहायमर सारख्यांची मते अरण्यरुदन ठरणार हे उघड होते.

खरेतर घडलेही तसेच रशियानेच अमेरिकेच्या अगोदर हा महासंहारक बॉम्ब बनवण्यात यश मिळवले!

अशा प्रकारच्या विचारपद्धतीत दडलेले एक गृहीत सूत्र लक्षात घ्यायला हवे. आपण नष्ट होणे व प्रतिस्पर्धी विजयी होऊन अस्तित्वात राहणे, यापेक्षा प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून आपण टिकून राहणे केव्हाही श्रेयस्कर आणि त्याहीपुढील मुद्दा म्हणजे आपले अस्तित्व टिकून शत्रू नष्ट होणे शक्य होत नसेल तर मग दोघेही नष्ट झाले तरी चालेल!

पण ही झाली राज्यकर्त्यांची विचारपद्धती. वैज्ञानिकांनी असाच विचार करायला हवा असे काही बंधन नाही. राज्यकर्त्यांची गोष्टच वेगळी असते. त्यांना राज्य चालवायचे असते, राज्याचे संरक्षण करायचे असते. त्यांचा विचार राज्य/ राष्ट्रकेंद्रित असतो.

प्रजेलाही असाच विचार करायला लावून, प्रसंगी भयभीत करून आपली सत्ता टिकवायचा उद्देशही त्यात असतोच, आणि तसेही पाहता वैज्ञानिकही कोणत्या ना कोणत्या राष्ट्राचे नागरिक असतातच.

त्यांच्यातही राष्ट्रभक्ती नावाची भावना जागृत असते. त्यामुळे त्यांनीही सर्वसामान्य अडाणी प्रजेप्रमाणेच विचार करावा यात आश्चर्य नाही.

एच. बॉम्बच्या वेळीही ओपनहायमरसारखा विचार करणारे शास्त्रज्ञ थोडे होते, हे विसरता कामा नये.

हा झाला राष्ट्रभक्ती वगैरेसारख्या (मानवतावादाइतका महत्त्वाचा नसला तरीही) उदात्त विचारसरणीचा मुद्दा. असा विचार करणारे वैज्ञानिक राज्यकर्त्यांच्या आणि सर्वसाधारण प्रजेच्या प्रशंसेस व कौतुकास पात्र ठरणार व वेगळी भूमिका घेणारे वैज्ञानिक उपहासाचा विषय ठरणार हे उघड आहे. जसा तो ओपनहायमर ठरला.

अणुबॉम्बमुळे मानवजातीस निर्माण झालेला धोका हा एक मुद्दा. हा धोका आणि कृबुमुळे संभावणारा धोका यांच्यातील भेद पूर्वी काहीसा सूचित केलेला आहेच.

यातील एक मुद्दा म्हणजे अणुशक्तीच्या संशोधनात कितीही प्रगती झाली तरी तिचा प्रत्यक्षात वापर करायचा, हे ते संशोधन कोणाच्या म्हणजे कोणत्या राष्ट्राच्या ताब्यात आहे यावरून ठरणार, हे अगदी स्पष्ट आहे.

आणखी एक शक्यता म्हणजे एखादी अतिरेकी, धर्मवेडी संघटना अवैध मार्गाने अणुशक्ती हशील करील व तिचा दुरुपयोग करील. एरवी अजून तरी खासगी भांडवलदारांना अणुशक्तीचा व्यावसायिक उपयोग करण्याची मुभा नसल्याने त्यांच्याकडून तरी अशा दुरुपयोगाची शक्यता नाही.

आता कृबु क्षेत्राकडे वळले तर काय आढळते? कृबु उद्योग (AI Industry) पूर्णतः खासगी व्यावसायिक भांडवली व्यवस्थेतील उद्योजकांकडे आहे. जगातील अनेक कॉर्पोरेट कंपन्या या क्षेत्रात आहेत. काय संशोधन करायचे व ते किती पुढे न्यायचे हे सर्व काही या कंपन्या, त्यांचे सीईओ ठरवतात.

केवळ लोकमताच्याच नव्हे तर कृबुक्षेत्रातील अनुभवी मातब्बरांच्या दडपणामुळे राष्ट्रांना आपापले कृबु धोरण जाहीर करावे लागत आहे, इतकेच नव्हे तर अनेक (प्रसंगी सर्वच) राष्ट्रांच्या परिषदा भरून त्यात सर्वंकष व सर्वमान्य अशा कृबु धोरणाची चर्चाही होताना दिसते. पण एखाद्या चीनसारख्या राष्ट्राचा अपवाद सोडला तर इतरत्र कृबु उद्योग खासगी भांडवलदारांच्याच हातात असल्याचे दिसून येते.

यात अर्थात कृबु संशोधनाचाही समावेश होतोच होतो. आणि ज्या चीनच्या अपवादाचा उल्लेख केला तो अपवाद स्वागतार्ह किंवा प्रशंसनीय नाही, हे लक्षात घ्यायला हवे. एक तर या देशातील सर्वच क्षेत्रात कमालीची गुप्तता राखायची, असा तेथील सरकारचा नियमच आहे. त्याला कृबु अपवाद असायचे कारण नाही.

याचाच अर्थ असा होतो, की तेथे कृबु संशोधन, उत्पादनावर सरकारी नियंत्रण आहे. त्याची दिशा व मर्यादा ठरवायचा अधिकारही सरकारलाच आहे. काही वर्षांपूर्वी जगभर धुमाकूळ घातलेल्या कोविड-१९ या संसर्गाचे मूळ चीनमध्ये आहे आणि त्याही पुढे जाऊन चीनच्या गोपनीय बायोटेक्नॉलॉजिकल संशोधनात आहे, असा जगभर पसरलेला संशय अजिबातच निराधार आहे असे समजणे कठीण आहे.

चीनचा एकूणच इतिहास असे समजण्याच्या आड येतो. अर्थात चीनचे प्रतिनिधी कृबुविषयक जागतिक परिषदांना हजेरी लावतात, मानवजाती विषयीची आपली आस्था प्रकट करतात.

कमी अधिक नियंत्रणे लादणाऱ्या करारांवर त्यांनी सह्याही केल्या असतील पण त्यांच्या अंतरंगाचा थांग लागणे अवघड आहे. अर्थात याबाबतीत चीनचे समर्थक, हा पाश्चात्त्य भांडवलदार देशांचा अपप्रचार आहे; त्यांनी चीनची अशी प्रतिमा हेतुपुरस्सर प्रचलित केली आहे, असे म्हणू शकतात.

डॉ. फ्यू मांचू हे कादंबऱ्यांमधील व चित्रपटांमधील पात्र हा चिनी व्यक्तिमत्त्वाचा प्रातिनिधिक नमुना नव्हे, असेही ते म्हणतील. पण त्यांना संशयाचा फायदा देऊनही शेवटी चीनवर पूर्ण विश्वास टाकता येत नाही, असे म्हणावे लागते.

याचा अर्थ असाही नाही, की पाश्चात्त्य राष्ट्रे प्रामाणिकपणाचे पुतळे आहेत. त्यांचे सर्व व्यवहार जगजाहीर असतात ती कोणाची फसवणूक करीत नाहीत. उलट त्यांनाही कृबुचा उपयोग संरक्षण सज्जतेसाठी, युद्धासाठी करायचा असतोच व त्यासाठी त्यांचे व कृबु कॉर्पोरेटचे साटेलोटे असतेच.

ही कोंडी कशी फोडायची हा खरा पेच आहे. यातला एक मार्ग म्हणजे अगोदर सूचित केल्याप्रमाणे वैज्ञानिकांमधील विवेकबुद्धी जागृत होऊन त्यांनी एकत्रितपणे राज्यकर्त्यांच्या व भांडवलदार उद्योजकांशी सहकार्य करणे नाकारायचे. या मार्गातील अडचणी स्पष्ट केलेले आहेतच.

सर्व वैज्ञानिक एकत्रितपणे कृबु संशोधन व उत्पादन यावर नियंत्रण करतील, ही शक्यता कमी असली तरी आशेचा किरण दिसतच नाही, असे मात्र नाही. काही वैज्ञानिकांनी व वैज्ञानिक उत्पादकांनी स्वतःहूनच पत्रक काढून कृबु संशोधन निदान सहा महिने तरी स्थगित ठेवावे, असे आवाहन केले होते.

यात अनुस्यूत असणारी धोरणात्मक बाब म्हणजे दरम्यानच्या काळात सर्वांनी एकत्रित चर्चा करून कृबु संशोधनावर कोणती नियंत्रणे असावी, त्याची काय दिशा असावी याचा एक मताने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करायची.

या सह्याजीरावांमध्ये झळकणारे महत्त्वाचे नाव म्हणजे अर्थातच एलॉन मस्क. मस्क स्वतः संशोधक-तंत्रज्ञ-उद्योजक असल्याचे आपण जाणतो. म्हणजेच तो केवळ स्वप्नाळू विचारवंत नाही. वास्तवाची जाण नसणारा पढीक तत्त्वज्ञ नाही. पण त्याचबरोबर त्याला केवळ नफेखोर भांडवलदारही म्हणता येणार नाही.

मस्क अशा निष्कर्षापर्यंत पोहोचला याचे श्रेय त्याचे त्याला द्यायलाच हवे. याबाबतीत कृपण किंवा कद्रू व्हायचे कारण नाही. तथापि हेही लक्षात घ्यायला हवे, की गेली काही दशके कृबु संशोधनावर गंभीरपणाने चर्चा केली जात आहे.

मस्कने आपणच आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान व कृबुप्रगत संस्कृतीच्या लोकांचे सिम्युलेशन असण्याची जी शक्यता व्यक्त केली, ती २००३मध्ये ज्या निक बोस्ट्रॉर्मनी सांगितली होती, त्याच निक बोस्ट्रॉर्मने २००१-०२च्या दरम्यान कृबुतून निष्पन्न होऊ शकणाऱ्या अस्तित्वधोक्याचा (Existential Risk) इशारा दिला होता.

हाच विषय पुढे नेत त्याने सुपरइंटेलिजन्सः पाथ, डेंजर्स अॅण्ड स्ट्रॅटेजीज या शीर्षकाचे पुस्तक लिहिले. ते पुस्तक गाजलेदेखील. पुस्तकाचा जसा मस्कवर परिणाम झाला तसाच तो बिल गेट्सवरही झाला.

प्रसिद्ध एआय सीईओ सॅम अल्टमन यानेही बोस्ट्रॉर्मचे पुस्तक म्हणजे, ‘the least thing I have ever read on AI risk’ असा निर्वाळा दिला. वेगवेगळ्या प्रतिष्ठित नियतकालिकांमधून या पुस्तकाची परीक्षणे प्रसिद्ध झाली. फिलॉसॉफी नावाच्या नियतकालिकामधील समीक्षकाने हे पुस्तक कृबुबाबतच्या, The Singularity Is Nearपेक्षा अधिक वास्तववादी असल्याचे मत नोंदवले.

Elon musk and bill gates
Artificial Intelligence आल्यावर नोकऱ्यांचे काय होणार? Persistent या IT कंपनीचे संस्थपाक आनंद देशपांडे काय म्हणाले?

बोस्ट्रॉर्मच्या २००१-०२ मधील ज्या पेपरचा उल्लेख केला आहे तो म्हणजे Existential Risks: Analysing Human Extinction and Related Hazards हा पेपर होय. ‘It is dangerous to be alive and risks are everywhere’ अशा काहीशा काव्यात्म वाटणाऱ्या वाक्याने पेपरची सुरुवात करणारा बोस्ट्रॉर्म हा तत्त्वज्ञानाचा प्राध्यापकही होता, हे लक्षात घ्यायला हवे.

कोणत्याही अभ्यास विषयाच्या खोलवर -तळापर्यंत जावे अशी तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकाकडून अपेक्षा असते, ती त्याने नक्कीच पूर्ण केली आहे असे कोणीही म्हणेल.

खरेतर माणसाचे जीवन हीच एक ‘रिस्की’ (Risky) म्हणावी अशी प्रक्रिया म्हणता येईल. पण बोस्ट्रॉर्म काही व्यक्तीच्या जीवनाबद्दल म्हणत नाही. तो एकूणच मानव नावाच्या प्रजातीविषयी सांगत आहे.

माणसाला त्याच्या आदिमानव असण्याच्या काळापासून अनेक धोक्यांना तोंड देत, त्यावर मात करतच आपली प्रगती करावी लागली. मानवाची आजची तत्त्वज्ञानप्रधान संस्कृती याच व प्रदीर्घ प्रक्रियेतून घडत आलेली आहे, असे सांगायला खरे तर बोस्ट्रॉर्मसारख्या तत्त्ववेत्त्याची आवश्यकता नाही, याबाबत कोणतेही दुमत होणार नाही. बोस्ट्रॉर्म यापुढे जे सांगतो ते अधिक महत्त्वाचे आहे व तेथेच Existential Risk नावाचा धोका संभवतो.

मानवाच्या प्रगतीच्या या पुढील टप्प्याला बोस्ट्रॉर्म ‘पोस्ट ह्यूमन सोसायटी’ असे नाव देतो.

प्रसिद्ध जर्मन राजकीय तत्त्ववेत्ती व्यक्ती हॅना अॅरंटच्या द ह्युमन कंडिशन्स या गाजलेल्या ग्रंथाचा उल्लेख यापूर्वी झाला होता. याच संदर्भात आता रॉबर्ट पेपिरेलचे द पोस्टह्यूमन कंडिशन्स वाचायला हवे.

काही विद्वान तर पोस्ट-पोस्टह्यूमॅनिझमच्या भाषेत बोलू लागले आहेत. पण आपल्याला त्या खोलात जायची गरज नाही.

स्वतः बोस्ट्रॉर्मची पोस्टह्यूमन व्हायला हरकत नाही. इतकेच काय २००६मध्ये Why I Want to be a Post Human When I Grow Up या पेपरमध्ये ‘It could be very good for human beings to become post human’, असे स्पष्ट विधानही केले आहे.

---------------

Elon musk and bill gates
Bill Gates: '100 वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज...,' AI आणि नोकऱ्यांबद्दल काय म्हणाले बिल गेट्स?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com