प्रभू श्रीराम आणि श्रीपरशुराम यांच्या विषयीचा एकमेवाद्वितीय असा ग्रंथ कोणता?

शरीर म्हणजे आत्मा नव्हे. या शरीरात वास करून राहिलेला ‘मी’? तो तर आत्मा नाहीच..
swami rambhadracharya
swami rambhadracharyaEsakal

ब्रिटिश नंदी

आत्मा वेगळा. परमात्मा वेगळा. आत्मा अमर आहे. तो कधी मरत नाही. कधीही कुणाला मारत नाही. आत्मा निर्विकार आहे. तो अ-क्षर आहे. हे शरीर म्हणजे आत्मा नव्हे. या शरीरात वास करून राहिलेला ‘मी’? तो तर आत्मा नाहीच.

पण आत्मा म्हणतात तो असतो या कुडीतच. ही कुडी साधीसुधी नाही. हे ब्रह्मनगरीचंच एक रुप आहे.- प्रोटोटाइप! दोन कान, दोन डोळे, दोन नाकपुड्या, एक मुख, एक ब्रह्मरंध्र, गुद आणि शिश्न ही या नगरीची अकरा द्वारं. हृदयस्थळी अंगुष्ठमात्र आकारात ब्रह्म बद्ध असतं. आत्म्याचं अधिष्ठान हे इथं असतं.

आत्मा म्हणजेच प्राण का? अं... तसं म्हणता येणार नाही. माणूस गेला की प्राण जातात. किंवा उलटं... प्राण गेला की माणूस आपोआप जातोच. उरते ती निव्वळ कुडी. मग त्या आत्म्याचं काय होतं? आत्मा कुणी पाहिलाय का? तो कुठं जातो? तो मरत नाही, मारत नाही. अग्नीने जळत नाही, शस्त्राने कापला जात नाही, तर मग त्याचं काय होतं?

नचिकेतानं हे असलं काहीतरी थेट यमालाच विचारलं. यमानं त्याला टाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण नचिकेत चिवट होता. त्यानं यमाचा पिच्छा सोडला नाही. शेवटी यमानं त्याला आत्मज्ञान दिलं. जे देवदेवतांनाही दुर्लभ्य होतं, ते ज्ञान नचिकेताला मिळालं. कठोपनिषदात वर्णिलेला भारतीय इतिहासातला पहिला साधक किंवा चिकित्सक म्हणून नचिकेताची गोष्ट सांगितली जाते...

ती खरी असणार!

कारण नचिकेताचीच मेधा लाभलेले काही प्रज्ञावंत आजही आपल्यात वावरताना दिसतात. चित्रकूटचे स्वामी रामभद्राचार्य यापैकीच एक... कदाचित एकमेवाद्वितीय.

संस्कृत भाषा केव्हाच मृतप्राय झाली असली तरी आजही काही हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्या ठिकाणी ती बोलली जाते, ऐकली जाते, त्या भाषेत ग्रंथही लिहिले जातात. आपल्यासारख्या सामान्यांच्या आवाक्या पलीकडलं ते जग आहे. त्या जगात रामभद्राचार्य संपूर्ण तेजाने लखलखत असतात.

हे स्वामीजी आहेत. त्यांचा आश्रम, मठ सारं काही आहे. पण तसे ते लौकिकार्थाने स्वामी नाहीत. त्यांच्या प्रज्ञेचे पुरावे ठिकठिकाणी सापडतात. त्यांनी आजवर दोनशेतीसच्या वर ग्रंथ लिहिले आहेत. तेही बव्हंशी संस्कृतमध्ये. त्यांना बावीस भाषा येतात.

या भाषांमध्येही ते प्रभुत्वाने लिहितात. त्यांनी २००२मध्ये भार्गवराघवीयम हा एकवीसशे श्लोकांचा ग्रंथ लिहिला. श्रीरामप्रभू आणि श्रीपरशुराम यांच्याविषयीचा हा ग्रंथ एकमेवाद्वितीय असाच आहे. हा लिहिताना रामभद्राचार्यांनी आपलं संस्कृत भाषेचं ज्ञान पणाला लावलं.

तब्बल चाळीस वृत्तांमध्ये त्यांनी ही कथा श्लोकबध्द केली. -शुद्ध संस्कृत! प्राचीन काळचे कालिदासाचा रघुवंश, भारविचा किरातार्जुनीय, श्रीहर्षाचा नैषधीयचरितम हे पोथीग्रंथ संस्कृत साहित्यातले अमोलिक अलंकार मानले जातात. भार्गवराघवीयम त्याच पातळीचा ग्रंथ आहे.

संस्कृत साहित्यातील भरीव योगदानाखातर रामभद्राचार्यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला. खरंतर हा ज्ञानपीठाचाच सन्मान मानायला हवा. कारण स्वामी रामभद्राचार्य हे खरेखुरे ज्ञानपीठ आहे.

निव्वळ पाठांतर, घोकंपट्टी, संथा आणि संस्कृत भाषाविलासात रामभद्राचार्य अडकून राहिले नाहीत. ते स्वतःच एक चालतीबोलती संस्था आहेत. देशातलं पहिलं दिव्यांग विद्यापीठ त्यांनीच सुरू केलं. आज ते त्याचे कुलपती आहेत.

मध्य प्रदेशात चित्रकूट येथे डोंगर उतारावर रामभद्राचार्यांचा आश्रम आहे. इथं तपस्वी राहात असणार, याची खात्री पटावी, इतका रम्य आणि शांत परिसर आहे. तिथूनच रामभद्राचार्यांची संस्कृतसेवा, समाजसेवा चालते.

स्वामी रामानंदाचार्य यांनी विशिष्टाद्वैताचा प्रसार केला. त्यांच्या शिष्योत्तमात संत कबीर होते, आणि गोस्वामी तुलसीदासही! त्याच शिष्यांच्या नामावळीतील एक वर्तमानातील नाव म्हणजे रामभद्राचार्य...

याच स्वामींच्या प्रभावी साक्षीमुळे श्रीरामलल्लाच्या अयोध्येतील विवादाला निर्णायक वळण मिळालं. आज अयोध्येत भव्य मंदिर उभं राहिलं आहे, त्यामागे रामभद्राचार्यांची प्रज्ञा मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. ...

एवढं सगळं एका आयुष्यात घडवणाऱ्या रामभद्राचार्यांची दृष्टी वयाच्या दुसऱ्याच महिन्यात हरपली. पण त्यांच्या प्रज्ञाचक्षूंना जे दिसलं, ते आपल्यासारख्या सामान्यांना दिसणं कठीणच. एवढंच नव्हे, तर आयुष्यात एकदाही त्यांनी ब्रेललिपीचाही अवलंब केलेला नाही.

-कारण रामभद्राचार्यांना नचिकेताची दृष्टी लाभली आहे. तिला

इंद्रियांचा अडसर नाही.

------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com