Murali Sreeshankar
Murali SreeshankarSakal

श्रीशंकरची ‘लांब उडी’

या पार्श्वभूमीवर २०२३ मध्ये भारतीय अॅथलीटची कामगिरी चर्चेत असेल. लांब उडीपटू मुरली श्रीशंकरकडेही विशेष लक्ष राहील.

किशोर पेटकर

भारतीय अॅथलीट्ससाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा होईल. त्यापूर्वी जुलैत बँकॉक येथे आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत भारतीयांचा कस लागेल. शिवाय ऑगस्टमध्ये होणाऱ्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय अॅथलीट पात्र ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर २०२३ मध्ये भारतीय अॅथलीटची कामगिरी चर्चेत असेल. लांब उडीपटू मुरली श्रीशंकरकडेही विशेष लक्ष राहील.

टोकियो ऑलिंपिकमध्ये नीरज चोप्राने भालाफेकीत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. गतवर्षी युजिन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याने असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला. अंजू बॉबी जॉर्जने २००३ साली भारतासाठी जागतिक स्पर्धेतील पहिलेवहिले पदक जिंकताना ब्राँझपदकाची कमाई केली होती.

Murali Sreeshankar
Sakal Podcast : चांद्रयान ३ची भरारी ते खातेवाटपाचा तिढा कायम

मिल्खा सिंग, पी. टी. उषा या धावपटूंनी ऑलिंपिक, जागतिक पदके जिंकलेली नसली, तरी त्यांचे अॅथलेटिक्समधील योगदान अमूल्य आणि अद्वितीय आहे. जगातील अव्वल पुरुष भालाफेकपटू असलेल्या २५ वर्षीय नीरजने यावर्षी मे महिन्याच्या प्रारंभी दोहा डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकून मोसमाची सुरुवात दणक्यात केली. त्यानंतर दुखापतीमुळे तो स्पर्धात्मक मैदानापासून दूर राहिला, मात्र आता पुन्हा सज्ज झाला आहे.

जून महिन्यात पॅरिसमध्ये झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत मुरली श्रीशंकरने लांब उडीत पोडियम फिनीश मिळवून लक्ष वेधले. २४ वर्षीय श्रीशंकरने दुसऱ्या प्रयत्नात ८.०९ मीटर लांब उडी मारत ब्राँझपदकाची कमाई केली. नीरज चोप्रा व थाळीफेकपटू विकास गौडा यांच्यानंतर डायमंड लीग पदक जिंकणारा तो तिसरा भारतीय ठरला. गतवर्षी मोनॅको डायमंड लीगमध्ये ७.९४ मीटरसह सहावा क्रमांक ही श्रीशंकरची यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी होती. यावेळी पॅरिसमधील स्पर्धा अवघडच होती.

Murali Sreeshankar
SAKAL Exclusive: : F & O ट्रेडिंग शिकवणीतून विजय ठाकरेंचे तरुणाईला मार्गदर्शन

जगातील प्रमुख लांब उडी अॅथलीट स्पर्धेत सहभागी होते. त्यांच्या तुलनेत श्रीशंकर काहीसा नवखा, पण त्याची कामगिरी ऑलिंपिक पदकविजेत्यांच्या तोडीची झाली. या स्पर्धेत जगातील प्रमुख दहा लांब उडीपटू सहभागी झाले होते. पॅरिसमध्ये ग्रीसचा ऑलिंपिक विजेता मिल्टियादिस तेंतोग्लोऊ याने ८.१३ मीटरसह सुवर्ण, तर स्वित्झर्लंडच्या जागतिक ब्राँझपदक विजेत्या सायमन हॅमर याने ८.११ मीटरसह रौप्यपदकाची कमाई केली. त्यानंतर श्रीशंकरला तिसरा क्रमांक मिळाला.

रौप्यपदकविजेत्याच्या तुलनेत त्याचे अंतर ०.०२ मीटरने कमी ठरले. टोकियो ऑलिंपिकमधील ब्राँझपदक विजेता क्युबाचा मायकेल मास्सो याला ७.८३ मीटरसह सहावा क्रमांक मिळाला. मागील दोन वर्षांच्या कामगिरीवर नजर टाकता श्रीशंकर याच्या कामगिरीत खूपच प्रगती झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत तो पदकाचा प्रमुख स्पर्धक असेल. केरळच्या या खेळाडूसमोर भारताच्याच जेस्विन अॅल्ड्रिनचेही आव्हान असेल. या दोघांतील चुरस राष्ट्रीय पातळीवर अनुभवायला मिळाली.

Murali Sreeshankar
Sakal Podcast :ब्रिजभूषणसिंहवर आरोपपत्र दाखल ते बारामतीत अमेठी पॅटर्न राबवणार का?

प्रगतीचा चढता आलेख

केरळमधील पलक्कडच्या श्रीशंकरला सुरुवातीपासून वडिलांचे पाठबळ लाभले. त्याचे वडील एस. मुरली हे तिहेरी उडीतील माजी खेळाडू. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी रौप्यपदकही जिंकले होते. आता त्यांनी आपल्या मुलाची कारकीर्द काळजीपूर्वक घडविली आहे. श्रीशंकर टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरला. तेव्हा ८.२६ मीटर ही सर्वोत्तम कामगिरी होती, मात्र टोकियोत ७.६९ मीटरवर समाधान मानावे लागल्याने त्याला अंतिम फेरी गाठता आली नाही, तरीही ऑलिंपिक सहभागाचा अनुभव त्याच्यासाठी लाखमोलाचा ठरला.

गतवर्षी त्याच्या कामगिरीतील प्रगतीचा चढता आलेख अनुभवायला मिळाला. युजिन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत अंतिम फेरी गाठताना ७.९६ मीटरसह तो सातव्या स्थानी राहिला. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने घेतलेले परिश्रम सार्थकी लागले. ८.०८ मीटरसह श्रीशंकरने रौप्यपदक जिंकले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लांब उडीत रौप्यपदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष हा विक्रम त्याने नोंदविला.

Murali Sreeshankar
SAKAL Exclusive: पूर परिस्थितीत 48 स्थळे असुरक्षित; आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नियोजन

काही दिवसांपूर्वी ओडिशातील भुवनेश्वर येथील कडक उन्हाळ्यात ८.४१ मीटर हे कारकिर्दीतील सर्वोत्तम वैयक्तिक अंतर नोंदवून श्रीशंकर बुडापेस्ट येथील जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला. ऑलिंपिक पात्रतेसाठी ८.२५ मीटरचा पात्रता निकष त्याने सहज पार केला. त्यापूर्वी मे महिन्यात ग्रीसमध्ये झालेल्या खंडीय पातळीवर जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत ८.१८ मीटरसह त्याने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती. याचवर्षी अमेरिकेत झालेल्या एका स्पर्धेत श्रीशंकरने ८.२९ मीटरची नोंद केली होती.

वडील मुरली हे त्याचे मार्गदर्शक; मुलाच्या साऱ्या नियोजनाची आखणी तेच करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, श्रीशंकरच्या प्रगतीत अमेरिकेतील प्रशिक्षण सत्राचा लाभ झाला आहे. अखेरच्या दहा मीटर अंतरात वेग घेण्यावर त्याने भर दिला. टेक्सास येथील कीथ हर्स्टन यांचे मार्गदर्शनही साह्यभूत ठरले. विशेष बाब म्हणजे, हर्स्टन हे श्रीशंकरला ज्युनियर गटापासून ओळखतात. एकंदरीत, यावर्षीची आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा, जागतिक स्पर्धा, डायमंड लीग स्पर्धा यांद्वारे श्रीशंकरला पुढील वर्षीच्या ऑलिंपिक स्पर्धेच्या तयारीसाठी चांगले व्यासपीठ मिळेल आणि त्याची कामगिरीही अपेक्षेनुसार होत आहे. त्यामुळे श्रीशंकरचा आत्मविश्वास सध्या तरी दुणावलेला आहे.

Murali Sreeshankar
SAKAL Impact: तोरंगण पाड्यावर चिरांचे बनवले स्मारक! चौदाशेच्या शतकांच्या 20 चिरांचे संवर्धन

दोघा भारतीयांत चढाओढ

तमिळनाडूतील जेस्विन अॅल्ड्रिन हा २१ वर्षीय लांब उडीपटू श्रीशंकरचा जवळचा प्रतिस्पर्धी आहे. त्यांच्यातील चढाओढ कामगिरी उंचावण्यात मदतगार ठरली आहे. अॅल्ड्रिनने यावर्षी मार्चमध्ये बेल्लारी येथील इंडिया ओपन स्पर्धेत ८.४२ मीटर उडी घेत पुरुष लांब उडीतील नवा राष्ट्रीय विक्रम केला. जूनमध्ये श्रीशंकरने भुवनेश्वर येथे आंतरराज्य राष्ट्रीय सीनियर अॅथलेटिक्स स्पर्धेच्या पात्रतेत ८.४१ मीटरची नोंद करून त्याच्या राष्ट्रीय विक्रमाला आव्हान दिले. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर श्रीशंकर आणि अॅल्ड्रिन यांच्यात थेट मुकाबला झाला. अंतिम फेरीत श्रीशंकरने ८.२९ मीटरसह सुवर्णपदक जिंकले, तर अॅल्ड्रिनला बेल्लारीच्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.

७.९८ मीटरसह तो रौप्यपदकाचा मानकरी ठरला. त्याने आशियाई स्पर्धा पात्रतेचा ७.९५ मीटरचा निकष पार केला, मात्र तो पूर्ण तंदुरुस्त नव्हता हे नंतर स्पष्ट झाले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पात्रतेसाठीच तो या स्पर्धेत सहभागी झाला होता. भुवनेश्वरमधील स्पर्धेनंतर लगेच अॅल्ड्रिनने लॉसेन डायमंड लीगमधून माघार घेतली, तसेच बँकॉकमधील आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत तो सहभागी होण्याबाबत साशंकता आहे. श्रीशंकर याच्यासह अॅल्ड्रिनही बुडापेस्ट येथील जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

Murali Sreeshankar
Sakal Green Day : वृक्ष लागवडीसोबत संगोपनाचा संकल्प करीत ‘ग्रीन डे’ साजरा

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी पूर्ण तंदुरुस्त होण्याचे अॅल्ड्रिनचे ध्येय असेल. तो सहभागी झाल्यास चीनमध्ये पुरुषांच्या लांब उडीत दोघा भारतीयांत पदकासाठी जबरदस्त चुरस राहील. अॅल्ड्रिन गतवर्षीही जागतिक स्पर्धेस पात्र ठरला होता, तर यावर्षी अस्ताना येथे झालेल्या आशियाई इनडोअर अॅथलेटिक्स स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले होते. श्रीशंकर आणि अॅल्ड्रिन यंदा कारकिर्दीतील सर्वोत्तम वैयक्तिक फॉर्ममध्ये आहेत.

अॅल्ड्रिनने योग्य तंदुरुस्ती साधल्यास आशियाई क्रीडा स्पर्धेत या दोघांकडून भारताला पदकाच्या अपेक्षा असतील. यावर्षी मे महिन्यात ग्रीसमधील स्पर्धेत श्रीशंकर व अॅल्ड्रिन एकमेकांशी स्पर्धा करीत होते. त्या स्पर्धेतही श्रीशंकरने सुवर्ण, तर अॅल्ड्रिनने रौप्यपदकाची कमाई केली होती. तमिळनाडूच्या या खेळाडूने गतवर्षी गुजरातमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आणि फेडरेशन कप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. थोडक्यात, श्रीशंकर आणि अॅल्ड्रिन कामगिरी उंचावण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि भारताच्या दृष्टीने हे सकारात्मक चिन्ह आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com